लोकशिक्षणाचे माध्यम- दूरदर्शन मराठी निबंध | Lokshikshanache Madhyam Doordarshan Essay In Marathi

 लोकशिक्षणाचे माध्यम- दूरदर्शन मराठी निबंध | Lokshikshanache Madhyam Doordarshan Essay In Marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण लोकशिक्षणाचे माध्यम- दूरदर्शन मराठी निबंध बघणार आहोत. राष्ट्र प्रगत केव्हा ठरते? जेव्हा त्या राष्ट्रातील जनता सुविदय आणि सुसंस्कारित असते तेव्हाच. त्यामुळे 'लोकशिक्षण' ही राष्ट्राची अनिवार्य गरज ठरते. 


लोकशिक्षणाची अनेक माध्यमे आहेत. व्याख्याने देणे, नाटक, चित्रपट यांतून चर्चा करणे, नभोवाणीचे कार्यक्रम यांतून लोकशिक्षण सतत चालू असते. लोकशिक्षणाचे सर्वात प्रभावी माध्यम म्हणजे दूरदर्शन. आजकाल आपल्या देशात दूरदर्शन हे घरोघरी जाऊन पोहोचले आहे. 


अगदी बंगल्यापासून झोपडीपर्यंत सगळीकडे दूरदर्शनचे स्वागत होते. त्यामुळे दूरदर्शनवर सांगितलेली गोष्ट देशात सगळीकडे पोचते. शिवाय दूरदर्शन हे दृक्श्राव्य माध्यम असल्यामुळे त्याचा परिणाम चटकन होतो. एखादी गोष्ट नुसती ऐकण्याऐवजी ती प्रत्यक्ष पाहिलीही जाते. 


त्यामुळे त्याचा प्रेक्षकावर सर्वांत अधिक प्रभाव पडतो. ज्ञान, मनोरंजन आणि प्रबोधन ही दूरदर्शनची तीन उद्दिष्टे असतात. त्यापैकी 'प्रबोधन' हे नक्कीच दूरदर्शनने साधले जाते. इतर कोणत्याही माध्यमापेक्षा चटकन आणि चांगल्या प्रकारे.


दूरचित्रवाणीने लोकशिक्षण किती आणि कसे होते याचा हा एक नमुना पाहा. लहान बाळाला डायरिया झाला की त्याला 'ओआरएस्' म्हणजे जलसंजीवनी दयायची. हे आता झोपडीत राहणाऱ्या मातेलाही माहीत असते. बालक सुदृढ राहावे म्हणून लहानपणी त्याला कोणकोणती औषधे दयावी लागतात; ती केव्हा दयायची; हे शंभर व्याख्याने देऊन पटले नसते-ते दूरदर्शन सांगते, त्यामुळे एकदम पटते. 


'पोलिओचा डोस' दिला नाही तर आपला बाळ अपंग होईल हे मनाला भिडते आणि मग झोपडीत राहाणाऱ्या त्या अशिक्षित माता एकत्र येऊन आपल्या बाळांना केंद्रावर घेऊन जातात. कारण पोलिओ झालेल्या मुलाची अवस्था त्यांनी प्रत्यक्ष पाहिलेली असते. 'लहान कुटुंब, सुखी कुटुंब' हा सुखाचा मूलमंत्रही दूरदर्शनने सर्वत्र नेऊन पोचवला आहे.


दूरदर्शन लोकशिक्षण प्रभावीरीत्या करतेच. पण ते एकाचवेळी फार विस्तृत समाजापर्यंत जाऊन पोचते. 'गाडगेबाबा स्वच्छ सुंदर ग्राम योजना ' फार लवकर खेडोपाडी जाऊन पोचली ती दूरदर्शनमुळेच. दूरदर्शनच्या विविध वाहिन्यांवर होणाऱ्या अनेक कार्यक्रमांद्वारे आज लोकशिक्षण केले जाते.


सह्याद्रीवरील 'आमची माती आमची माणसं', तर ई टी. व्ही.वरचा 'अन्नदाता' घरबसल्या शेतकऱ्यांना शेतीविषयक विपुल माहिती देतो. 'कामगार-विश्व' या कार्यक्रमातून कामगारांपुढे त्यांचे प्रश्न मांडले जातात. त्यांनी कसे वागावे, उत्पादन कसे वाढवावे, ही सारी माहिती हसतखेळत दिली जाते.


दूरदर्शन कथा, कविता, नाटक यांतून अनेक गोष्टी प्रेक्षकांपर्यंत पोचवू शकते. मराठीतील उत्कृष्ट साहित्याचा आविष्कार मालिकांतून प्रेक्षकांसमोर मांडला जातो. असा अनुभव आहे की दूरदर्शनवर एखादी मालिका गाजली, लोकप्रिय झाली की ती ज्या पुस्तकावरून घेतली असेल त्या पुस्तकाची मागणी ग्रंथालयात व दुकानात वाढते.


दूरचित्रवाणीवरच्या कार्यक्रमातून अनेक मोठ्या व्यक्तींची ओळख सर्वसामान्यांना होते. एखादी साथ आली असेल वा कुठे पुरासारखे संकट आले असेल तर दूरदर्शनवरून लोकांना सावध करता येते.


दूरदर्शनवर लहान मुलांसाठी मनोरंजनाचे विविध कार्यक्रम होतात. त्यांत मुलांना भाग घ्यायला मिळाल्याने त्यांच्यात सभाधीटपणा येतोच आणि त्यांचे सामान्यज्ञानही वाढते. शैक्षणिक कार्यक्रम हे शालेय अभ्यासाला पूरक ठरतात; पण प्रश्नमंजुषासारखे कार्यक्रम त्यांच्या बुद्धीला चालना देतात.


अशा विविध मार्गाने दूरदर्शन हे लोकशिक्षणाचे प्रभावी काम करत असते. पण त्याचवेळी एक सावधानता बाळगली पाहिजे की ज्याचा जनमानसावर अयोग्य परिणाम होईल, ज्यातून अंधश्रद्धेला वाव मिळेल असे कार्यक्रम काळजीपूर्वक दूरदर्शनने टाळलेच पाहिजेत. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद