युवकांचा असंतोष मराठी निबंध | YUVKANCHA ASNTOSH MARATHI NIBAND

  युवकांचा असंतोष मराठी निबंध | YUVKANCHA ASNTOSH MARATHI NIBAND 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण युवकांचा असंतोष मराठी निबंध बघणार आहोत. कोणत्याही समाजात युवकांची भूमिका सर्वात महत्त्वाची असते. महान कार्ये युवकांच्या हातून घडतात. मुले उद्याच्या समाजाची आशा असतात. 


म्हातारे समाजाचे अवशेष असू शकतात. परंतु युवक आपल्या समाजाचे वर्तमान प्रहरी आणि भविष्याचे निर्माते असतात. म्हणून युवकांचा असंतोष समाजाला त्रस्त करतो. युवकांचा असंतोष ही ती स्थिती आहे. ज्यात कोणतेही काम, वस्तू, किंवा उद्देशाने. 


युवकांचे मन तृप्त होत नाही किंवा ते त्यांना पुरेसे वाटत नाही. युवकांच्या असंतोषाच्या आगीची ठिणगी पडली की आग भडकते त्यातच त्यांचे तारुण्य आगीत तूप टाकण्याचे काम करते. ज्याप्रमाणे नाण्याच्या दोन बाजू असतात. त्याप्रमाणे युवकांच्या असंतोषालाही दोन बाजू आहेत. हा असंतोष फायदेशीर तसाच नुकसानकारकही आहे.


जर युवकांचा असंतोष आपल्या समाजाच्या अथवा राष्ट्राच्या हिताचा आहे. आणि सत्य व न्यायाच्या आधारावर उभा आहे. तर तो लाभदायक आहे. याउलट युवकांचा असंतोष जर वैयक्तिक स्वार्थासाठी असेल तर तो समाजाचे व राष्ट्राचे नुकसान करतो.


पारतंत्र्याच्या काळात ब्रिटिश राजवट उलथून टाकण्यासाठी युवकांचा असंतोष लाभदायक ठरला. हजारो युवकांनी शिक्षण सोडून दिले. सरकारी नोकऱ्या सोडल्या, विदेशी कापडावर बहिष्कार टाकला, चळवळ उभारली आणि मग नाइलाजाने ब्रिटिशांना भारत सोडावा लागला.


आणीबाणीच्या काळात युवकांच्या असंतोषमुळे इंदिरा गांधीला निवडणुका घ्याव्या लागल्या. आसाममधील युवकांच्या असंतोषामुळे तेथे विकास झाला व समृद्धी आली. मंडल आयोगाविरुद्ध निर्माण झालेल्या युवकांच्या असंतोषाने विश्वनाथ प्रतापसिंगांचे सरकारच उधळून लावले. 


नेपाळी युवकांच्या असंतोषामुळे नेपाळमध्ये लोकशाही स्थापन झाली. सत्तेविरुद्ध होणारे हे असंतोषाचे बंड म्हणजे एकप्रकारे देशभक्तीच आहे. काश्मीर, पंजाब, त्रिपुरा, बोडा याठिकाणी असणारा युवकांचा असंतोष एका विशिष्ट वर्गाच्या हितासाठी असून भारताच्या अखंडतेला घातक आहे. 


जेव्हा युवक परीक्षा स्थगित करण्यासाठी, सिनेमाच्या तिकिटांचे दर कमी करण्यासाठी, बस रेल्वेचे भाडे कमी करण्यासाठी, स्वैर आचरणाविरुद्ध आपला असंतोष प्रकट करतात तेव्हा ते त्यांच्यासाठी, समाजासाठी व देशासाठी घातक असते.


युवकांचा असंतोष जलद गतीने वाढत आहे. ज्यामुळे उत्तम समाज निर्मितीचा विचार मागे पडत आहे. विद्येच्या पवित्र मंदिरात आता चारित्र्यनिर्मिती न होता ती चळवळीची केंद्रे होत आहेत. युवकांच्या असंतोषाचे कारण त्यांचे घर आहे. घर ही मुलांची पहिली शाळा असते. 


मातापित्याच्या प्रेमामुळे मूल आदर्श मुलगा/मुलगी, आदर्श विद्यार्थी आणि आदर्श नागरिक बनते. परंतु याच मुलाचे आवश्यकतेपेक्षा जास्त लाड झाल्यास ती मुले बिघडतातही. अशी मुले आपले म्हणणे दुसऱ्याला मान्य करावयास लावतात जर न ऐकले तर बंड करून उठतात.


युवकांच्या असंतोषासाठी आपली शिक्षणपद्धती पण जबाबदार आहे. विद्यापीठातून मिळणाऱ्या पदव्या निव्वळ कागदाच्या तुकड्यासमान झाल्या आहेत. कारण डिग्री घेऊनही नोकरी मिळत नाही. या शिक्षण पद्धतीने पुस्तकी किडे तयार केले. व्यावहारिक, नागरिक तयार केले नाहीत. 


भारतातील राजकारणसुद्धा युवकांच्या असंतोषासाठी तितकेच जबाबदार आहे. हुशार मुले धक्के खातात आणि कमी योग्यतेची मुले उच्च शिक्षण आणि उच्च पदे मिळवितात. हे सर्व सामाजिक न्यायाच्या नावाखाली होत आहे. आजकाल प्रत्येक महाविद्यालयात, विद्यापीठात विद्यार्थी संसदेच्या निवडणुका होतात. 


त्यात राजकीय पक्षांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग असतो. त्यामुळे वातावरण दूषित होते. राजकारण्यांच्या आश्रयाने राहणारे विद्यार्थी आपल्या मूळ उद्दिष्टापासून भरकटत जातात आणि नापास होत राहतात. - आपले म्हणणे मान्य करवून घेण्यासाठी विद्यार्थी चळवळीचा मार्ग निवडतात. त्यांच्या मनातील सुप्त पुढारीपणाची, दादागिरीपणाची भावना त्यांना चळवळीचा मार्ग दाखविते. 


अधिकारीवर्ग व शैक्षणिक दृष्टीच्या अभावामुळे प्रथम विद्यार्थ्याच्या मागण्यांकडे अजिबात लक्ष देत नाही. पण जेव्हा आंदोलन प्रखर होते तेव्हा सहानुभूतीचा मार्ग स्वीकारतात. त्यांचा हा दृष्टिकोन विद्यार्थ्याच्या असंतोषाचे कारण आहे. तरुण पिढी आणि जुन्या पिढीत असलेले वैचारिक भिन्नत्व असंतोषाला जन्म देते. तरुण पिढी जुन्या पिढीपेक्षा वेगाने धावू इच्छिते. 


तर जुनी पिढी त्यांना आवर घालू इच्छिते म्हणून तरुणांमधे असंतोष निर्माण होतो. काही तरुण विदेशी दहशतवाद्यांच्या फेऱ्यात सापडतात आणि देशात दहशत निर्माण करतात. युवकांच्या असंतोषाचे सखोल अध्ययन केल्यानंतर हे स्पष्ट होते की ही सर्व कारणे नष्ट होऊ शकतात. 


जर कुटुंबात मुलांचे योग्य पालन पोषण झाले, योग्य तितकेच लाड झाले, घरात चांगले वातावरण असले, मुलांची उपेक्षा न झाली तर अशा कुटुंबातील मुलगा एक चांगला नागरिक बनेल. शिक्षणपद्धती व्यावहारिक बनावी. हुशार मुलांना योग्य मार्गदर्शन व आवश्यक त्या सुविधा असाव्यात. 


राजकीय पक्षांपासून शैक्षणिक संस्था अलिप्त असाव्यात. अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे लक्ष द्यावे. जुन्या पिढीने नव्या पिढीवर आपले विचार लादू नयेत. पण योग्य मार्गदर्शन जरुर करावे. युवकांवर जास्त बंधने टाकली तर असंतोष आणखी वाढेल. 


तरुणांच्या इच्छांचे दमन न करता असंतोष कमी करता येतो. युवकांच्या असंतोषाचे समाधान करून आपण त्यांच्या सर्जनक्षमतेच्या साह्याने देशाचे कल्याण करू शकतो. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद