गर्दी : काही अनुभव मराठी निबंध | GARDI : KAHI ANUBHAV MARATHI NIBANDH

 गर्दी : काही अनुभव मराठी निबंध | GARDI : KAHI ANUBHAV MARATHI NIBANDH 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण गर्दी : काही अनुभव मराठी निबंध बघणार आहोत. शहरे वाढली, लोकसंख्या वाढली आणि साधने अपुरी पडू लागली. रस्ते अरुंद भासू लागले. माणसांची अतोनात गर्दी झाली. गर्दी वाढू लागली की घुसाघुशी सुरू होते. 


एरवी अत्यंत गंभीर, शिस्तशीर असणाऱ्या माणसाच्या ही मनात एक मिस्कील पोर दडलेले असते. त्यालाही त्या गर्दीत ढकलाढकली करावीशी वाटते. 'गर्दी' जमायला जशी वेगवेगळी कारणे असतात, त्याप्रमाणे प्रत्येक गर्दीची प्रकृतीही वेगळी असते. गर्दी कोठे नसते? अगदी देवाच्या मंदिरातही गर्दी असते. 


तासन्तास रांगेत उभा राहिलेला भक्त देवाच्या गाभाऱ्यात प्रवेश करतो तो गर्दी करूनच; पण ती गर्दीही कशी असते? भक्तिरसात ओथंबलेली. प्रत्येक जण 'परमेश्वरमय' झालेला. मग तेथे लागलेल्या धक्क्यांचे दुःख होत नाही. उलट आपल्या लाडक्या भगवंताने आपल्याला कवटाळले आहे असेच त्याला भासते. 


या गर्दीत अडकलेला प्रत्येक जण गर्दीत असूनही एकटा असतो; कारण आपल्या लाडक्या दैवताचेच अस्तित्व तो फक्त जाणत असतो. मुंबईसारख्या शहरात राहायचे म्हणजे लोकलशी संबंध येणारच आणि मग तेथे आपल्याला गर्दी ही भिडणारच ! 


मुंबईकर अशा गर्दीला सरावलेला असतो; पण एखादया पाहुण्याचे हाल अवर्णनीय असतात. यापूर्वी कधी न आलेले अनुभव तो घेतो. क्वचित गर्दी त्याच्या खिशाचा भारही हलका करते !


कधी ही गर्दीही विलक्षण भारावून जाते. नुकताच आलेला अनुभव. महाराष्ट्रातील एक लाडका साहित्यिक आजारी होता. मरणाशी झुंजत होता. दोन दिवस-तीन रात्री. रुग्णालय एका गर्दीच्या रस्त्यावर; पण त्या रस्त्यावरही चिंतातुर गर्दी जमत होती. वाहने अडकत होती. 


मंद गतीने जात होती. आवाज नाही की चिडाचीड नाही. त्यातच त्या साहित्यिकाचे निधन झाले आणि गर्दी आणखीन वाढली; पण कुठेही गडबड नाही- गोंधळ नाही. साश्रुनयनांनी गर्दी पुढे सरकत होती. कधी हीच गर्दी क्षुब्ध होते. 


तिचा सारासार विचार संपतो. मग गर्दीत हुल्लड माजते. मोडतोड, जाळपोळ यांचा आधार घेते. नागपूरला स्वकियांना तुडवणारी, शेकडो माणसांच्या मृत्यूला कारण झालेली आणि कुंभमेळ्यात रौद्ररूप धारण करणारी गर्दी ही विवेक हरवलेली गर्दीच नव्हे काय!


जीवनाचे कोणतेच क्षेत्र गर्दीविना नाही. त्यातून जन्माला येते बेकारी आणि वैफल्य! रिकामे डोके, रिकामे हात विद्रोह स्वीकारतात. मग ती गर्दी भयानक रूप धारण करते. गुन्हेगारी नाना रूपांनी फोफावते. अशी ही गर्दी माणसाला पावला-पावलावर भेटत असते आणि त्याचे मुख्य कारण म्हणजे पृथ्वीतलावरील, विशेषतः आपल्या देशातील वाढलेली लोकसंख्या. 


एक अब्जावर आपण गेलो ! कितीही धान्य उगवले, कितीही तयार केले तरी सर्वांना कसे पुरे पडणार? शेतीवर भागत नाही म्हणून माणसांचे लोंढे शहरांकडे धाव घेतात. झोपडपट्ट्यांची वाढ होते. माणसे पदपथांवर, रस्त्यावर, रेल्वेस्टेशनांवर, गटारांवर, जिथे मिळेल तिथे संसार थाटतात. वायुप्रदूषण, जलप्रदूषण, कचऱ्यांचे डोंगर यांमुळे अनारोग्य थैमान घालते. 


याचे भोग फक्त गरिबांच्याच वाट्याला येतात असे नाही. रोगराईच्या विळख्यात सर्वच माणसे सापडतात. जीवन असह्य होते. जिथे गर्दी तिथे आता हे अपरिहार्य आहे. अनिवार्य आहे. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद