माझ्यातील गुणदोष मराठी निबंध | MAZYATIL GUNDOSH MARATHI NIBANDH

 माझ्यातील गुणदोष मराठी निबंध | MAZYATIL GUNDOSH MARATHI NIBANDH

 नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  माझ्यातील गुणदोष मराठी निबंध बघणार आहोत. काय ? स्वतःचे गुण स्वतःच्याच तोंडानी (लेखणीनी) सांगायचे? आपणच आपली आरती ओवाळायची? आत्मस्तुतीने जीभ विटाळायची? स्वगुणांचा डांगोरा पिटायचा ?


'आपुली आपण करी स्तुती, तो एक मूर्ख' असं समर्थ ठणकावून सांगत असता कानात बोटे घालून बसायचे ? छे ! छे आपले गुण प्रदर्शनाचा विषय नाही, जाहिरातीचा तर मुळीच नाही. आणि स्वतःचे दोष तरी कसे सांगावे ? आडपडदा न ठेवता, पक्षपात न करता? 'दुसऱ्यांच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही' 


हा तर मानवी स्वभाव ! मी याला अपवाद कशी असणार ? 'विरला जानन्ति गुणान्!' म्हणजे दुसऱ्यांचे गुण जाणणारे लोक विरळ असतात पण माझ्या मते 'विरला जानन्ति स्वदोषान् !' मग स्वतःच्या पायाखाली काय जळत आहे ते मला दिसेल ?


आणखी एक धोक्याची जागा ! गुण सांगताना मनाचा अश्व बेलगाम धावेल आणि दोष सांगताना टाच मारली तरी एकही पाऊल पुढे टाकणार नाही. गुणवर्णन करताना शब्द, वेळ अपरा पडेल आणि दोषांचे वर्णन करताना शब्द मूक होतील. 'मौनं सर्वार्थसाधनम्', 'झाकली मूठ सव्वा लाखाची' या वचनांचं स्मरण होत राहील.


विषय कठीण आहे खराः पण त्या निमित्ताने आत्मपरीक्षण तर होऊन जाईल! या सुज्ञपणाच्या विचारातून हा लेखनप्रपंच ! 'अयोग्यो पुरुषो नास्ति' असं कोणा महाभागाने लिहून ठेवले आहे. प्रत्येकाजवळ काही ना काही गुण असतोच. टाकाऊ, निरुपयोगी असं कोणीच नाही असा त्याचा अनुभव. सांगायला संकोच वाटतो पण माझ्यातही काही चांगले गुण असणारच की हो !


माझं मन आहे फुलपाखरासारखं! आनंदी, निष्कपट, स्वच्छंद ! लहानपणापासून आजतागायत हट्ट केल्याचं स्मरत नाही मला. समाधानाचा हा वारसा आईवडिलांकडून आला आहे. माझ्या प्रेमळ आजीने ध्रुव, प्रल्हादाच्या गोष्टी सांगून देवभक्तीचे संस्कार माझ्यावर केले. 'संवेदनशीलता' हाही माझ्या स्वभावाचा विशेष. 


दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी पाहिलं की माझ्याही डोळ्यात गंगायमुना गर्दी करणार ! भांडणाचा मला मनापासून तिटकारा ! त्यामुळे मनमिळाऊ वृत्ती अंगी उपजतच आहे. माझी अभिरूची चांगली आहे आणि त्याबद्दल मला रास्त अभिमान आहे. 


दूरदर्शनवरील पाचकळ मालिका आणि फालतू चित्रपट मला मुळीच पसंत नाहीत. अभ्यासाबरोबर खेळ, पाककला, नाटक, गायन, वाचन इत्यादी गोष्टीतही मला रस आहे. माझ्या या गुणांचं श्रेय आईवडिलांचं, गुरुजनांचं आहे हे निर्विवाद !


माझा सर्वात मोठा दुर्गुण म्हणजे लहरीपणा. मनात असलं तर कामाचे डोंगर उपसीन नाही तर इकडची काडीही तिकडे करणार नाही. त्यामुळे 'जो माझ्यावरी विश्वासला, त्याचा कार्यभाग बुडाला' असा कधी कधी अनुभव येतो. चंचलपणासाठी तर मी कायम बोलणी खाते. 


कोणतंही काम एका जागी, दीर्घकाळपर्यंत बसून करणं माझ्या स्वभावात नाही. तीन तास परीक्षेच्या हॉलमध्ये बसून पेपर सोडविणं ही मला शिक्षा वाटते. मी शिक्षिका वगैरे झाले तर हा अवधी कमी करण्यासाठी जरुर खटपट करेन.


'आत्मविश्वासाचा अभाव' हे एक पिशाच्च मला नेहमीच भेडसावत असतं. 'पाण्याने भरलेली बादली आपल्याला उचलेल की नाही?' इथपासून ‘इंग्रजी माध्यम मला झेपेल की नाही ?' इथपर्यंतच्या प्रत्येक प्रश्नाला नकारार्थी उत्तर देणारा आणि माझा ‘आत्मविश्वासघात' करणारा हा माझा कट्टर शत्रू ! त्याला आयुष्यात केव्हातरी नामोहरम करावं लागणार आहे.


आणि माझा भित्रेपणा तर जगजाहीरच आहे. पालीची भीती, झुरळाची भीती, कुत्र्याची भीती, एकटीने बाहेर जायची भीती आणि वर्गात उत्तरं द्यायचीही भीती ! परवा गंमतच झाली. गीतेचा अध्याय पूर्ण पाठ असल्यामुळे माईकसमोर उभं राहण्याची हिंमत केली आणि अशी काही बोबडी वळली अस्मादिकांची ! तर एकंदरीत ‘अशी मी, असामी'


खरं खरं ते सांगितलं, खोटं खोटं ते टाळलं. बाकी काही म्हणा ! निबंधाच्या विषयानी झणझणीत अंजन घातलंय माझ्या डोळ्यात. स्वतःचे दोष कमी करण्याचा आणि नवनवीन गुणांचे संपादन, संवर्धन करण्याचा मी मनाशी निश्चय केला आहे. “जनी निंद्य ते सर्व सोडूनी द्यावे जनी वंद्य ते सर्व भावे करावे" खरं ना ? मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद