बेकार तरुणाच मनोगत मराठी निबंध | Bekar Tarunach Manogat Marathi Nibandh

 बेकार तरुणाच मनोगत मराठी निबंध | Bekar Tarunach Manogat Marathi Nibandh

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण बेकार तरुणाच मनोगत मराठी निबंध बघणार आहोत.  “कोठे जावे? काय करावे ? नुमजे मजला की विष खावे?" आज गेले वर्षभर माझी हीच अवस्था आहे. बी.ए. या दुबळ्या पदवीचं भेंडोळं हाती घेऊन मी वणवण भटकतो आहे; कुठे तुकड्याची सोय होते का पाहात! 


अर्जावर अर्ज खरडतो आहे पण नकारघंटा वाजायची बंद होत नाही. तिचे कर्कश्श सूर मनाचा ठाव सोडताहेत. रिकामटेकडेपणाची भावना भुंग्यानं लाकूड पोखरावं तसं मन पोखरतं आहे.


“कधी संपायाची वाट?कधी लाभेल विसावा?

तुला एकट्याला ठावे, आकाशातल्या रे देवा।" 


या जगात दु:ख मनुष्याच्या पाचवीला पुजलेले आहे. विविध रूपांनी ते भेटते. मला बेकारीच्या रूपाने भेटले. स्वप्नभंग माणसाची पाठ सोडत नाही. विद्यार्थीदशेत पाहिलेली स्वप्नं वाकुल्या दाखवत आहेत. क्रीडा, नाटक, स्पर्धांत, बक्षिसं मिळवणारा आज नोकरीचं उत्तेजनार्थही बक्षीस मिळवू शकत नाही. 


वास्तवाच्या विस्तवाने स्वप्नांची, उभारीची, आत्मविश्वासाची राख केली. 'अंथरूण पाहन पाय पसरावे' म्हणून डॉक्टर, इंजिनियरपेक्षा कलापदवी घेतली. नो व्हेकन्सी, वशिलेबाजी, भ्रष्टाचार, आरक्षण यांचे कौरव माझ्यावर हल्ले करताना अभिमन्यूची विवशता अनुभवतो आहे. नोकरी नाही, अनुभव नाही. 


अनुभव नाही म्हणून नोकरी नाही, हा गुंता मी सोडवू कसा? लोक सल्ले देतात. बी.एड.ला डोनेशन, धंद्याला गल्ला आणू कुठून ? सर्व गुणा: कांचनम् आश्रयन्ते।' घराबाहेर पडावं तर तुच्छता, अपमान, चेष्टा, सहानुभूतीचे भाले टोच्या मारतात. खिशातला पैसा घरंगळत जातो. "उगाच बोंबलत हिंडत असतो.


तो हा पहा..." वैतागलेल्या वडिलांच्या शब्दांचं उकळतं तेल कानात पडतं. वेदना मस्तकात जाते. जणू मलाच नोकरी नकोय. “मी हाताशी येईन, दोन खोल्यांचं घर होईल." या स्वप्नांचा मी चुराडा करत होतो. त्यांचा तरी काय दोष?घरात रहावे तर "आळशी गोळा! हातपाय हलवायला काय झालं? आम्ही आहोत ना...


सारं आयतं मिळतंय..." वडिलांची ओढग्रस्त अवस्था न साहवून आई कृतककोपाने म्हणते... मीटर चालू असलेल्या बंद रिक्षासारखा झालोय हो मी! मित्रही भेटेनासे झालेत. कुणी टाळतात, कुणी ड्यूटीवर असतात. मित्राची चौकशी करायला त्यांच्या घरी गेलो तर "आत्ता कसा भेटेल, नोकरी लागलीय ना त्याला-" यातून मी समजायचे ते समजतो. सारे निमूटपणे सहन करतो.


न सहन करून कसं चालेल? माणसाची शक्ती दु:ख साहून नवीन स्वप्न पाहण्यात आहे... हलाहल पचवून अमृताचा शोध घेण्यात आहे... भग्नस्वप्नांच्या तुकड्यांना झुगारून देऊन, कर्तृत्वाचे गरुडपंख पसरून मी भविष्यात झेपावणार आहे. 


माझ्या कर्तृत्वाचा निद्रिस्त ज्वालामुखी उफाळणार आहे. 'सुखदु:ख चक्रवत् असतात' ही गीतेची शिकवण मी शिकलो आहे. नोकरी मला मिळणार आहे. आज नाही उद्या हे घडणार आहे. मी बेकार आहे भिकार नाही. 'रात्रीच्या गर्भातल्या उष:कालाची' मी प्रतीक्षा करत आहे. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद