शिक्षणक्रमात खेळाचे महत्त्व मराठी निबंध | SHIKSHANKRAMAT KHELACHE MAHATVA ESSAY MARATHI

शिक्षणक्रमात खेळाचे महत्त्व मराठी निबंध | SHIKSHANKRAMAT KHELACHE MAHATVA ESSAY MARATHI


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण शिक्षणक्रमात खेळाचे महत्त्व मराठी निबंध बघणार आहोत. खेळांचे जीवनातील स्थान शाळेच्या नव्या वर्षाचा पहिला दिवस होता तो! नवे वेळापत्रक मिळाले आणि एक चमत्कार आढळला. रोजच्या वेळापत्रकात दररोज एक तासिका खेळासाठी होती. 


खेळाची आवड असलेल्या आम्ही मुलांनी टुणकन उडीच मारली. पण वर्गातील स्कॉलर्सनी नाके मुरडली. 'त्यापेक्षा गणिताला तास अधिक दयावेत' असा त्यांचा आग्रह होता. मग काय, मधल्या सुट्टीत वाद रंगला. 'खेळ हवेत की नकोत?'


या हुशार पोरांची काही चूक नाही. वर्षानुवर्षे आमच्या मनावर बिंबविले गेले आहे, 'खेळता कसले? अभ्यास करा', 'खेळणारा म्हणजे उनाड', 'अभ्यास जमत नाही म्हणून खेळ सुचतात' असे शेरे मारले जातात. एखादा मोठा माणूस खेळताना आढळला तर काय ‘पोरकट' आहे, अशी त्याची उपेक्षा केली जाई. 


अगदी अलीकडेच खेळांकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात थोडा थोडा अनुकूल बदल होत आहे. प्रा. ना. सी. फडके यांनी आपल्या पोरखेळ' या लघुनिबंधात स्पष्ट सांगितले आहे की, जीवनात पोरखेळ हवेतच; कारण आपले तारुण्य टिकविण्याचे ते एक रसायन आहे.


मानवी जीवनात सर्वांत आवश्यक कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे 'आरोग्यमय शरीर'. कारण जर शरीर निरोगी नसेल तर दुसरी कोणतीही सुखे माणूस भोगू शकत नाही. 'सुखी माणसाचा सदरा' या कथेतील धनिकासारखी त्याची स्थिती होईल. 



निरोगी शरीरातच निरोगी मन वास करू शकते आणि निरोगी शरीर राखण्यासाठी जीवनात खेळांचे फार मोठे महत्त्व आहे. नियमित मोकळ्या हवेत खेळणाऱ्या व्यक्तीला दुसऱ्या कोणत्याही व्यायामाची वा पथ्यपाण्याची म्हणजे उच्चभ्रूच्या 'डायटिंगची' गरज भासणार नाही. 


असा उत्साही माणूस मग आपली इतर कामे मोठ्या तडफेने करू शकतो. जपान, चीन या देशांतून खेळ व व्यायाम यांना राष्ट्रीय महत्त्व देण्यात आले आहे. तेथे ठराविक वेळेला 'सायरन' वाजतो वा दूरचित्रवाणीवरून सूचना देण्यात येते आणि मग अधिकाऱ्यांपासून सर्वसामान्यांपर्यंत सर्वांना ठराविक व्यायाम करावाच लागतो.


आमच्याकडे मात्र याउलटच चित्र दिसते. खेळांविषयी आम्ही पूर्णतया निरुत्साही असतो. परिणामी आशियायी व ऑलिम्पिक खेळांत आपले खेळाडू टिकू शकत नाहीत. म्हणून आता नवीन अभ्यासक्रमात खेळांना स्थान देण्यात आले आहे. 


शारीरिक कसरत करणारी आपली स्पर्धक हायस्कूलच्या वरच्या वर्गात गेल्यावर अशा कसरतींना सुरुवात करते. तर चिनी, कोरियन मुलगी वयाच्या तिसऱ्या, चवथ्या वर्षांपासूनच कसरतींना सुरुवात करते. त्यामुळे तिचे अंग हवे तसे वळत असते. आता आपण ओळखले आहे की, अगदी पूर्वप्राथमिक शाळांपासून खेळांना स्थान दिले पाहिजे.


खेळांमुळे सहकाराची भावना वाढीस लागते. कारण आपल्या संघाला यश यायला हवे असते. तेथे वैयक्तिक गौरवापेक्षा संघाच्या गौरवाचा विचार करावा लागतो. खेळांमुळे चिकाटी हा गुण अंगी येतो. सातत्याने प्रयत्न करण्याची सवय लागते आणि हे सारे गुण पुढे रोजच्या जीवनात फार उपयोगी पडतात. 


खेळांमुळे अंगी ठसणारा एक महत्त्वाचा गुण म्हणजे हसत हसत अपयशाला सामोरे जाणे. खेळ म्हटला की, एकाला यश आणि दुसऱ्याला अपयश येणारच. अयशस्वी झालेल्या खेळाडूने वा पक्षाने यशस्वी झालेल्याचे प्रथम अभिनंदन करायचे हा खेळाचा नियम आहे. त्यामुळे खरा खेळाडू हा जीवनातील अपयशाकडेही खिलाडू वृत्तीने पाहू शकतो. 


शाळेत आजवर केवळ अभ्यासात हुशार असलेल्या मुलांचे कौतुक होत होते. त्याबरोबर आता खेळाडूंनाही योग्य महत्त्व मिळू लागले. शासनानेही आता योग्य पावले टाकली आहेत त्यामुळे पुढच्या काळात अनेक गावसकर, अनेक अमृतराज, अनेक मिल्खासिंग, अनेक पी. टी. उषा आपल्या देशात निर्माण होतील अशी आशा निर्माण झाली आहे. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता .  पुढील निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद


निबंध  2

शिक्षणक्रमात खेळाचे महत्त्व मराठी निबंध | SHIKSHANKRAMAT KHELACHE MAHATVA ESSAY MARATHI




'शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम्' असे एक वचन आपल्याकडे आहे. कोठलेही कार्य साधावयाचे असले तर शरीराच्या सुदृढतेची फार आवश्यकता असते. म्हणूनच आजकाल शाळांत आणि महाविद्यालयात


खेळांना महत्त्वाचे स्थान मिळू लागले आहे. शाळा म्हटली म्हणजे तेथे अभ्यास, शिक्षण हेच असले पाहिजे असा आजपर्यंतचा परिपाठ होता. खेळत बसणे म्हणजे वेळ वाया घालविणे असाही आजपर्यंत समज होता, परंतु आजकाल शाळा या केवळ पुस्तकी शिक्षण देणाऱ्या संस्था न राहता त्या जीवनाचे शिक्षण देणाऱ्या संस्था बनल्या आहेत. 


त्यामुळे खेळ, व्यायाम, हस्तव्यवसाय, चित्रकला अशा सर्व गोष्टींना शाळेत महत्त्व मिळू लागले आहे. विद्या किंवा शिक्षण ही जीवनातील एक बाजू झाली. विद्यासंपन्न होऊन मानव समाजात लोकांच्या आदराला पात्र होतो. त्याच्या शिक्षणाचा, विद्वत्तेचा समाजाला उपयोग झाला तरच ही गोष्ट होऊ शकेल.


त्यासाठी त्याला कष्ट करायला लागतील आणि यासाठी त्याला निकोप प्रकृती व सुदृढ शरीर आवश्यक आहे. जर आरोग्य चांगले नसेल तर त्या व्यक्तीला आपल्या शिक्षणाचा उपयोग समाजासाठी करून देता येणार नाही. म्हणून शरीर निरोगी राखणे महत्त्वाचे आहे. 


त्यासाठी व्यायाम आवश्यक आहे. हा व्यायाम आपल्याला खेळांमुळे मिळतो. म्हणून खेळाला जीवनात व शिक्षणक्रमात महत्त्वाचे स्थान आहे. खेळाचे इतरही फायदे असतात. खेळांमुळे सहकाराची भावना वाढीस लागते. आपल्या संघालाच यश मिळायला हवे या भावनेने, संघभावनेने खेळ खेळले जातात. 


वैयक्तिक विचार न करता संघाच्या यशाचा विचार करायचा असतो, तसेच खेळामुळे सातत्याने प्रयत्न करायची सवय लागते, अंगी चिकाटी येते. खेळामुळे माणूस अपयशात हसत हसत सामोरे जायला शिकतो. त्यामुळे खरा खेळाडू जीवनातील अपयशाकडेही खिलाडू वृत्तीने पाहू शकतो आणि अपयश पचवू शकतो.

आजपर्यंत आपल्याकडे खेळासाठी पोषक वातावरण नव्हते त्यामुळे जागतिक स्पर्धांतून आपले खेळाडू मागे पडत असत. परंतु आता आपल्याकडे नवीन अभ्यासक्रमात खेळांना महत्त्व देण्यात आले आहे. चिनी, कोरियन मुले तिसऱ्या, चौथ्या वर्षांपासून कसरतींचा सराव करू लागतात. 


एवढ्या लहान वयापासून सराव मिळाल्याने ती मुले अव्वल दर्जाचे यश मिळवू शकतात. हे ध्यानात घेऊन आपल्याकडेही सुरुवातीपासून शालेय अभ्यासक्रमात खेळांचा अंतर्भाव करायला हवा. आता आपल्याकडची खेळांकडे पाहण्याची दृष्टी बदलत आहे. 


काही मुलेमली खेलाडू होण्याचेच ध्येय ठरवू लागली आहेत. खेळांमुळे प्रकृती निकोप राहते तसेच मनही निकोप राहते. कारण निकोप शरीरातच निकोप मन राहते. आजपर्यंत फक्त अभ्यासात हुशार मुलांचेच कौतुक होत असे आता मात्र खेळाडूंनाही योग्य महत्त्व प्राप्त होऊ लागले आहे. 


शासनानेही या दृष्टीने योग्य ती पावले टाकायला सुरुवात केली आहे. तेव्हा यापुढील काळात अनेक गावसकर, अनेक पी. टी. उषा, अनेक अमृतराज, अनेक तेंडुलकर, अनेक पेस, अनेक भूपती निर्माण होतील अशी आशा बाळगूया.

विद्यार्थ्यांच्या अंगी शिस्त बाणली जाते. नियमांचे पालन करण्याचे शिक्षण आपोआपच मिळते. ऐक्याची भावना खेळातूनच जोपासली जाते. या साऱ्या गोष्टी पुढे जीवनातही फार महत्त्वाच्या असतात. आणि त्या जर खेळांतून साध्य होत असतील तर 'खेळ' ही शाळा कॉलेजांतून महत्त्वाची गोष्ट समजली जाणे आवश्यक आहे.



आतापर्यंत आपण खेळाचे अनेक फायदे पाहिले. त्याच दृष्टीने पाहता जीवनात शिक्षणाइतकेच किंवा काही दृष्टींनी जास्तच महत्त्व खेळांनाही असायला हवे, हे निर्विवाद!  मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवा