गप्पा मारण्याचे व्यसन मराठी निबंध | GAPPA MARNYACHE VYASAN ESSAY IN MARATHI

 गप्पा मारण्याचे व्यसन मराठी निबंध | GAPPA MARNYACHE VYASAN ESSAY IN MARATHI

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण गप्पा मारण्याचे व्यसन मराठी निबंध बघणार आहोत. व्यसन म्हणजे एखादया गोष्टीच्या आहारी जाणे. ती गोष्ट मिळाली नाही की बेचैन होणे. गप्पा मारणे हेसुद्धा एक व्यसनच ! हे व्यसन दुधारी आहे. 


ते बोलणाऱ्याच्या व ऐकणाऱ्याच्या अशा दोन व्यक्तींच्या वेळेचा अपव्यय करते. पण गप्पा मारणे हीसुद्धा एक कला आहे, बरं का! सगळ्यांनाच ते जमत नाही. आमच्या मावशीचे यजमान घरात शिरता शिरता सांगतात की, “आज मी अगदी पोटभर गप्पा मारायला आलो आहे." पण तोंडात तंबाखूची चिमूट ठेवून तासन् तास नुसते बसून राहतात.\


टेबलावरचा पेपर अथपासून इतिपर्यंत वाचून काढतील. चहा-फराळाचा मुकाट्याने आस्वाद घेतील आणि मावशीने आईला दिलेला निरोप मात्र सांगायचे विसरून निघून जातील. घरी गेले की मग त्यांचा फोन येतो. “ मी गप्पांच्या नादात निरोप सांगायलाच विसरलो..." यावर मात्र आम्ही सारे पोट धरधरून हसतो.


याच्या उलट वरच्या मजल्यावर राहणारे आमचे दत्तूकाका! दत्तूकाका घरात शिरतात तेच एखादी बातमी मोठ्यांदा देत –अरे, राजाभाऊ आजची ताजी खबर समजली का? तुमचा पक्ष निवडून आलाय; पण पाच महिन्यांच्या आत हे मंत्रिमंडळ गडगडलंच म्हणून समजा ! 


नाही गडगडलं तर हा दत्तूकाका नाव बदलून घेईल... आणि राजाभाऊ, तो आपला हा हो, गणोबा, मंत्री झालाय म्हणे. अरे, लहानपणी आमच्या गल्लीत राहायला होता... दोन वेळा खायची भ्रांत होती त्याची. म्हणे मंत्री झालाय..." बाबांनी हूं ! हा! 


काही केले नाही, तरी यांची बडबड चालूच. " बरं का, राजाभाऊ, ती आपल्या ऑफिसातली हेडक्लार्क आहे ना, तिचं म्हणे आज सुनेशी जोरात भांडण झालं!" जसे काही सगळ्यांचे गुपित यांनाच माहीत ! बाबा आम्हांला सांगतात की, ऑफिसमध्येही प्रत्येकाच्या टेबलावर जाऊन अवाच्यासवा गप्पा मारून दत्तूकाकांनी सर्वांना मेटाकुटीस आणले आहे.


जवळच्या गावाला राहणारी आमची नबूआत्यादेखील अशीच. केव्हातरी अचानक बॅग घेऊन हजर होते. आल्यापासून तिच्या तोंडाचा पट्टा सुरू होतो तो जाईपर्यंत ! एकदा तर बॅग घेऊन परत जायला निघाली. वाटेत तिला तिच्या बालपणीची मैत्रीण भेटली. तिच्याशी गप्पा मारण्यात ही इतकी रंगली की, तिची चक्क गाडीच चुकली. 


मग काय विचारता ! नबूआत्याने बॅग घेऊन हसत हसत परत घरात प्रवेश केला. तेव्हा मात्र आम्ही साऱ्यांनी कपाळाला हातच लावला. एकदा मी मुंबई-पुणे प्रवास करत होतो. अचानक घाटात गाडी बंद पडली. बराच काही बिघाड झाला असावा. 


मी केव्हाचा लांब चेहरा करून बसलो होतो. इतक्यात, शेजारी बसलेल्या काकांनी माझ्या पाठीवर थाप मारली. मला हाताला धरून ओढत म्हणाले "चला, खाली उतरू या." खाली उतरल्यावर एका दगडाकडे हात दाखवत ते म्हणाले "बसा बाळोबा; तुम्हांला एक मजा सांगतो. 


एकदा काय झालं आम्ही शिकारीला निघालो होतो. दाट जंगल, रात्रीची वेळ आणि अचानक आमची जीप बंद पडली..." मी कान टवकारले. पुढे तास-दीड तास काका वेगवेगळ्या विषयांवर कितीतरी बोलतच राहिले. त्यांची सांगण्याची शैली अशी की, ते चित्तथरारक प्रसंग मी जणू काही प्रत्यक्षच अनुभवतो आहे, असे वाटत होते. 


त्या दिवशी माझे तास-दीड तास मनोरंजन तर झालेच, पण माझ्या ज्ञानातही भर पडली. गप्पिष्ट माणसांचे असे निरनिराळे नमुने आपल्याला भेटत असतात. काही माणसांबरोबर गप्पा मारताना मनोरंजनाबरोबर आपल्या ज्ञानातही भर पडते. तर काही गप्पिष्ट माणसे तापदायक ठरतात. 


कसेही असले तरी गप्पा मारूच नयेत असे मात्र मुळीच नाही. आयुष्यात नेहमीच तोलूनमापून बोलावे असेही नाही. बोलण्यात थोडा सैलपणा हवाच. तो आपला विरंगुळा असतो, पण त्या गप्पांना ताळतंत्र मात्र नक्कीच हवा. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद