पहाटे उठणे मराठी निबंध | Essay On Pahat In Marathi

 पहाटे उठणे मराठी निबंध | Essay On Pahat In Marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण पहाटे उठणे मराठी निबंध बघणार आहोत. काही माणसे नेहमी उत्साहाने अनेक प्रतिज्ञा करत असतात आणि तितक्याच तत्परतेने त्या मोडतही असतात ! ' पहाटे उठणे' ही एक अशीच बऱ्याच जणांकडून केली जाणारी आणि मोडली जाणारी प्रतिज्ञा आहे.


आमच्या घरात माझे बाबा, आई, दादा व ताई प्रत्येकाने केव्हा ना केव्हा पहाटे उठण्याचे बेत केलेले आणि ते मोडलेले मी ऐकले आहे, पण पाहिलेले मात्र नाही; कारण ते पहाटे उठले की नाही, हे बघायला मी कुठे जागा असतो? माझे आजोबा आम्हांला नेहमी उपदेश करतात


'लवकर निजे, लवकर उठे। 

तया आरोग्य ज्ञान संपत्ती भेटे।'


हे सगळे कबूल ! पण खरे म्हणजे पहाटे उबदार पांघरुणात स्वत:ला गुरफटून घेतले ना की या कशाकशाचा मोहच मला वाटत नाही. रात्री कितीही जागायला सांगा, माझी तयारी असते. रात्री उशिरापर्यंत दूरदर्शनवरचा चित्रपट पाहताना, आईबाबांच्या रागावण्याकडे किंवा भिंतीवरच्या घड्याळाकडे जरासुद्धा लक्ष जात नाही; पण पहाटे उठायचे म्हटले की माझ्या अंगावर काटा येतो.


अलीकडे माझी परीक्षा जवळ आल्यापासून आईने सारखा धोशा लावला होता – 'उदयापासून पहाटे ऊठ अभ्यासाला. सकाळी वाचलेलं चांगलं लक्षात राहतं. शिवाय पहाटे अभ्यास केलास की दिवसभर हुंदडलास तरी मला चिंता नाही.' 


मी तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलेले पाहून ती चिडून म्हणाली होती, "लावा काय दिवे लावायचे परीक्षेत ते, तू आणि तुझं नशीब! मी तरी काय करणार?" ती अगदी माझ्या नशिबावर घसरली, तेव्हा मी एक दिवस जाहीरच करून टाकले


“उदया एक जानेवारीपासून अभ्यासासाठी मी पहाटे उठणार आहे. नव्या वर्षाचा हा माझा नवा संकल्प आहे." माझ्या या बोलण्यावर इतर सगळे छद्मीपणाने हसले. पण आई आणि आजोबा मात्र खुश झाले. रात्री आईने माझ्या उशाशी गजर लावून घड्याळ आणून ठेवले. 


इतकेच नव्हे, तर जाताना लहान मुलाला पांघरूण घालावे, तसे ती माझ्या अंगावर पांघरूणसुद्धा घालून गेली. सकाळी पाच वाजता घड्याळाने आपले काम चोख बजावले. मी जागा झालो. खरे तर मला अजिबात उठवत नव्हते. निद्रादेवी तर माझ्या डोळ्यांवर पुन्हा पुन्हा पांघरूण घालत होती. 


पण आदल्या दिवसाची माझी प्रतिज्ञा मलाच मोठ्याने ऐकू येऊ लागली. मी ताडकन अंथरुणातून उठलो. भरभर तोंड धुतले आणि खुर्चीत येऊन बसलो. आई म्हणाली होती "पहाटे पहाटे पाठांतर चांगले होते.' म्हणून ठरवले की, भौतिकशास्त्रातील सगळे नियम व सूत्रे पाठ करून टाकू. 


खुर्चीत मागेपुढे झुलत झुलत मी मोठमोठ्याने पाठांतराला सुरवातही केली. मागेपुढे झुलल्यामुळे पाठांतरालासुद्धा छान लय मिळाली होती. अशा प्रकारे मी खूप वेळ पाठांतर करत होतो. काही काळाने मला कोणीतरी गदागदा हलवत असल्याचे जाणवले. मी जागा झालो. 


खुर्चीत बसलो होतो. डोके टेबलावर टेकलेले होते. आई मला उठवत होती. डोके वर केले. घड्याळात पाहिले. साडेसात वाजले होते. सगळेजण खो खो हसत मला खिजवत होते. मला एकदम शरमल्यासारखे झाले. वाटले, ही लाजिरवाणी अवस्था पुन्हा येऊ दयायची नाही. 


तत्क्षणी ठरवून टाकले, 'यापुढे चुकूनही लवकर उठण्याची प्रतिज्ञा करायची नाही आणि कोणालाही मला हसण्याची संधी दयायची नाही !' मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद