तुझे आहे तुजपाशी परी तू जागा चुकलासी मराठी निबंध | Tuze aahe tuj-pashi pari TU jaga chukalasi Essay Mrathi

तुझे आहे तुजपाशी परी तू जागा चुकलासी मराठी निबंध | Tuze aahe tuj-pashi pari TU jaga chukalasi Essay Mrathi

 नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण तुझे आहे तुजपाशी परी तू जागा चुकलासी मराठी निबंध बघणार आहोत. प्रत्येकजण सुखासाठी धडपडत असतो. काहीजणांना खेळण्यात सुख मिळते. काहींना खाण्यापिण्यात सुख मिळते. काहीजण गाण्याबजावण्यात रममाण होतात. काहींना वाचनात आनंद मिळतो. 


पैशानेच सुख मिळते या कल्पनेने काहीजण पैशाच्या मागे जीव तोडून धावतात. एखादा सचिन दिगंत कीर्ती मिळवतो. प्रसिद्धीचा, स्तुतिसुमनांचा व पैशांचा त्याच्यावर दाही दिशांनी वर्षात होतो. ते पाहून अनेकांना सचिन होण्याची स्वप्ने पडतात.


दूरचित्रवाणीवर लिट्ल चॅम्प्स्ची गायनस्पर्धा प्रचंड गाजली. त्यानंतर गल्लोगल्ली गायनाचे शेकडो क्लास निघाले आणि पालकांनी आपल्या लहानग्यांना घेऊन या क्लासांच्या दारांत रांगा लावल्या. आपले बाळ दूरचित्रवाणीवर झळकत असल्याचे स्वप्न अनेकांच्या डोळ्यासमोर तरळत होते. 


थोडक्यात, सगळ्यांना आपण खूप मोठे व्हावे, यशस्वी व्हावे, जगभर प्रसिद्धी मिळावी, असे वाटते. त्यातच सर्व सुख दडलेले आहे. अशी प्रत्येकाला मनोमन खात्री असते. पण हे काही खरे नाही. कारण या धडपडीत बहुसंख्य लोकांच्या वाट्याला निराशा, दुःखच येते. आपले कुठे चुकले हे शोधण्याची तसदीही कोणी घेत नाही. 


होते काय की, आपले डोळे बाहेरचे जग बघतात. त्या डोळ्यांना आत, आपल्या मनात पाहता येत नाही. ते इतरांचे चेहेरे पाहू शकतात, पण आपला चेहेरा पाहू शकत नाहीत. त्यामुळेच आपल्याला दुसऱ्याकडेच पाहण्याची सवय लागली आहे. मग आपण दुसऱ्याकडे जे आहे, ते आपल्यात शोधू लागतो. तेच आपल्याला हवेसे वाटते. 


त्यातच सुख दडलेले असल्याची आपली खात्री असते. त्यातूनच दुःखे निर्माण होतात; हेवेदावे, असूया, हाव, स्पर्धा, लबाड्या, फसवाफसवी या अपप्रवृत्ती निर्माण होतात. संतांनी याचसाठी खूप खूप पूर्वीच सांगून ठेवले आहे - तुझं आहे तुजपाशी। परि तू जागा चुकलाशी।। 


संत सांगतात का, प्रथम स्वतःकडे पाहा. नजर अंतरात्म्याकडे वळवा, आपण कोण आहोत, कसे आहोत, आपल्याकडे कोणकोणते गुण आहेत, त्यातले मजबूत कोणते, दुबळे कोणते या सगळ्यांचा विचार करा. 'मी सचिन होईन', 'मी अमिताभ बच्चन होईन' असे म्हणण्यापेक्षा "मी 'मी' होईन" असे म्हटले पाहिजे. 


आपले सामर्थ्य कशात आहे, ते ओळखून पावले टाकली पाहिजेत. आपले सामर्थ्यगुण कळले, तर यश नक्कीच मिळेल. गाडगे महाराज म्हणत, देव दगडात नाही, तीर्थात नाही, तीर्थक्षेत्रातही नाही. देव आपल्या हृदयातच असतो. आपला आत्मा हाच देव होय. म्हणून आपल्या आत्म्याला ओळखा. 


आत्मा गवसला की देव गवसेल आणि स्वर्गच हाती येईल. तुकाराम महाराजांनी हेच त्याही आधी सांगून ठेवले आहे. 'तुज आहे तुजपाशी' म्हणजे तुझे गुण, तुझे सामर्थ्य सगळे तुझ्यातच आहे, त्याचा शोध तू बाहेर घ्यायला जातोस आणि तुझी जागा चुकते, तुला तुझा शोध लागतच नाही.


सचिनला स्वतःचे सामर्थ्य कशात आहे हे कळले आणि तो भारतरत्न बनला, लताबाईंना आपले गुण कोणते हे कळले आणि त्या मोठ्या झाल्या, आपण स्वतःचा शोध घेतला पाहिजे. आपला आतला आवाज ऐकला पाहिजे. त्याच अनुषंगाने करिअरचाही विचार केला पाहिजे. मग यश हात जोडून समोर उभे राहील. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद