वाचन संस्कृतीवर इलेक्ट्रॉनिक मीडियाचा परिणाम मराठी निबंध | VACHAN SANSKRUTIVAR ELECTRANIC MIDIYACHA PARINAM ESSAY MARATHI

 वाचन संस्कृतीवर इलेक्ट्रॉनिक मीडियाचा परिणाम मराठी निबंध | VACHAN SANSKRUTIVAR ELECTRANIC MIDIYACHA PARINAM ESSAY MARATHI  

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  वाचन संस्कृतीवर इलेक्ट्रॉनिक मीडियाचा परिणाम मराठी निबंध बघणार आहोत.

 "वाचन आहे प्रवास सुंदर नव्या नव्या ज्ञानाचा। 

इतिहासाचा, साहित्याचा, आणिक विज्ञानाचा । 

नव्या जगाचे, नव्या युगाचे प्रकाशगाणे गाती। 

ग्रंथ उजळती अज्ञानाच्या, काळोखाच्या राती ।।"


कविवर्य मंगेश पाडगावकरांनी वाचनाला सुंदर प्रवास' म्हणून संबोधिले आहे. या सुंदर प्रवासात आज एक मायावी धोंड' आडवी आली आहे. ती म्हणजे इलेक्टॉनिक मीडिया. आजच्या प्रसारमाध्यमांनी आबालवृद्धांवर अक्षरशः गारुड केलं आहे. वाचनसंस्कृतीपासून आम्ही दूर जात आहोत.


वाचन म्हणजे काय? तर जे वाचविते, माणसाला 'माणूस' घडविते ते वाचन. 'वाचाल तर वाचाल' पेक्षा 'वाचाल तरच वाचाल' असं म्हणायला हवं.


शीलं सद्गुणसंपत्तिः ज्ञानं विज्ञानमेव च।। 

उत्साहो वर्धते येन वाचनं तद् हितावहम् ।। 


असे हितकारक वाचनच 'वाचन' या सदरात मोडते. देवानी जगाचं भलं मोटं पुस्तक लिहून ठेवलं. ते वाचायला दृष्टीही दिली. नवजात अर्भकाची पहिली तोंडओळख या ईश्वरनिर्मित विश्वकोषाशी होते. ही वाचनाची सुरुवात होय.


चिनी भाषेत एक म्हण आहे. 'तुझ्याजवळ दोन पैसे असले तर एक भाकरीवर खर्च कर, एक फुलावर खर्च कर' भाकर ही पोटाची भूक तर फूल ही मनाची भूक, तद्वत् वाचन ही सुद्धा मनाची भूक आहे. द्रष्ट्या ऋषीमुनींनी हे जाणले. स्वतःला झालेलं ज्ञान ताडपत्र, भूर्जपत्र, धातूचे पत्रे, शिळा यावर अंकित करून ठेवलं ते यासाठीच.


छापण्याची कला अवगत झाल्यावर ग्रंथांचा सुकाळ झाला. ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या. आजवर मुखोद्गत करून जतन केलेलं ज्ञान ग्रंथबद्ध झालं. वाचन संस्कृतीने बाळसं घरनं. वाचन एक छंद, साधना, दिनक्रम, तपस्या, व्यासंगच नव्हे तर जीवनाचे अविभाज्य अंग बनले.


एकविसाव्या शतकात विज्ञानाने आम्हाला संगणक युगात आणून सोडले. प्रसार माध्यमांची खैरात झाली. पण त्यामुळे ज्ञानाचा प्रसार झाला नाही. मानवाचा मेंदू माहिती ‘फीड' केलेला संगणक बनला. वाचनावर संक्रांत आली. वाचनसंस्कृतीचा एक नंबरचा शत्रू म्हणजे दूरदर्शन. 


आजीच्या गोष्टी, गाणी ऐकण्यात रंगून गेलेली नातवंडे, हे दृश्य लुप्तप्राय झाले. बालकांनीच बालसाहित्याकडे पाठ फिरवली. दूरदर्शन हेच एकमेव ज्ञान मिळविण्याचे साधन आहे असा गैरसमज रूढ झाला. अवांतर वाचन सोडाच, पाठ्यपुस्तके वाचण्याचीही तसदी आजचा बहुतांश विद्यार्थी घेत नाही. वर्तमानपत्र वाचण्याची गरज संपुष्टात आली.


तरुण पिढीची पावले संगणक, इंटरनेट कॅफेकडे वळली. ग्रंथालये ओस पडली. ज्ञानेश्वरी, रामायण, भागवत, दासबोध, तुकारामाची गाथा यांची कास सोडून वृद्धही दूरदर्शनच्या आधीन झाले. त्यांच्यामुळे नातवंडांचा अभ्यास होत नाही,' अशी कुरबुर कानावर येऊ लागली.


मला 'वाचन हा माझा श्वासोच्छवास आहे' असे डॉ. आंबेडकर म्हणत. अस्मादिकांचा जीव मात्र दूरदर्शनविना कासावीस होतो. 'अखंड एकांत सेवावा, ग्रंथ मात्र धोंडाळावा' या वचनाची जागा ‘अखंड टी.व्ही पाहावा, जीव असा गुंतवावा' या वाक्याने घेतली.


म “स्वर्गापेक्षा चांगल्या पुस्तकांचे मी अधिक स्वागत करीन' या लोकमान्य टिळकांच्या मताला मान्यता मिळण्याची आज सुतराम शक्यता नाही. टी. व्ही च्या पडद्यावरील नरकाचं दृश्यही आम्ही मिटक्या मारत पाहू. भगीरथ प्रयत्नांनी भूतलावर आणलेली ग्रंथरूपी ज्ञानगंगा आज आम्हाला नको आहे. त्यापेक्षा चुळकाभर 'बिसलेरी वॉटर' आम्हाला अधिक निर्मळ, शुद्ध वाटते.


पण नाउमेद व्हायचं कारण नाही. आज ना उद्या आम्हाला 'अज्ञानाच्या तिमिरातील दीपस्तंभां'चे महत्त्व कळेल. 'ज्ञानाच्या सदावर्ता'कडे आमची पावलं वाटचाल करतील अशी आशा बाळगू या. 'वाचाल तर वाचाल' हेच खरं. कारण


वाचनं ज्ञानदं बाल्ये, तारुण्ये शीलरक्षकम् 

। वार्धके दुःखहरणं हितं सद्ग्रंथवाचनम् ॥

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद