खरा तो एकची धर्म मराठी निबंध | Khara To Ekachi Dharma Essay In Marathi

  खरा तो एकची धर्म मराठी निबंध |  Khara To Ekachi Dharma Essay In Marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  खरा तो एकची धर्म मराठी निबंध बघणार आहोत. विश्वामध्ये एकच जात आहे - मानवतेची एकच धर्म आहे - प्रेमाचा एकच भाषा आहे - हृदयाची आणि एकच परमेश्वर आहे - सर्वव्यापी ज्यामुळे समाजाची धारणा होते तो धर्म. धर्म हा एकच आहे. पण या जगात तो विविध रूपांनी प्रकट होतो. 'आत्मज्ञानाद्वारा आत्मसुख' हेच सर्व धर्माचे अंतिम साध्य.


१) हिंदू धर्म - स्वामी विवेकांनद म्हणाले होते, “जो धर्म समस्त जगताला 'सहिष्णुता' आणि 'सर्वच मतांना मानणे' या दोहोंचीही निरंतर शिकवण देत आला आहे. त्या धर्मात जन्मास आल्याबद्दल मला गौरव वाटतो


जगातील सर्वात पुरातन अशा हिंदू धर्माचा कोणीही प्रेषित नाही. हजारो ऋषिमुनी, संतमहंत, बोधिसत्त्व यांच्या श्रेठ अनुभवांचा या धर्माने आदर केला. हिंदू धर्मग्रंथात कोठेही अस्पृश्यता नाही. सर्वांना उपासना स्वातंत्र्य आहे. प्रत्येक हिंदूसाठी सहा आचार सांगितले आहेत. १) ॐ धारणा २) सूर्योपासना ३) इष्टदेवतादर्शन ४) स्वाध्याय ५) तुलसीपूजन ६) गीतोपदेश.


“दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्मसूर्ये पाहो । 

जो जे वांछील तो ते लाहो, प्राणि जात ॥" 

याहून सर्वश्रेष्ठ मागणं कोणतं असू शकतं?


२) जैन धर्म - "धर्म ही उपदेश करण्याची वस्तू नसून आचरणात आणण्याची गोष्ट आहे." असं भगवान महावीर प्रतिपादन त्या काळी उच्चनीचवाद, जातिभेद, हेवेदावे यामुळे समाजव्यवस्थेला तडे गेले होते. या अवनतिपंकातून त्याला वर काढण्यासाठी जैन धर्माची स्थापना झाली. भगवान महावीरांनी बहुजन समाजाला पंचमहाव्रतांचे पालन करण्यास सांगितले. १) अहिंसा २) सत्य ३) अचौर्य ४) ब्रह्मचर्य ५) अपरिग्रह.


३) बौद्ध धर्म सगळ्या जगाचे प्रकाशदाता, प्रेमाचे आणि भूतदयेचे मूर्तिमंत अवतार, कर्मयोगी भगवान बुद्ध, वार्धक्य, व्याधी नि मृत्यू या दारुण दृश्यांनी अंतःकरण विदीर्ण झालेल्या सिद्धार्थाने सर्वसंग परित्याग केला. सहा वर्षांच्या उग्र


साधनेनंतर त्याला चिरवांच्छित ज्ञानाची प्राप्ती झाली. बौद्धधर्म उदयास आला. गौतम बुद्धांनी सामान्य जनांना ‘पंचशीला' चे आचरण करण्यास सांगितले. १) प्राणिमत्रांची हिंसा करु नये. २) चोरी करु नये ३) व्यसनात गुंतू नये ४) खोटं बोलू नये ५) व्यभिचार करू नये.


४) पारशी धर्म - सुमारे २५०० वर्षांपूर्वीचा काळ. नुराणी लोकांच्या टोळधाडी यायच्या. इराणी शेतकऱ्यांना छळायच्या. त्यांची गुरंढोर पळवायच्या. दयाळू हृदयाचा झरतुष्ट्र त्यांच्या मदतीला धावून जायचा. ईश्वराकडून मिळालेल्या ज्ञानाचा प्रचार करण्यासाठी भ्रमंती करायचा.


वैदिक धर्माशी संलग्न असा पारशी धर्म त्याने स्थापन केला. एकेश्वरवादाचा पुरस्कार, जुन्या रूढींविरुद्ध प्रचार आणि विचारस्वातंत्र्यावर भर हे या धर्माचे विशेष.


५) शीख धर्म - हिंदू मुसलमान यांच्यातील तेढ कमी व्हावी, दोघांना प्रेमाच्या बंधनात बांधावे या हेतूने गुरु नानकांनी शीख पंथाची स्थापना केली. “परमेश्वर एकच आहे, तो कुठल्याही धर्माचा नाही' असं ते सांगत. तसेच सत्य आचरण, सुसंस्कार व सत्संगतीचं महत्त्व लोकांना पटवून देत.


६) इस्लाम धर्म - 'खुदाचा फरिश्ता' नि इस्लाम धर्माचे संस्थापक महंमद पैगंबर म्हणायचे, "चमत्कार पाहायचा असेल तर माझ्याकडे पाहा. माझ्यासारखा एक अडाणी, निरक्षर माणूस तुम्हाला ज्ञान देतो, सद्धर्म सांगतो हा एक चमत्कारच नव्हे का ?"


महंमद पैगंबर लोकांना शिकवण देत. १) पापभीरू असावे. २) परोपकारासाठी धन खर्च करावे. ३) स्वदोष जाणावे, परदोष पाहू नये. ४) क्षमाशील असावे. ५) लोभ करू नये.६) सदाचरणी असावे ७) क्रोधाचा त्याग करावा. ८) लोकांची तामस प्रवृत्ती माहीत असली तरी प्रकट करू नये.


७) ख्रिश्चन धर्म “मी आणि स्वर्गीय पिता एकच आहोत, माझ्याकडे या म्हणजे मी तुमचं ओझं हलकं करीन आणि तुम्हाला चिरकालीन शांती देईन." असं येशू ख्रिस्त लोकांना सांगे आणि लोकही त्याच्या भोवती गोळा होत. येशूची शिकवण होती. १) विनय, दया, क्षमा, शांती इत्यादी गुणांची प्राप्ती करावी. शत्रूवरही प्रेम करावे. ३) निरपेक्ष असावे. ४) कटू शब्द बोलू नये.


“माता ' कभी 'कुमाता' नही हो सकती तद्वत् 'धर्म'ही 'कुधर्म' होऊ शकत नाही. पृथ्वीच्या पाठीवरील कोणताही धर्म घ्या. दया, प्रेम, सत्य, सदाचार याचीच शिकवण देणार. अमृत एकच, धारण करणाऱ्या घटाचा आकार फक्त वेगळा.


"धर्म असे या धरतीवरचा कल्पतरू एक पर्ण, फुले नि फळे सारखी शाखा मात्र अनेक कशास भांडण, कशास तंटा, आपण सारे भाऊ फळे चाखू या सुख, शांतीची आनंदे गाऊ" 'जगाला प्रेम अर्पावे' हा साने गुरुजींचा धर्मही हेच सांगतो ना ! मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद