श्रावणमासी हर्ष मानसी मराठी निबंध | Sharavanmasi Harsh Mansi Essay In Marathi

 श्रावणमासी हर्ष मानसी मराठी निबंध | Sharavanmasi Harsh Mansi Essay In Marathi 


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण श्रावणमासी हर्ष मानसी मराठी निबंध बघणार आहोत. "हासरा नाचरा,जरासा लाजरा सुंदर साजरा, श्रावण आला" श्रावण ! सृष्टीचे एक मनोहर लेणे ! सर्वांना पुलकित करणाऱ्या या ऋतूची सारेच चातकासारखी वाट पाहत असतात. 


त्याच्या स्वागतासाठी चराचर सृष्टी उत्सक असते. हिरवळीने मखमली गालिचा अंथरला असतो तर प्राजक्ताने मुलायम पुष्पांच्या पायघड्या पसरल्या असतात. आकाशात सप्तरंगी इंद्रधनूचे तोरण बांधले जाते. श्रावणसरींना सामोरं जाण्यासाठी बगळ्यांची लगबग चालू असते. वृक्ष, वेली रंगीबेरंगी फुलांची उधळण करून आनंदोत्सव साजरा करतात. मेघांचा कडकडाट नि विजेचा गडगडाट फटाक्यांची आतषबाजी करीत असतात.


मृद्गंधाबरोबर केवडा, सोनचाफा, यांचा मनोरम गंध आसमंतात दरवळू लागतो. ग्रीष्म ऋतूत आटून गेलेल्या झऱ्यांना जीवनदान मिळते. ते आनंदाने बागडू लागतात नद्या झुळझुळू लागतात. शेतातील रोपे डोलू लागतात, पक्षी समूहगान गात असतात. 'श्रावण आला, श्रावण आला, नवजीवन घेऊनी'


ऊनपावसाचा लपंडाव मनाला मोहित करतो. क्षणार्धात आकाशात मेघांची दाटी होते. त्या श्यामल मेघांकडे पाहून मोर ( आणि मनमोरही) थुईथुई नाचायला लागतो. गोपाळाचा मंजुळ पाचा. रानावनात घुमू लागतो.


श्रावण म्हणजे सणांची रेलचेल ! नागपंचमीला बांधलेल्या हिंदोळ्यावर बसून रसिकांची मने आनंदाने डोलू लागतात. नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, जन्माष्टमी, पोळा इत्यादी सण आपली हजेरी लावून आनंद द्विगुणित करतात. रसिकाला वेड लावणाऱ्या या हिरव्या ऋतूचे मनोहारी रूप पाहून बालकवींसारखा निसर्गवेडा कवी अक्षरशः वेडा होतो. आणि श्रावणसरी बरसाव्या तशा त्याच्या लेखणीतून झरझर ओळी स्त्रवू लागतात. 'श्रावणमासी हर्ष मानसी'


रिमझिम बरसणाया रेशीमधारा पाहून सायाच प्रतिभावंतांच्या प्रतिभेला बहर येतो. या नवागताचे स्वागतगीत गाण्यात त्यांची अहमहमिका लागते. एक सुंदर कल्पना साकरते.


'आला श्रावण श्रावण, गुच्छ रंगांचे घेऊन । 

ऊन पावसाचे पक्षी, आणि ओंजळीमधून ।'


नववधूंच्या उत्साहाला तर या काळात उधाणच आले असते. सोमवारी शंकराला शिवामूठ वाहून भोळ्या शंकराजवळ प्रार्थना करतात, 'मला पती, सासूसासरे, दीरजावा सायांचे प्रेम लाभावे." मंगळवारी प्रिय सख्यांसह मंगळागौरीचे व्रत करतात. आणि अखंड सौभाग्याचे दान मागतात. रात्रभर झिम्मा, फुगडी, पिंगा इत्यादी खेळ खेळून मंगलमातेला जागवितात.


असा हा विविधरंगी ऋतू ! सर्वांना हवाहवासा वाटणारा ! श्रावणातील निसर्गाचे गीत गाणाया कवनांची गणती करणे शक्य नाही. अंबरीच्या चांदण्यांची मोजदाद का कुणी केली आहे? गीतकारांवर या लोभसवाण्या ऋतूने विलक्षण मोहिनी घातली आहे. 


चित्रपटात तर श्रावणमासाचा कौशल्याने उपयोग करुन घेतला आहे. कितीतरी कवींनी त्याला आपला काव्यविषय बनविले आहे. तरीही त्याचा महिमा सांगून संपलेला नाही. असाच एक श्रावणवेडा कवी या ऋतूबद्दल लिहीतो, 


"ऋतू हिरवा, ऋतू बरवा। 

पाचूचा वनी रूजवा ॥"

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद