धर्मनिरपेक्षता मराठी निबंध | Secularism Essay In marathi

 धर्मनिरपेक्षता मराठी निबंध | Secularism Essay In marathi 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण धर्मनिरपेक्षता मराठी निबंध बघणार आहोत. भारत एक धर्मनिरपेक्ष राज्य आहे. देशाचा कोणताही विशिष्ट धर्म नसणे म्हणजे धर्मनिरपेक्षता घटनेच्या प्रस्तावनेत म्हटले आहे की भारतीयांना विश्वास, धर्म, उपासनेचे स्वातंत्र्य असेल. 


घटनेत प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्याची मोकळीक देण्यात आली आहे. तो कोणत्याही धर्मावर विश्वास ठेवू शकतो. राज्य त्याच्या कार्यात हस्तक्षेप करणार नाही. राज्याच्या दृष्टीने सगळे धर्म समान आहेत. काही लोक याचा अर्थ अधार्मिक किंवा धर्मविरोधी राज्य असा करतात तो चुकीचा आहे. 


धर्मनिरपेक्ष राज्याचा अर्थ हा की राज्य स्वतः धर्माच्या बाबतीत हस्तक्षेप करणार नाही म्हणजेच उदासीन राहील. धर्म ही व्यक्तीची व्यक्तिगत बाब आहे. त्यात राज्याचा हस्तक्षेप असू नये. ज्याप्रमाणे इंग्लंडचा धर्म ख्रिश्चन पाकिस्तानचा धर्म इस्लाम आहे तसा भारताचा कोणताही धर्म नाही. 


चीन किंवा अन्य साम्यवादी देशांप्रमाणे भारत धर्माला 'अफू' मानत नाही. भारत एक विशाल राष्ट्र आहे. इथे धर्माच्या विविधतेबरोबरच उपासना पद्धतीतही विविधता आहे. भाषा, वेशभूषा, राहणीमानात वैविध्य आहे. येथील धर्मनिरपेक्षता सुख, शांती आणि स्मृद्धीची द्योतक आहे. 


यासाठी भारतीयीकरणाची आवश्यकता आहे. येथील प्रत्येक माणसाच्या हृदयात भारतीयत्वाचा साक्षात्कार झाला पाहिजे, हाच धर्मनिरपेक्षतेचा कणा आहे. 'सेक्युलर' या शब्दाचा वापर मध्यकाळात युरोपात झालेल्या कौन्सिलियर चळवळीत झाला. 


ज्याने शासनाला चर्चेच्या प्रभावातून मुक्त केले होते. भारतात शासन धर्माचे होते. भारतात धर्म हा शब्द मजहब किंवा रिलिजनचा पर्यायी शब्द नाही. इथे पुजारी, पंडे आदींचा प्रभाव कधीही नव्हता. त्यांनी कधीही कोणत्याही प्रकारचे फतवे काढले नाहीत. 


भारतीय इतिहासात सम्राट अशोक हा बौद्ध धर्मीय असून त्याचे राज्य अधिकृत बौद्ध धर्मीय होते. पण त्याने आपत्या शासनकाळात कधीही बौद्ध धर्माच्या पालनाचा आदेश आपल्या प्रजेला दिला नाही. तो ज्या धर्माचा प्रचार करीत होता तो मानवधर्माचाच पर्यायी धर्म होता. त्यात कणभरही सांप्रदायिकता नव्हती.


आपला महान देश धर्मप्रधान राहिला आहे. धर्म त्याच्या आत्म्यात आहे. त्याची उपेक्षा करून आपण भारतीय संस्कृतीच्या मूळ तत्त्वाला नष्ट करीत आहोत म्हणून भारतीय संविधानाने श्वर आणि धर्माचा स्वीकार केला पाहिजे. राम आणि कृष्णाच्या देशात वेद, पुराणे, उपनिषदांच्या देशात ऋषिमुनींच्या देशात जी घटना तयार झाली त्यात सर्वशक्तिमान ईश्वराचा उल्लेखही नाही ही खेदाची गोष्ट आहे. 


घटनेत अल्पसंख्याकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी भारताला धर्मनिरपेक्ष राष्ट्र घोषित करण्यात आले आहे. असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे की अशी कोणती कारणे होती किंवा अशी कोणती परिस्थिती होती की ज्याने प्रेरित होऊन भारतासारख्या धार्मिक देशाच्या घटनेच्या शिल्पकारांनी राज्याला धर्मनिरपेक्ष घोषित केले. 


ज्यावेळी भारतीय घटना तयार झाली त्याआधी भारताने जातीय दंगलींचा उन्माद पाहिलेला होता. ज्यात हिंदू, मुसलमान व शिखांची हजारोंच्या संख्येत कत्तल करण्यात आली. स्त्रिया व मुलींना बेइज्जत करण्यात आले. देशाची फाळणी करण्यात आली. अशा परिस्थितीत नवीन घटना तयार करण्यात आली. 


ही परिस्थिती देशातील धर्म, संप्रदाय यांच्या प्रति कठोर दृष्टिकोन स्वीकारण्याची नव्हती. या धर्माच्या नावावर जेव्हा मनुष्य पशुपेक्षाही हिंम्र बनला होता. धर्माबद्दलची सहानुभूती नष्ट झाली होती. अशा धर्माविरोधी वातावरणात घटना तयार झाली. 


त्यावेळी घटना निर्मात्यांनी विचार केला की ज्या धर्माच्या नावावर हे हत्याकांड झाले तो धर्म विसरून जाणेच श्रेयस्कर. कमीत कमी राज्य आणि घटनेने तरी धर्माची सत्ता स्वीकारू नये. त्यांचा दृढ विश्वास असा होता की सगळ्या ठिकाणी धर्माची बळजबरी करणे बरोबर नाही.


भारतीय संस्कृतीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य हे की तिच्या अनेकतेत एकतेचे दर्शन घडते. आस्तिक नास्तिक, शाक्त शैव, वैष्णव, बौद्ध वेदांती आणि द्वैती या सर्वांचा भारतीय संस्कृतीच्या परिवाराने स्वीकार केला आहे. काही विचारवंतांचे असे मत आहे की जर इस्लामने तलवार आणि बळाच्या जोरावर धर्मप्रचार केला नसता तर त्यालाही भारतीय संस्कृतीने आपल्यात सामावून घेतले असते. 


आज धर्माचे ते स्वरूप जे कोणे एके काळी संपूर्ण देशाला एका सूत्रात बांधत होते ते राज्यांनी घेतले आहे. आज राज्यच देशातील सर्व नागरिकांना एका सूत्रात बांधत आहे. म्हणून राज्यांनी निधर्मी राहणे आवश्यक आहे. 


धर्मनिरपेक्षता राजनैतिक विवशता नाही किंवा ती हिंदूविरोधीही नाही. देशाचा कायदा सर्वांना समान आहे. 'हिंदू कोड बिल' बनले परंतु मुसलमानांना चार-चार लग्ने करण्याची परवानगी कायद्याने असणेही योग्य नव्हे. कुटुंब नियोजन केवळ हिंदूपुरतेच मर्यादित असू नये. 'सिमिलर सिव्हिल कोड' निर्माण करण्याचा सल्ला केंद्र सरकारला देऊन एक योग्य पाऊल उचलले आहे.


भारतात धर्माचा अर्थ न्यायपूर्ण कर्तव्य संहिता असा मानला जातो. इथे उपासना पद्धती कधीही सामाजिक वर्गीकरणाचा आधार बनली नाही. पाश्चात्य वातावरणात वाढलेल्या आमच्या नेत्यांनी धर्माचरणाला 'रिलिजन' समजून त्याला धर्म, संप्रदाय आणि पंथ इत्यादी च्या समकक्ष मानले त्यांनी धर्माचे स्वरूप समजावून घेण्याचा प्रयत्न केला नाही. 


मानवतावादाचा पर्याय असणाऱ्या धर्माला संप्रदायवादाचा वाहक समजले. या देशात जातीयतेचा पाया त्यादिवशी घातला गेला ज्यादिवशी हिंदू धर्माला इस्लाम आणि ख्रिश्चन मतांच्या समान एक धर्म समजण्यात आले व हिंदू, मुसलमान,शीख, ख्रिश्चन यांना एकाच तराजूने मोजण्यात येऊ लागले, हिंदू परंपरेत धर्म वैयक्तिक बाब आहे. 


या आधारावर कोणताही समाज बनविला जाऊ शकत नाही. भारतात संघटित धर्म कधीही नव्हता हे एक ऐतिहासिक सत्य आहे. जे धार्मिक संघ होते ते सामाजिक कार्य करणाऱ्या पूर्णवेळ उपासकांचे वा प्रचारकांचे होते. त्यांचे अनुयायी गृहस्थ त्या संघाचे सदस्य नव्हते किंवा त्यांच्या संघर्षातही सहभागी नव्हते. म्हणून जातीयता हिंदू समाजासाठी परकी होती.


धर्मनिरपेक्षतेचे धडे बालपणापासूनच शिकविण्यात आले पाहिजेत. कारण ते नैतिक शिक्षणाचे एक अनिवार्य अंग आहे. धर्मनिरपेक्षता एक घोषणा नसून आमच्या जीवन, जागृतीचे प्रमाण आहे. आपल्या आणि राष्ट्राच्या गतिशीलतेचे द्योतक आहे. 


धर्मनिरपेक्षतेचे वातावरण निर्माण करून आपण उज्ज्वल, शांतिमय आणि समृद्धीमय भविष्याचे निर्माण करण्यात यशस्वी होऊ शकू. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद