श्रमाचे महत्व निबंध मराठी | Shramache Mahattwa Marathi Nibandh

 श्रमाचे महत्व निबंध मराठी | Shramache Mahattwa Marathi Nibandh

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण श्रमाचे महत्व मराठी निबंध बघणार आहोत. किंवा कष्टाविण फळ नाही! वेदकाळात श्रमांचे महत्त्व सर्वमान्य होते. व्रतबंध झाल्यावर बटूचा ब्रह्मचर्याश्रम सुरू होई, तेव्हा त्याला ज्ञानग्रहणासाठी गुरुगृही राहावे लागे आणि गुरू व गुरुपत्नीसाठी आश्रमाची सफाई करणे, फुले गोळा करणे, जंगलातून लाकडे आणणे, यज्ञासाठी समीधा गोळा करणे अशी कामे करावी लागत. 


पूर्वीच्या काळी श्रम आणि सेवाभाव यांचा सुंदर मिलाफ झालेला असे. त्यातूनच विदयार्थ्यांच्या शरीरावर व मनावर श्रमसंस्कार होत. ज्ञानार्जन हे एक व्रत आहे, हे त्यांच्या लक्षात येई आणि श्रमांनाही आपोआपच प्रतिष्ठा प्राप्त होई.


पुढे वर्णव्यवस्थेमुळे श्रमांची प्रतिष्ठा कमी होऊ लागली. 'गुणकर्मविभागशः' हा वर्णव्यवस्थेचा पाया होता. कालांतराने वर्णांच्या जाती झाल्या. जातीमुळे कर्मठपणा आला. शूद्रांनी उच्चवर्णीयांची सेवा करायची, हे ठरून गेले. त्यांच्या श्रमांना कमी लेखले जाऊ लागले. शूद्र शिक्षणापासून वंचित झाले. या साऱ्या गलिच्छ प्रकारांतून श्रमांची श्रेष्ठता हरपली.


ब्रिटिशांच्या काळात शिक्षणाचा प्रसार झाला. आंग्लविदयाविभूषित असा एक पांढरपेशा वर्ग तयार झाला. शिक्षणाच्या संदर्भात सुशिक्षित-अशिक्षित असे दोन वर्ग तयार झाले. त्यांतील अशिक्षितांना कमी लेखले जाऊ लागले. कमी दर्जाचा श्रमिक वर्ग तयार झाला. 


हा भेदभाव नाहीसा करून श्रमांचे महत्त्व पटवून देण्यासाठी अनेक थोर व्यक्तींनी प्रयत्न केले. महात्मा गांधी आणि कस्तुरबा यांनी आपली सर्व कामे आपण स्वतः करून आश्रमवासीयांना स्वावलंबनाचा आदर्श घालून दिला, श्रमांचे महत्त्व पटवून दिले. 


विनोबा भावे, सेनापती बापट, साने गुरुजी यांनीही सर्व प्रकारची शारीरिक श्रमांची कामे करून कोणत्याही प्रकारचे श्रम हलके नसतात, हे समाजाला पटवून देण्याचा प्रयत्न केला. मुलांना लहानपणापासून श्रमश्रेष्ठता समजावी, लहानपणापासून श्रम त्यांच्या अंगवळणी पडावेत, म्हणून गांधीजींनी अभ्यासक्रमात कुटीरोदयोगांचा अंतर्भाव केला.


मुदलियार, कोठारी, गजेंद्रगडकर यांसारख्या शिक्षण आयोगांनी शिक्षणक्रमात समाजसेवा, कार्यानुभव यांसारखे विषय नेमले. पण विदयार्थ्यांच्या वाढत्या संख्येबरोबर ते सारे प्रयत्न केवळ वरवरचे ठरले. सध्याच्या यांत्रिक, धकाधकीच्या जीवनात सकाळी उठल्यापासून रात्री निजेपर्यंत माणसाला सतत श्रम करावे लागतात. 


नोकरी करणाऱ्या स्त्रियांना तर घरचे स्वयंपाकपाणी उरकून कार्यालय गाठावे लागते. पण कामाचे स्वरूपच बदलत गेल्याने शरीराला व्यायाम मिळण्याऐवजी फक्त दगदगच मिळू लागली. अनेकांच्या बाबतीत तर बैठ्या स्वरूपाच्या कामामुळे योग्य त्या प्रमाणात शारीरिक हालचालच होत नाही. 


शरीराची हालचाल मंदावल्यामुळे मेद वाढतो. त्यातून मधुमेह, रक्तदाब, सांधेदुखी, हृदयविकार असे आजार संभवतात. ' श्रम' याचा अर्थ कष्ट नसून शारीरिक चलनवलन असा आहे. श्रम म्हणजे शरीराला अनुकूल असा व्यायाम होय.


श्रमांमुळे शारीरिक हालचाल होते. त्यातून उत्साह, चैतन्य, स्वावलंबन या गोष्टी प्राप्त होतात. स्वावलंबन म्हणजेच स्वातंत्र्य. भारताच्या दिवंगत पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी दिलेल्या 'कठोर परिश्रमांना पर्याय नाही' या संदेशात तरी दुसरा कोणता हेतू होता? मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद