शब्दाचे सामर्थ्य मराठी निबंध | shabdache samrthya marathi essay

 शब्दाचे सामर्थ्य मराठी निबंध | shabdache samrthya marathi essay


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  शब्दाचे सामर्थ्य मराठी निबंध बघणार आहोत.आज आपण  शब्दाचे सामर्थ्य शीर्षक असलेले दोन निबंध बघणार आहोत आज आपण  शब्दाचे सामर्थ्य असलेले दोन निबंध बघणार आहोत  ‘शब्द बापुडे वादळवारा!' असं ज्यानं म्हटलं आहे त्याला शब्दांचं सामर्थ्यच कळलं नाही असं म्हणावं लागेल. 'जय हिंद', 'चले जाव!', 'भारतमाता', 'जय जवान, जय किसान !' या शब्दांचे प्रभावी कार्य, सामर्थ्य व प्रभाव सर्व भारतीयांनाच ज्ञात आहे.


व्याकरणदृष्टया अक्षरांची अर्थपूर्ण रचना म्हणजे शब्द म्हणता येईल. शब्द हे अर्थवाही असतात. नुसत्या 'आई' या शब्दात किती पावित्र्य, मांगल्य साठवलेले आहे. शब्दांच्या अर्थाच्या विविध छटा असतात. शब्द अर्थवाही तसेच 'भाव'वाही असतात. काही शब्द कोरडे' असतात, तर काही ओलावा घेऊन आलेले असतात. 


'हट', 'छट' यांपैकी एखादाही शब्द घृणा किंवा तिरस्कार व्यक्त करायला पुरेसा असतो. 'वा!', 'छान!' हे शब्द केवढे प्रशंसा किंवा कौतुक घेऊन येतात. आपल्या मनातील विचार, भावभावना व्यक्त करण्यासाठी शब्दच आपल्याला मदत करतात. त्यामुळेच 'शब्द' या आपल्या कवितेत अरुण कांबळे म्हणतात, 


'आज माझा शब्द आभाळ झाला आहे.' आभाळाइतका मोठा किंवा सामर्थ्यवान त्यांचा 'शब्द' झालेला आहे. कारण शब्दांचे सामर्थ्य त्यांना समजले आहे. शब्दांचा योग्य वापर, रचना, आपल्या भावभावना, मनातील वेदना व्यक्त करण्यासाठी त्यांना गवसले आहेत 'शब्द!'सर्व संतांना हे शब्द धन सापडल्याने ते श्रीमंत झाले होते. 'विठ्ठल' हा एकच शब्द त्यांच्या आनंदाचे निधान होऊन बसले होते.


जीवन म्हणजे सुखदःखाचे भांडार. दःखात लाभलेले सांत्वनाचे दोन शब्द माणसात धैर्य निर्माण करतात. दुःखी माणसाला त्यांचा फार आधार वाटतो. थकलेल्या पायांमध्ये शक्ती निर्माण करतात. शब्दच आपल्याला प्रेरणा देतात किंवा निरुत्साही करतात.


कवी केशव मेश्राम यांना तर शब्द आपुले सर्वस्व वाटतात. कधी ते माऊलीची कूस' बनून जवळ घेतात. जगाने झिडकारले, फसवले तरी ते कवीला- मेश्रामांना वात्सल्य व प्रेमाचा ओलावा देतात. आत्मविश्वास निर्माण करतात. दुःखात त्यांचे सहप्रवासी' होतात. 


जेव्हा कधी अपमानाचे मरणप्राय दुःख देणारे जिणे वाट्याला येते तेव्हा शब्द खऱ्या मित्रासारखे धावत येतात. धीर देतात. शब्दांचे सामर्थ्य सर्वांना समजलं आहे, म्हणूनच 'शब्द देणे', 'शब्द मोडणे', 'शब्द पाळणे' असे वाक्प्रचार रूढ झाले आहेत. शब्द हे फार मोठे शस्त्र आहे. 


जुलमी इंग्रजी सत्तेविरुद्ध, समाजातील दुष्ट प्रवृत्तीवर टिळक-आगरकरांनी या शब्दांच्या सहाय्यानेच वार केले. प्रहार केले. शब्दांचे सामर्थ्य समजून शब्दांचा वापर योग्य, जपूनच व सावधपणेच केला पाहिजे. कारण शस्त्रांनी शरीराला केलेली जखम भरून येते, पण शब्दांनी केलेली जखम नेहमी ठुसठुसत राहते. कधीही भरून येत नाही. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता .पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका 

निबंध 2 

शब्दाचे सामर्थ्य मराठी निबंध | shabdache samrthya marathi essay


'आम्हां घरीं धन - शब्दाचींच रत्लें।

शब्दाचीच शस्त्रे - यत्न करूं।' 


संत तुकाराम महाराजांचे हे शब्द किती समर्पकपणे शब्दांचे सामर्थ्य सांगतात... शब्द म्हणजे माणसाने आपल्या भावना, विचार, कल्पना व्यक्त करण्यासाठी शोधलेले माध्यम! त्याचे संवादाचे अत्यंत प्रभावी साधन. नेपोलियन म्हणायचा 


“शब्दांच्या आधारे आम्ही लोकांवर राज्य करतो," तर चीनचा धर्मगुरू कन्फ्यूशस म्हणतो, “शब्द हा आत्म्याचा उद्गार!" 'ध'चा 'मा' करून पेशवाईत इतिहास घडला. म्हणून शब्द जपून ठेवायचे असतात. जपून वापरायचे असतात. " शब्द शब्द जपून ठेव, बकुळीच्या फुलापरी।" 


पण आजकाल People hardly think, they just throw words at each other-हेच पाहायला मिळते. शब्द हे तुमचे व्यक्तिमत्त्व दाखवतं. राजपुताचा शब्द म्हणजे जीवाची हमी! एवढी ताकद शब्दात असते. त्याच्या शब्दावर जाऊ नका' म्हणून इशारा मिळतो, तो ते शब्द किती पाळतो यावरच! माणसाची किंमत त्यावर ठरते.


आपल्या संतांनी शब्दरूपी शस्त्रांनीच दारिद्रय, अंधश्रद्धा, विषमता, अनीती या समाजशत्रूशी मुकाबला केला. “साच आणि मवाळ। मितुले आणि रसाळ। शब्द जैसे कल्लोळ । अमृताचे॥” ज्ञानेश्वरांनी शब्दांना अमृताची गोडी दिली. संत रामदासांनी अचूक शब्दांत मनाला शिकवण दिली. 


तुकारामांनी जीवन व्यवहार शिक्षण समर्थ शब्दात मांडले “भले तर देऊ, कासेची लंगोटी। नाठाळाचे माथां देऊ काठी।" पुढे ते म्हणतात “शब्दार्थ आमुच्या जीवाचें जीवन । शब्द वाटूं धन। जनलोकां॥" केशवसुतांच्या शब्दांनी नव्या मनूच्या आगमनाची वर्दी दिली. 


बालकवींच्या शब्दांनी निसर्गसौंदर्याचा नजराणा पेश केला. कुसुमाग्रजांच्या शब्दांना लाभली मानवतेच्या कल्याणाची करुण झालर! क्रांतीचा जयजयकार करीत ते आले. 'बर्फाचे तट पेटून उठले' मधील अंगार दाहक वाटतो. “मी 


शब्दांच्या घालुनि बसलो अमाप राशी। 

धावत जातो जखमी होता शब्दापाशी॥" 


म्हणूनच कुसुमाग्रज झाले नभांगणातील एक तारा.... पाडगांवकर म्हणतात " अनुभवाच्या प्रत्येक वळणावर अनेक रूपांनी मला हे शब्द भेटतात. कधी ते असतातअन्याय पहाडाच्या ठिकऱ्या करणाऱ्या सुरुंगासारखे तर कधी असतात म. गांधी, मार्टिन ल्यूथर किंग यांच्या छातीतील जखम व्यक्त करणारे."


शब्दांच्या सामर्थ्यावर उलथापालथ घडवणाऱ्या घोषणा जन्माला आल्या. 'वंदेमातरम्' या शब्दांनी बत्तीस कोटी भारतीय झपाटले. 'चले जाव!' चा प्रतिकार इंग्रज करू शकले नाहीत. इंदिरा गांधींनी फाईलवर तीनच शब्द लिहिले. 'प्रिपेअर फॉर वॉर' आणि बांगला देश स्वतंत्र झाला.


 'आणीबाणी' या एका शब्दाने कोट्यावधींच्या व्यक्तिगत स्वातंत्र्यावर गदा आली... देशाचे भवितव्य नेते काय शब्द पाळतात आणि कसे वापरतात यावर असते. म्हणूनच तुकोबा पुन्हा पुन्हा सांगतात 


तुका म्हणे पहा, शब्दचि हा देव।

शब्देंचि गौरव, पूजा करूं॥" 


शब्द हा परमेश्वर आहे. सर्वशक्तिमान आहे. त्याचा गौरव, त्याची पूजा आपण शब्दसुमनांनीच करू या! मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद


 निबंध 3

 शब्दाचे सामर्थ्य मराठी निबंध | shabdache samrthya marathi essay






शब्दांचे सामर्थ्य शब्दात सांगायचे? कसं शक्य आहे? ते तर शब्दातीत! शब्दांच्या पलीकडले! परंतु शब्दांविना ते कसं सांगणार? प्रश्नच आहे म्हणा! ते 'अनिर्वचनीय' आहे हे सांगताना तरी शब्दांच्या कुबड्या घ्याव्या लागणारच! परमात्मस्वरूप वर्णिताना 'न कळे न कळे नेति नेति' असं म्हणून श्रुती मूक होते. 



माया लज्जायमान होते. गुरुस्तवन करताना 'आता सद्गुरु वर्णवेना' अशा शब्दात साक्षात समर्थ आपली असमर्थता व्यक्त करतात. शब्दांचं सामर्थ्य कथन करतानाही तसंच काहीसं होणार आहे. ते मोडक्या तोडक्या (आणि तोकड्या) भाषेत शब्दबद्ध करण्याचा हा प्रयास! तो करण्यापूर्वी शब्ददेवतेलाच विनम्र आवाहन! "शब्दांनो, सामोरे या आणि सांगा, तुमचं कोणत्या शब्दात शब्दचित्र रेखाटावं?


शब्दांना या मंत्र म्हणू की अस्त्र दुधारी
शस्त्र म्हणू? जादूगार का त्यास म्हणावे दानव अथवा देव म्हणू? अमंत्रं अक्षरं नास्ति ।' (असं एकही अक्षर नाही की जे मंत्र नाही) शब्दांमध्येही ते सामर्थ्य असणारच! मंत्रांच्या योगे साप, विंचू यांचं विष उतरविता येतं. विषयवासनांचं जहाल विष उतरविण्याचं सामर्थ्य शब्दात, अर्थात संतसज्जनांच्या वाणीत असतं. 


नारदमुनींचा उपदेश लाभला नसता तर वाल्या 'वाल्या'च राहिला असता. त्याच्या लेखणीतून रामकथेचं अमृत स्त्रवलं नसतं. मंत्रोच्चाराने भुतंखेतं दूर पळतात असं ऐकिवात आहे. चांगदेवांच्या मानगुटीवर बसलेल्या अहंकार पिशाच्चाला मुक्ती दिली 'चांगदेव पासष्टी' ने! ज्ञानदेवांच्या मधुर उपदेशाने. 



इवल्याशा बीजात विशाल वटवृक्ष सामावला असावा त्याप्रमाणे छोट्याशा शब्दात मोठी शक्ती दडलेली असते. एकंदरीत 'शब्द लहान तरी त्याची शक्ती महान' पारतंत्र्याच्या काळात शब्दशस्त्रांनी गाजविलेला पराक्रम तर केवळ अभूतपूर्वच! 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच' हीच ती सिंहगर्जना जिने इंग्रजांचं धाबं दणाणून सोडलं होतं. 


'इन्कलाब जिन्दाबाद', 'वन्दे मातरम्'च्या गगनभेदी आरोळ्यांनी तर जुलमी सत्तेच्या पायाखालची वाळूच सरकली. आणि 'चले जाव' या करड्या इषाऱ्याने सताधीशांच्या कानाचे पडदे फाटायची वेळ आली. त्यांच्या पाशवी आकांक्षांची राखरांगोळी झाली. क्रांतिवीरांनी शब्दांची दिव्य शस्त्रं परजली नसती तर? मायभूच्या पायातील बेड्या निखळल्या असत्या? रणाविणा स्वातंत्र्य मिळणे केवळ दुरापास्त, अशक्यप्राय गोष्ट!



हे धारदार शस्त्र उपसतांना एक खबरदारी मात्र घ्यावी लागते. कारण ते 'दुधारी शस्त्र' आहे. तेव्हा सावधान! नाहीतर आपल्या हातातील शस्त्र शत्रूऐवजी आपलाच काळ ठरायचे! दुष्मनावर तुटून पडताना शब्द दिव्य अस्त्राचं काम करतात. लोकमान्य टिळकांच्या 'केसरी'तील अग्रलेखांनी ही कामगिरी बेडरपणे पार पाडली आहे. त्यांच्या वाग्बाणांनी ब्रिटीश राज्यकर्त्यांना अगदी रक्तबंबाळ करून टाकलं. 


मऊ गाद्यगिरद्यांवर लोळून शरपंजरी विव्हळत पडण्याच्या वेदना त्यांना भोगायला लावल्या. 'सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का?' या मथळ्याने तर त्यांच्या डोक्याच्या चिंधड्या झाल्या असतील आणि 'राज्य करणे म्हणजे सूड घेणे नव्हे' हा आसूडाचा फटकारा त्यांनी कसा बरं सहन केला असेल? कल्पनेनी आनंदाच्या उकळ्या फुटतात.


शब्द म्हणजे जादूची कांडी. राईचा
पर्वत आणि पर्वताची राई करावी ती शब्दांनीच. वकीलमंडळी याच शब्दांचं बोट धरून कोर्टात जातात. केस लढवितात नि जिंकतात देखील. खऱ्याचं खोटं, खोट्याचं खरं करण्याची अद्भुत किमया शब्दच करू जाणे!


शिक्षक, हरदास, पुराणिक यांचं तर शब्दांशिवाय पान हालत नाही. नेत्यांचंही शब्दांविना पावलोपावली अडतं. भाषणबाजीने, आश्वासनांनी (खोट्या) सभा, निवडणुका जिंकता येतात. शब्द टाकणे, शब्द देणे, शब्द पाळणे याला महत्त्व आहे शब्दांच्या सामर्थ्यामुळेच. 


भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे' हे धीराचे बोल म्हणजे देवदूतच. ते संकटकाळी धावून येतात, मदतीचा हात देतात, मार्ग दाखवितात. संतांचे आशीर्वाद म्हणजे तर कामधेनू, कल्पवृक्ष, चिंतामणी यांचा त्रिवेणी संगमच! परंतु देवासारखे, देवदूतासारखे वाटणारे शब्द कधी कधी अक्राळविक्राळ राक्षसाचं रूप धारण करतात. 


मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांना वनवासाला धाडतात. मायावी मारीचाचं रूप घेऊन 'सीते, धाव' अशी साद घालतात. जगन्मातेला फसविण्याचं कपटकारस्थान रचतात. जखमेवर कुंकर घालणारे, मलमपट्टी करणारे शब्दच असतात. जखमेवर मीठ चोळण्याचं काम ही ते चोखपणे पार पाडतात. 'कबूल है' हे



शब्द दोन जीवांचं मीलन घडवून आणणारे तर 'तलाक' या शब्दाने दोन जीव कायमचे दूर जातात. वरदान देणारे शब्द शाप देतात तसेच उःशाप ही देतात. तात्पर्य शब्द ही शक्ती आहे. तिचा वापर कसा करायचा ते ठरविणं आपल्या हाती आहे. 'प्राण जाय पर बचन न जाय' ही रघुकुलाची आदर्श रीत. बोललेला शब्द प्राणपणाने जपणे म्हणजे शब्दब्रह्माची पूजा आहे. याचे प्रत्येकाला भान असावे.


शब्दसृष्टीचे ईश्वर (कवी) तर ह्या शब्दांवर बेहद्द खूष आहेत. ते शब्दांचे 'ऋणाईत' आहेत. शब्द त्यांना मातेसमान पोटाशी घेतात, प्राणप्रिय सखा होऊन धीर देतात, मार्ग दाखवितात. कवी केशवसुत 'शब्दांनो, मागुते या' अशी नम्र विनवणी करतात. तुकाराम महाराज "आम्हा घरी धन, शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे, यत्न करू" असा त्यांचा बहुमान करतात. शब्द हाच त्यांचा देव. शब्दांनीच ते त्याची


पूजा बांधतात. शब्दांवर त्यांचं इतकं जिवापाड प्रेम की 'शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन' असा भाव ते प्रगट करतात. शब्दसृष्टीचा संपूर्ण डोलारा शब्दशेषाच्या फण्यावर उभा आहे. शब्दांचा महिमा कितीही सांगितला तरी संपणार आहे थोडाच! शेवटी एवढेच म्हणता येईल. "शब्दवर्णना शब्द तोकडे, शब्दांविण पण सांगू कसे?"मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद