शेतमजुराचे आत्मकथन मराठी निबंध | Shetmajurache Aatmakathan Essay Marathi

  शेतमजुराचे आत्मकथन मराठी निबंध | Shetmajurache  Aatmakathan Essay Marathi 


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  शेतमजुराचे आत्मकथन मराठी निबंध बघणार आहोत. पन्नास रुपये उसने मागायला आलेला दगडू सांगत होता, "अरं पोरा, जरा चार दिस साळत जाऊ नगस आनि माझ्या संग कापणीला चल. चार पैसं मिलत्याल, असं म्या किती माझ्या लेकास विनवलं, तरी त्यानं माजं काही ऐकलं न्हाई. 


त्यो साळंत गेलाच, आता बघा, म्या यकट्यानंच राबायचं काय? पोरांनी बी मदत केली तर काय हुतं? "म्या बगा वयाच्या चार-पाच वर्षापासनं आईबापाच्या मागं-मार्ग शेतावर जायचो. सातआठ वर्षापासून तर मजुरी बी मिळवायला लागलो. 


मी मोट्या माणसाइक्तं काम क्येलं तरी बी मला शेतमालक निम्मीच मजुरी द्यायचा बगा. 'त्यवढं तरी मिळतंय' म्हणून आम्ही दिलं ते ध्येऊन गप बसायचो. आमची सताची जमीन न्हाई मग आता दसऱ्याच्या शेतात मजरी केल्याबिगर पोटाला काई मिळंल का?


"अवो, गेली पन्नास वरसं मी असा मळ्यात तर कधी शेतात राब राब राबतोय, पर गरिबी काई हटत न्हाई. इंग्रज सरकारचं राज होतं तरी बी आमी मजुरीच करायचो आनि काँग्रेस, जनता पक्षाचं राज आलं तरीबी आमच्या नशिबाची मजुरी सुटत नाही, आता खानारी तोंडंही वाढली. पैका कसा पुरावा?


"बरं हये चार मयनेच काम मिळतं बगा, येकदा कापनी झाली, की काई काम मिळत न्हाय, रोजगार न्हाय, काई न्हाय. मग या चार मयन्यातच काई मिळवायला नगं का?


“बरं आजकालची प्वारं. शेतात आमच्याबरुबर यायला तय्यारच न्हाईत. 'साळा सिकायची' म्हनत्यात. गरीबाला कसली साळा आन् कसलं काय. पर पोरांनी साळेचं खूळ डोक्यात घेतलंय, त्यानं मला लई तरास पडतोय बगा. दिसभर राबायचं अन् रात्रीबी शेताची राखण करायची. नक्को जीव झाला हाय.


“बरं, मालक मजुरी तरी वाढवून देतोय व्हय? दिसभर काम केल्यावर दहा रुपये हातावर ठेवतो. कदीकदी त्ये बी पैसं येळवर मिळत न्हाईत. मग उसनंपासनं कोनाकडून तरी घ्यावं लागतं. घरातलं एकादं भांडं गहान टाकावं लागतं. असा ढकलगुजारा चालू हाय बगा.


"आमचा शेतमालक तालुक्याच्या गावाला गेलाय. दोन-तीन दिसांनी येईल. पन आज घरात धान्य नाई बगा. जरा पन्नास रुपयं द्या. मजुरीचं पैसं आलं की देईन तुमचं. बुडवनार न्हाई." त्याची करुण कहाणी ऐकून मला लहानपणी शिकलेली कविता आठवली


रात्रंदिन ज्यांनी भ्यावे, पदतळी चुरडूनि जावे। उन्मत्त करुनि अन्याय, उरावर खुशाल नाचायाचा। हा न्याय असे जगताचा। मी त्याला पन्नास रुपये दिले. 'तुझ्या मुलांना खाऊसाठी आहेत ते, परत करू नकोस.' म्हणून बजावले. माझ्या पन्नास रुपयांनी त्यांच्या नशिबाचा वनवास संपणार होता का?


पेरापेरात साखर। 

तुमचं पिकलं शिवार। 

पोटभर पाण्यासाठी रान धुंडाळिते। 

वेल मांडवाला चढे। 

माझ्या घामाचे ग अळे। 

माझ्या अंगणी पालापाचोळा पडे। 


या ओळी माझ्या मनात धिंगाणा घालत होत्या. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद