देववाणी संस्कृत मराठी निबंध | DEVVANI SANSKRUTI ESSAY MARATHI

 देववाणी संस्कृत मराठी निबंध | DEVVANI SANSKRUTI ESSAY MARATHI 

 नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण देववाणी संस्कृत मराठी निबंध बघणार आहोत. 

“मृगाचिये अंगी कस्तुरीचा वास असे ज्याचा त्यास नसे ठावा। 

भाग्यवंत घेती वेचूनिया मोले भारवाही मेले वाहता ओझे ॥"


असा तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे. कस्तुरी मृगाजवळ कस्तुरी असते पण त्याची त्याला जाणीव नसते. तो गवताची पाती हुंगत त्या सुगंधाचा शोध घेत असतो. आम्हा भारतीयांची स्थिती त्या कस्तुरी-मृगासारखी आहे. 'संस्कृत'ची कस्तुरी आमच्याजवळ आहे पण आम्ही इंग्रजीच्या गवताची पाती हुंगतो आहे. इंग्रजी भाषेचं भूत आमच्या मानगुटीवर सवार झालं आहे. साहजिकच संस्कृतच्या नशिबी उपेक्षा आहे. याहून दैवदुर्विलास तो कोणता?


जे सुसंस्कारित आहे ते उत्तम, श्रेष्ठ असते. मग ती व्यक्ती असो, रत्न असो किंवा वाणी असो. 'वाण्येका समलंकरोति पुरुषं या संस्कृता धार्यते।' असं सुभाषितकार म्हणतात. इतर भूषणे कालाच्या ओघात नष्ट होतात. वाणीचे भूषण मात्र कायम टिकणारे आहे म्हणून संस्कृत शिकणे आवश्यक.


संस्कृत का शिकायचं ? केवळ संस्कृतीचा अभिमान, अस्मिता जपण्यासाठी नाही. तर ती सर्व भारतीय भाषांची जननी आहे. तिच्या अभ्यासाने इतर भाषा शिकणे सोपे जाते. मातृभाषेच्या अभ्यासास ती पूरक आहे. संस्कृतच्या अध्ययनामुळे ‘पाठांतरक्षमता' वाढते. शब्दभांडार समृद्ध होते, तार्किक क्षमता वाढते. सर्वच विषयांच्या अभ्यासासाठी देववाणीचे अध्ययन उपकारक आहे.


सुभाषिते हा गीर्वाणवाणीतील मौल्यवान खजिनाच ! ही सुभाषितं म्हणजे रत्नं आहेत. 'पृथिव्यां त्रीणि रत्नानि जलमन्नं सभाषितम।' जल आणि अन्न जीवनाला आवश्यक आहेतच पण समृद्ध मानवजीवनासाठी सुभाषितांची गरज आहे. 


अमेरिकतील 'नासा' या संस्थेचे संगणकतज्ज्ञ रिक ब्रिग्ज यांनी संस्कृत ही संगणकास सर्वोत्तम भाषा असल्याचा निर्वाळा दिला आहे आणि हे युग तर संगणक युग आहे. लवकरच परदेशातही संस्कृत शिकणे अनिवार्य होईल. तेव्हाच आम्हाला तिची खरी किंमत कळेल.


आयुर्वेदाच्या अभ्यासासाठी संस्कृतचे ज्ञान असणे आवश्यक आहे. सर्व शास्त्रे, कला यांचे ज्ञान या भाषेने ग्रंथित करून ठेवले आहे. सर्वात प्राचीन भाषा असल्यामुळे तिचे अनुभवांचे भांडार समृद्ध आहे. इतर संस्कती बाल्यावस्थेत होत्या तेव्हा भारतीय संस्कृती प्रगतीच्या सर्वोच्च शिखरावर होती हे विसरून चालणार नाही आणि तिची भाषा होती संस्कृत. 'संस्कृतं संस्कृतेर्मूलम्।"


ज्ञानाची अशी एकही शाखा नाही की जी संस्कृतमध्ये विकसित झाली नाही. या भाषेत फक्त धर्मग्रंथच नाहीत तर राजनीती, अर्थशास्त्र, वैद्यक, ज्योतिष, विज्ञान, स्थापत्यशास्त्र इत्यादी सर्व विषयांवरील ग्रंथ ग्रथित आहेत.


कोपरनिकसच्या एक हजार वर्षे आधी 'पृथ्वी सूर्याभोवती फिरते' हे 'आर्यभटियम्' या ग्रंथात नमूद केले आहे. पायथागोरसच्या एक हजार वर्षे आधी 'शूल्वसूत्र' या ग्रंथात पायथागोरसच्या प्रमेयाचा उल्लेख आहे. 'सुश्रुत संहिते'त प्लॅस्टिक सर्जरीबद्दल माहिती आली आहे. 


ज्ञानाचं संपन्न असं दालन म्हणजे संस्कृतभाषा, असं म्हणणं अतिशयोक्तीचं ठरणार नाही. सध्या भारतात दहा संस्कृत विश्वविद्यालये आहेत. पाच हजार संस्कृत विद्यालये, महाविद्यालये, पाठशाळा आहेत. इंटरनेटवर संस्कृतमधील ज्ञान उपलब्ध आहे. संस्कृत भारती ने संस्कृतच्या प्रसारासाठी, प्रचारासाठी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. 


देशाच्या कानाकोपऱ्यात संस्कृत संभाषण शिबिरे आयोजित केली जात आहेत ही समाधानाची गोष्ट आहे. संस्कृत हे एक 'व्रत' आहे. ते डोळसपणे स्वीकारायचे आहे. पारंपरिक कहाण्यामध्ये 'उतू नको, मातू नको, घेतला वसा टाकू नको,' असे सांगितले जाते. 


संस्कृतचा हा वसा आम्हाला वसायचा आहे. आजच्या शुभपर्वणीवर एकच वचन द्यायचे, 'आम्ही चालवू हा पुढे वारसा' मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद