भविष्याचे वेड मराठी निबंध | BHAVISHYACHE VED MARATHI NIBANDH

 भविष्याचे वेड मराठी निबंध | BHAVISHYACHE VED MARATHI NIBANDH

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण भविष्याचे वेड मराठी निबंध बघणार आहोत.आज आपण  भविष्याचे वेड शीर्षक असलेले दोन निबंध बघणार आहोत  माणसाला स्वभावत:च अज्ञाताची अनिवार ओढ असते. अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर भविष्यकाळात आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटना आजच जाणून घेण्याची त्याला जबरदस्त इच्छा असते. 


भविष्य जाणून घेणाऱ्या माणसाच्या वृत्तीचे मूळ अनिश्चिततेत दडलेले असते. असे मला वाटते. भविष्य जाणून घेण्याची माणसाची इच्छा भागवली जाते, ती ज्योतिषशास्त्राद्वारे ! या ज्योतिषातही, ग्रहमानावरून सांगितले जाणारे भविष्य, हात पाहून सांगितले जाणारे भविष्य, चेहरा पाहून वर्तवले जाणारे भविष्य असे अनेक प्रकार असतात.


मासिके, साप्ताहिके आवर्जून राशिभविष्य छापतात. रस्त्याच्या कडेला पोपटाचे पिंजरे घेऊन बसणाऱ्या कुडमुड्या ज्योतिषांजवळही कोणी ना कोणी इसम गंभीर चेहरा करून बसलेला असतोच ! गाडीत एखादा भविष्य कथन करणारा आढळला, तर 'दो आँखे बारह हात' अशी अवस्था होते.


ज्योतिष हे एक शास्त्र आहे का, याविषयी मतभेद आहेत. ग्रहमानावरून विश्वातील घडामोडींची अटकळ बांधणे किंवा व्यक्तीचा हात व चेहरा यांवरून व्यक्तीची काही वैशिष्ट्ये ठरवणे, इतपत सारे ठीक वाटते. पण त्यावरून दैनंदिन भविष्याबद्दल इत्थंभूत माहिती मिळणे, हे जरा अतीच वाटते. 


ज्योतिषाचा एक शास्त्र म्हणून अभ्यास करण्यापेक्षा, आपल्याभोवती एक अद्भुत वलय निर्माण करून भोळ्याभाबड्या लोकांकडून पैसा उकळण्याचा तो एक धंदा होऊन बसला आहे. क्वचित काही जणांच्या बाबतीत ज्योतिषाने सांगितलेली एखादी घटना खरी ठरलीच, तर मग त्यांचा ज्योतिषावर कमालीचा विश्वास बसतो. 


मग आयुष्यातील प्रत्येक गोष्ट ते ज्योतिषाला विचारूनच करतात. परंतु त्यामुळे अशा लोकांची विचार करण्याची आणि निर्णय घेण्याची पात्रताच नाहीशी होते; मनाला एक प्रकारचा दुबळेपणा, कमकुवतपणा येतो. काही लोकांना दर आठवड्याला साप्ताहिकांतील राशिभविष्य बघून त्याप्रमाणे वागण्याची सवयच लागलेली असते. 


'नवीन खरेदी लाभदायक ठरावी', 'लॉटरीचे तिकीट घेऊन पाहावे' अशी कुचकामी भविष्येही त्यांच्या उत्साहाला उधाण आणतात. मात्र एकाच वेळी दोन वर्तमानपत्रांत, परस्परविरोधी भविष्य असेल, तर त्यांच्या मनाचा काय गोंधळ उडत असेल ते त्यांनाच माहीत...!


शक्यतो भविष्य सांगणारा अनुकूल गोष्टीच सांगतो. भविष्यात घडणाऱ्या वाईट गोष्टी टाळण्यासाठी कुणाला गंडेदोरे, कुणाला ताईत, कुणाला एखादया देवतेची उपासना करायला सांगणे, तर कुणाला विशिष्ट ग्रहाची अंगठी घालायला सांगणे असे उपाय सुचवले जातात. 


अर्थातच अशा आमिषांना बळी पडणाऱ्यांच्या वेळेचा आणि पैशांचा जो अपव्यय होतो, त्यात त्यांना त्यांचे भविष्य घडवता येण्यासारखे असते. भविष्य जाणूनही जर आयुष्यातील अनेक घटना खोट्या ठरल्या की, माणसाला हताशपणा येतो. मग भविष्य पाहणे हे एक वेड आहे हे त्याला पटते. 


म्हणूनच भविष्यवेड्या लोकांना, केशवसुतांच्या शब्दांत जीव तोडून सांगावेसे वाटते, 'प्राप्तकाल हा विशाल भूधर, सुंदर लेणी तयात खोदा.' मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता .पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद




निबंध 2

भविष्याचे वेड मराठी निबंध | BHAVISHYACHE VED MARATHI NIBANDH


 कर्जतच्या प्लॅटफॉर्मवरून गाडी सुटत होती. इतक्यात धावत पळतच मी गाडीत चढलो. मला जरा आश्चर्यच वाटलं. गाडी तशी रिकामी दिसत होती. “गाडी एवढी रिकामी कशी बुवा ?" असा मनाशी विचार करीत मी बाजूला नजर टाकली ! पाहतो तो एका कोपऱ्यात बरीच माणसं जमली होती.

खिडकीजवळ बसलेला एक दाढीवाला बुवा सांगत होता, “यह साल बहुत खराब है। भूकंप, हड़ताल, अकाल बीमारियाँ, अपघात आदी से भरा हुआ । भारत की राशी मकर है। इसलिए भारत में इस साल अशांती रहेगी। किती उत्सुकतेने माणसं ऐकत होती ! लहान, मोठे; स्त्री पुरुष, श्रीमंत, गरीब सारे होते त्यात. 


कान देऊन ऐकत होते. आणि नंतर हळूहळू आपला हात दाखवीत होते. गाडीतच नव्हे, घरादारात, रस्त्यात, बागेत, नदीकाठावर किंवा डोंगर माथ्यावर कुठेही कोणी ज्योतिषी दिसला काय, त्याच्याकडे आपले भविष्य विचारण्यासाठी चार-सहा लोक तरी जमा झालेले दिसतील. 


आपली चिंता कधी संपणार, आपल्याला चांगले दिवस कधी येणार, आपले लग्न कधी होईल, आपल्याला मुलं किती, ती चांगली निपजतील की नाही इथपासून तो आपल्या शत्रूचा नाश कसा होईल, प्रतिस्पर्ध्यावर मात कशी करता येईल यासारखे शेकडो प्रश्न विचारले जातात. भविष्याचे वेड हे आजचे नाही. अगदी पुराणकाळापासून आहे. 



पार्वतीदेखील शंकराला पुढे काय घडणार याबद्दल अनेक प्रश्न विचारीत असे तर आजच्या पार्वतीबाईनी ज्योतिष्याला 'आमच्या शंकररावांना बढती कधी मिळेल,' असा प्रश्न विचारला नाही तरच नवल! पुढे काय होणार ? आपल्या भविष्यात काय घटना घडणार आहेत हे जाणण्याची उत्सुकता सर्वांनाच असते. पण पुढच्या गोष्टी आधी कळणे योग्य आहे का ? 


असं भविष्य आधी समजणं नेहमी आनंददायक होतं का ? काही वर्षांपूर्वी ग.दि. माडगूळकरांचा 'बोलविता धनी' या नावाचा चित्रपट आला होता. एका वृत्तपत्र वार्ताहराला देव प्रसन्न झाला ! व त्याला दुसऱ्या दिवशी काय


घडणार याची वार्ता पहाटे एक पक्षी आणून देई. जणु दुसऱ्या दिवसाचे वार्तापत्रच देई तो ! पण त्यामुळे महाभयानक गोष्टी घडल्या. प्रवासी लोकांपासून तो सट्टा बेटिंग करणाऱ्यापर्यंत हजारो लोकांची त्याच्याकडे रीघ लागली. दुसऱ्या दिवसाची भविष्यवाणी विचारण्यासाठी ! त्यात चार बातम्या आनंददायक, पण चाळीस दुःखकारक असत ! कुणाला काय सांगणार ? आणि आधी सांगून तरी दुःख टाळणार कसे ? तो बेचैन झाला ! 


अखेर परमेश्वराजवळ त्याने प्रार्थना केली. ...पुढच्या दिवसाचे भविष्य कळण्याचा हा वर मला नको. तो मागे घे !...'....आणि नंतर तो सुखी झाला ! पण इतके असले तरी कोणी ज्योतिषी भेटला की मी त्याला हात दाखवितो किंवा त्याच्यापुढे कुंडली ठेवतो. कारण भविष्याची ओढ हा मानवी स्वभाव आहे. 


त्याला मी तरी अपवाद कसा ठरणार ? होणारे कधीही चुकत नाही हे मान्य, पण मग जे अटळ आहे ते काय आहे हे समजून घ्यायला काय हरकत आहे ? आणि जे आपल्या नशिबी आहे त्याचा हसतमुखाने व शांत मनाने स्वीकार करायला नको का ? भविष्याचे वेड मला आहे ते यामुळेच. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद