असत्यमेव जयते मराठी निबंध | Asatyamev Jayate Marathi Essay.

 असत्यमेव जयते मराठी निबंध | Asatyamev Jayate Marathi Essay.

 नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण असत्यमेव जयते मराठी निबंध बघणार आहोत. खोटे बोलणे वाईट असते, असे कधी करू नये, असे आपण नेहमी म्हणतो, शिकवतो; पण असा उपदेश दुसऱ्यांना करताना कित्येक वेळा आपण धडधडीत खोटे बोलत असतो


लहान मुलांचा खाऊ आपण लपवून ठेवतो; पण त्याने विचारले की आपण चक्क सांगतो, 'काऊनं खाऊ नेला.काही कॉलेजकुमार तर कॉलेजला जाण्याच्या बहाण्याने सिनेमाला जातील, चौपाटीवर भेळपुरी खातील, फिरायला जातील आणि संध्याकाळी कॉलेजातून परतण्याच्या वेळेवर परत घरी येतील. 


समजा, मित्रांनी घरी येऊन काही सांगितलेच तर चक्क  मी लायब्ररीत होतो म्हणून सांगायला तयार. म्हणजे एक खोटी बाब पचवायला दुसरी खोटी बाब तयार ! पण त्यांना तरी दोष का दयावा? मोठी माणसे नाही का चार दिवस आराम हवा असला किंवा बाहेर फिरायला जायचे असले, म्हणजे खोटे मेडिकल सर्टिफिकेट ऑफिसला सादर करतात?


वकिलाकडे तर खरे बोलणारा म्हणून बहुधा कुणी बघत नाहीत. आपला अशील जिंकावा म्हणून खऱ्याचे खोटे करणे, हाच तर त्यांचा व्यवसाय ! गुन्हेगार तर चक्क गीतेसारख्या धर्मग्रंथावर हात ठेवून खरे बोलण्याची शपथ घेतात आणि धडधडीत खोटे बोलतात. 


तर अशा लोकांची प्रतिष्ठित व्यक्तींमध्ये गणना होते आणि त्याच समाजात एखादया लहान मुलाला खोटे बोलण्याबद्दल शिक्षा होते. मला एक गोष्ट अगदी खरी सांगाल? तुमच्या आयुष्यात तुम्ही एकदा तरी खोटे बोलला आहात की नाही? 


संपूर्ण आयुष्यात एकदाही खोटे बोललेला नाही असा एकतरी माणूस दाखवाल? आपले जाऊ दया. आपण तर बोलूनचालून सामान्य माणसे. पण एवढा सत्यपरायण युधिष्ठिर, तोसुद्धा शेवटी युद्धाच्या वेळी खोटे बोललाच ना!


पण या खोटेपणाच्या मीठ मिरचीशिवाय आयुष्याला मजा नाही. आकाशातला चंद्र आरशात दाखवून हा खराच चंद्र आहे, असे सांगितल्यामुळे बाळ रामचंद्राला किती समाधान आणि आनंद झाला असेल! दूध हवे म्हणून हट्ट करणाऱ्या अश्वत्थाम्याला त्याच्या गरीब मातेने पीठ कालवून दिलेच ना ! 


तिचे वात्सल्य का खोटे मानायचे! संभाजी मृत झाल्याची अफवा पसरवल्यामुळे तो सुखरूप गडावर येऊन पोचू शकला, हा ऐतिहासिक दाखला आपल्याला काय सांगतो ! एखादया व्यक्तीला असाध्य रोग झाला असला तरी, तसे स्पष्ट न सांगता आपण जेव्हा त्याला खोटी आशा लावत असतो. 


त्यावेळेस आपण कुणाच्या तरी आयुष्यातला भकासपणा आणि निराशा यांचा अंधार काढून टाकून, आशेच्या नंदादीपाने त्याचे उर्वरित आयुष्य उजळून टाकत असतो. हा पुण्यसंचय असत्य बोलण्यामुळे घडलेले पाप नक्कीच धुऊन काढतो; म्हणूनच असे नि:स्वार्थी असत्य भाषण समाजाला मान्य होते. 


काही चमत्कारिक प्रसंगी खोटे बोलणे भाग पडत असले, तरी खोटे बोलण्याची सवय लागेल, इतके मात्र खोटे बोलू नये. काही झाले तरी 'असत्यमेव जयते' असा दावा करणे हासुद्धा एक खोटेपणाचाच प्रकार नाही का? मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद