शक्ती गौरव मराठी निबंध | Shakti Gaurav Essay in Marathi

 शक्ती गौरव मराठी निबंध | Shakti Gaurav Essay in Marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण शक्ती गौरव मराठी निबंध बघणार आहोत. 


अश्वं नैव गजं नैव व्याघ्रं नैव च नैव च। 

अजापुत्रं बलिं दद्यात् देवो दुर्बलघातकः॥


यज्ञाच्या वेळी घोडा हत्ती किंवा वाघाचा बळी दिला जात नाही. कारण ते बलवान आहेत. पण बोकड दुर्बल असल्यामुळे त्याचा मात्र बळी दिला जातो. खरच ज्याच्याजवळ शक्ती नाही अशा माणसाचा सर्वजण उपहास करतात. अपमानित, परावलंबी जिणं त्याच्या वाट्याला येतं. 


बलवान व्यक्ती त्याच्यावर अधिकार गाजवितात 'कोण पुसे अशक्ताला' या शब्दातून समर्थांना हेच सुचवायचे आहे. बलवंतांच्या लेखी त्याची किंमत शून्य. तो तुच्छ, शूद्र, टाकाऊ. कोणीही त्यावर अन्याय करावा. 'good for nothing' अशा शब्दात त्याची अवहेलना केली जाते. 


'बळी तो कान पिळी' या न्यायानुसार शक्तिमान लोक त्याच्यावर हुकुमत गाजवितात. त्याला गुलाम बनवितात. आत्मविश्वासशून्य अशा त्याचा समाजाला काडीचाही उपयोग नसतो. सर्व वैभव पायाशी लोळण घेत आहे पण ते उपभोगण्याची शक्ती नसेल तर त्याच्यासारखा करंटा तोच. 


समोर पंचपक्वान्नांचे ताट आहे पण मधुमेहाने ग्रासलेले असावे किंवा षड्रस भोजनाची सिद्धता असताना, कावीळ झालेली असल्यामुळे अन्नाला हातही लावण्याची हिंमत होऊ नये याच्यासारखं दुर्दैव ते कोणतं? चणे आहेत पण दात नाहीत अशी त्याची केविलवाणी अवस्था असते. 'लोक खाती, आपण पाहतो दैन्यवाणा' अशा दुर्बलाची कीव करावी तेवढी थोडीच.


बलहीन व्यक्तीचे मनोरथ किंबहुना त्याचं संपूर्ण आयुष्यच धुळीला मिळतं. न्याला स्वप्नं रंगविण्याचाही फुकटचा अधिकार नाही. वाळवंटातील नदीप्रमाणे सुकून जाणंच त्यांच्या (स्वप्नांच्या) नशिबी असतं. ती साकार होणं कालत्रयी शक्य नाही.


दुर्बलता ही यशाच्या मार्गातील धोंड आहे. प्रपंचात शक्तिहीन शरीर कामाचं नाही, पण परमार्थातही ते कुचकामाचं आहे. व्यक्तीचं क्षेत्र कोणतेही असो अंगी बळ असल्याविना काहीच पदरात पडत नाही. आज आमचं जीवन अर्थप्रधान झालं आहे तरीही निव्वळ संपत्तीच्या जोरावर काहीही मिळू शकतं अशा भ्रमात कोणीही राहू नये. 


फक्त बुद्धिसानानेही काही साधण्यासारखं नाही. कारण शक्तीविना बुद्धी म्हणजे आंधळ्याच्या हातातील दिवा.,समर्थ रामदास स्वामींनी शक्तीचं हे महत्त्व ओळखलं होतं. गावोगावी महाबली हनुमानाची स्थापना करून बलोपासनेचा संदेशच त्यांनी लोकांनी दिला. 


लोकमान्य टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच' ही शपथ घेतली. पण परकीय शक्तीशी झुंज द्यायची म्हणजे मनाबरोबर तनही कणखर पाहिजे. हे जाणून, व्यायामाने शरीर, सुदृढ बनविले.


 'Healthis Wealth' म्हणतात ते अक्षरशः खरं आहे. कृष्ण, बलराम यांनी मल्लविद्येत महाकाय राक्षसांचा पराभव केला. कुस्ती खेळून गोपालांना सशक्त बनविले. श्री गजानन महाराजांनी हरी पाटलाला, शेगावच्या लेकरांना सशक्त करण्याचे आवाहन केले आणि पहिली संपत्ती शरीर' हा बोध केला.


शक्तीला युक्तीची जोड मिळाली तर दुधात साखर, 'शक्ती युक्ती जये ठायी, तेथे श्रीमंत धावती' या पंक्तीतून समर्थांना हेच अभिप्रेत आहे. शक्ती आणि युक्तीचा मधुर संगम छत्रपती शिवाजी महाराजांच्या ठिकाणी झाला होता म्हणूनच स्वराज्य स्थापनेचं त्यांचं स्वप्न साकार झालं. 


वानर बलशाली असल्यामुळे रामाला त्यांच्या सहकार्याने सागरावर सेतू बांधता आला. बलवान राष्ट्रे दुर्बल राष्ट्रावर आक्रमण करतात. अशी इतिहासाची साक्ष आहे. वर्तमानातील अनुभव आहे. असुर प्रबळ झाले की प्रत्यक्ष देवांनाही त्राहि भगवान' करून सोडतात हे पुराणातील कथांमधून वाचायला मिळते. 


दुसऱ्यांवर आक्रमण करण्यासाठी नाही तरी परकीय आक्रमणापासून स्वतःचा, देशाचा बचाव करण्यासाठी तरी शक्तीची उपासना करणे आवश्यक आहे. "उद्यम, साहस, धैर्य, बुद्धी, शक्ती नि पराक्रम या सहा गोष्टी ज्याच्याजवळ आहेत त्यालाच परमेश्वर मदत करतो" असं सुभाषितकार सांगतात.


“बळ राक्षसाचं असावं, पण कृती मात्र मानवाची असावी.” बलसंपन्न व्यक्तीने उन्मत्त होऊ नये. आपल्या शक्तीचा उपयोग सत्कार्यासाठी, समाजाच्या भल्यासाठी, देशाच्या कल्याणासाठी व्हावा. साने गुरुजींनी बलशाली भारताचे स्वप्न पाहिले. आपण ते साकार करण्याचा प्रयत्न करू या आणि आशा करू या,


"बलसागर भारत होवो। 

विश्वात शोभूनी राहो ॥"


मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद