गर्दीचा भस्मासुर मराठी निबंध | GRDICHA BHASMASUR MARATHI NIBANDH

 गर्दीचा भस्मासुर मराठी निबंध | GRDICHA BHASMASUR MARATHI NIBANDH 

 नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण गर्दीचा भस्मासुर मराठी निबंध बघणार आहोत. नाशिकच्या कुंभमेळ्याची चित्रे दूरदर्शनवर पाहात होतो. माणसांचा महासागरच जणू तेथे उसळला होता. गर्दीचे पेव जणू फुटले होते. असा अनुभव आपल्याला अनेकदा येतो. आषाढीला चंद्रभागेच्या वाळवंटावर अशीच गर्दी लोटते. 


ओरिसात कृष्ण, बलराम, सुभद्रा यांचे रथ ओढताना अशीच गर्दी उसळलेली असते. क्षणभर मनात भीती वाटते. ही गर्दी प्रक्षुब्ध झाली तर? गर्दीचेही मानसशास्त्र असते. सर्वसामान्य माणूस एकटा असताना जे कृत्य करणार नाही, ते तो गर्दीत करून मोकळा होतो. मग घरे पेटवली जातात; वाहनांची नासधूस होते; कुणाचा जीवही घेतला जातो.


अशा गर्दीला ताब्यात आणण्यासाठी मग त्याहून जहाल उपाय योजावे लागतात. गर्दीचा भस्मासुर सध्या आपल्या देशात अधिराज्य गाजवत आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे आपल्या देशात झालेला लोकसंख्येचा विस्फोट. भारताच्या लोकसंख्येने अब्जाची सीमा ओलांडली आहे. त्यामुळे सध्या ही गर्दी आपल्या देशाची प्रकृती झाली आहे.


जीवनात असे कोणतेही क्षेत्र राहिले नाही की तेथे गर्दी नाही. गेल्या शतकात आपल्या देशातील विचारवंतांनी ज्ञानप्रसारासाठी धडपड केली. पण आजची स्थिती काय आहे? शाळा-महाविदयालयांचे निकाल जाहीर झाले की, पुढील प्रवेशांसाठी रांगा लागतात. 


आपल्याला हव्या त्या महाविदयालयात, हव्या त्या शाखेला प्रवेश मिळेल याची शाश्वती नसते. इतकेच कशाला, तीन वर्षाच्या मुलाला के. जी.त प्रवेश घेण्यासाठीसुद्धा रात्रीपासून रांग लावावी लागते.


शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरी-व्यवसायाचा प्रयत्न करायचा तर तेथेही गर्दी. मोठमोठ्या शहरांतून राहायला जागा नाही; कारण तिथेही गर्दी. चित्रपट, नाटक, क्रीडांगण अशा मनोरंजनाच्या जागीही तिकीट सहजगत्या मिळत नाही. कारण तेथेही गर्दी. 


देवाच्या दर्शनासाठीही लांबच लांब रांगा. मग तेथे अधिक पैसे देऊन प्रवेश मिळवावा लागतो. या गर्दीमुळे येतो भ्रष्टाचार, काळा बाजार. गरजू माणसे आणि उपलब्ध साधने यांच्या असमतोलातूनच भ्रष्टाचार फोफावतो.


ही गर्दी एकटीदुकटी येत नाही. तिच्याबरोबर इतरही अनेक 'नकोशा' गोष्टी येतात. भक्तीच्या ओढीने लोक जमतात, गर्दी करतात. मग तेथे अस्वच्छता निर्माण होते. नकळत रोगराई, कॉलऱ्यासारख्या साथी पसरतात. गर्दीबरोबर येणारी ही महामारी माणसांच्या जीवाला घातक ठरते. 


शहरांतील गर्दी, वाहनांची गर्दी पर्यावरणाचा समतोल बिघडवते आणि प्रदूषणाला आमंत्रण देते. महाविदयालये, नोकऱ्या येथील गर्दी भ्रष्टाचाराला आमंत्रण देते, तर चित्रपटगृहे, नाट्यगृहे येथील गर्दी 'काळ्या बाजाराला' उत्तेजन देते. 


गर्दीच्या सोबत असते गुन्हेगारी. गर्दीत खिशातून पाकीट मारले जाते, स्त्रियांच्या गळ्यातील अलंकारावर हात चालवला जातो. गर्दीत गुंड, समाजकंटक यांचे फावते. गर्दीत गोंधळ उडाला तर धावणाऱ्या माणसातील मानव हरवतो. स्वत:चे प्राण वाचवण्याच्या प्रयत्नांत तो इतरांना खुशाल तुडवतो..


असा हा गर्दीचा भस्मासूर उन्मत्त झाला की, मानवातील देवदानवांना दे माय धरणी ठाय' असे होते. या गर्दीवर मात करण्यासाठी कोणती 'मोहिनी' आणायची असा प्रश्न आज सर्वांसमोर आ वासून उभा आहे. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद