कायदा पाळा गतीचा मराठी निबंध | kayda pala gaticha nibandh marathi

  कायदा पाळा गतीचा मराठी निबंध | kayda pala gaticha nibandh marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण कायदा पाळा गतीचा मराठी निबंध बघणार आहोत. आज आपण   कायदा पाळा गतीचा असलेले दोन निबंध बघणार आहोत  'रिकामा जाऊ नेदी क्षण॥' असे ज्ञानेश्वर हरिपाठात म्हणतात. सर्व संतांच्या जीवनाचे सूत्रही हेच आहे. जीवन हे क्षणभंगुर' आहे. 


'जाता क्षण वाया घालविला तर पुढच्या क्षणाचा भरवसा कोणी द्यावा? म्हणून जीवनाचे सार्थक करून घेण्याची जिद्द माणसाने धरावी असे संतांना वाटते. इतर प्राण्यांपेक्षा मनुष्यप्राणी वेगळा आहे. माणसाला इतरांपेक्षा अधिक बुद्धिमत्ता, विचार करण्याची शक्ती व वाचाशक्ती या परमेश्वराने दिलेल्या अनमोल ठेवींचा साठा त्याच्याजवळ आहे, म्हणूनच माणूस म्हणतो,

'माणूस माझे नाव, माणूस माझे नाव।

दहा दिशांच्या रिंगणात यापुढे माझी धाव॥'


 बुद्धिमत्तेच्या जोरावर त्याने जगावर प्रभुत्व गाजविले. विज्ञानात आमूलाग्र प्रगती घडवून आणली. दळणवळणाच्या वेगवान साधनांची त्याने निर्मिती केली. त्यामुळे जग जवळ आले. सांस्कृतिक देवाणघेवाण सुरू झाली. जीवनाला प्रचंड वेग आलेला आहे. घड्याळाच्या काट्याबरोबर माणूस • आज अक्षरश: धावतो आहे.


बरे! इतकी प्रगती करूनही माणूस आज असंतुष्टच आहे. आहे त्या परिस्थितीत त्याला समाधान वाटत नाही. जे आपल्याजवळ नाही ते मिळविण्यासाठी त्याच्या जीवाचा आटापिटा चाललेला असतो. शिवाय -माणसाला 'आत्मप्रतिष्ठा' महत्त्वाची वाटते. 


या आत्मप्रतिष्ठेपायी तो प्रत्येक क्षणी इतरांपेक्षा 'मी' वेगळा आहे. दुसऱ्यांपेक्षा 'मी' वरचढ आहे; ही 'मी' पणाची ईर्षा त्याला स्वस्थ बसू देत नाही. आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा दिसून येते. या स्पर्धामय जगात टिकाव धरायचा तर स्वत:ची कार्यक्षमता वाढली पाहिजे. जीवनातील शर्यत जिंकायची तर धावण्याशिवाय गत्यंतर नाही.


'कोठेतरी गेलेच पाहिजे; गतीचीही आहेच सक्ती; जायचे कसे त्याची मात्र कुणीच सांगत नाही युक्ती' तुमची इच्छा असो अगर नसो, पुढे गेलेच पाहिजे. कारण काळ मागे लागला, आणि थांबला तो संपला. आजचा क्षण महत्त्वाचा. काळ कुणासाठी थांबत नसतो. तो पुढे जातच असतो. माणसाची मात्र त्याच्यामागे धावण्यात फरफट होत असते.


अर्थात, कोणतेही ध्येय निश्चित केल्यानंतर ते पार पाडण्यासाठी 'नियोजन' करावे लागते. नियोजनाबरहुकूम ‘कृती' करायला हवी. त्या कृतीला 'चिकाटी' हवीच. चिकाटीला एकाग्रतेची झालर हवी आणि एकाग्रतेला वेगाचे भान' असावे. वेगात घिसाडघाई नको. त्या कामात ‘अचूकता' असावी. 


अचूकतेवर दर्जाचा अंकुश असावा. 'वेग' आणि 'दर्जा' साधण्यासाठी सराव करावा लागतो. ती एक प्रकारची तपश्चर्याच असते. त्या तपश्चर्येसाठी जिद्द व ईयेचे स्फुल्लिंग चेतवावे लागते. यासाठी गतीचा कायदा पाळावा लागतो. नाहीतर थांबला तो संपला.'


पण कोणतीही गोष्ट वेळेवर केली तर आम्ही भारतीय कसले ? कोणतेही अधिकारी, मंत्री समारंभाला वेळेवर हजर राहिले तर त्यांचे महत्त्व कसे वाटणार ? यजमानांना वाट बघायला लावणे, त्यांना तिष्ठत ठेवणे


हे आम्ही 'प्रतिष्ठेचे लक्षण मानतो. घरापासूनच हे चक्र सुरू होते. मोलकरीण घरी कामाला उशिरा येणार, मग कामावर जायला आम्हाला थोडा उशीर झाला तर बिघडले कोठे? खालच्या ऑफिसातून वरच्या ऑफिसात फायली वेळेवर सरकल्या तर ना! 


कोर्टात वडिलांनी एखादी केस लावली तर मुलालाच त्याचा कदाचित न्याय मिळणार. अनेक बाबतीत आम्ही पाश्चात्त्यांचे किंवा इंग्रजांचे अंधानुकरण केले पण 'वेळेचे भान ठेवणे' हे मात्र आम्ही सोयीस्कर विसरलो. निसर्गचक्राचा आदर्श मानवाने डोळ्यांपुढे ठेवायला पाहिजे.


'थांबला न सूर्य कधी, न थांबली धरणी।' या निसर्गचक्राला मानवही बांधला गेलेला आहे. गती म्हणजे 'प्रगती आणि आळस म्हणजे 'अधोगती' हा मंत्र ध्यानात घेऊन गतीचा कायदा पाळायलाच हवा. कारण काळ मागे लागलेला आहे. तो कोणासाठी थांबणार नाही. 


पण तुम्ही मात्र थांबलात तर संपलाच म्हणून समजा. जीवन हे क्षणभंगुर आहे. जाता क्षण वाया घालविला तर पुढच्या क्षणाचा भरवसा कुणी द्यायचा? कायदा पाळा गतीचा, काळ मागे लागला, मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता.   पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद



निबंध  2

कायदा पाळा गतीचा मराठी निबंध | kayda pala gaticha nibandh marathi


उपनिषदात एक गोष्ट आहे. इंद्र एका राजपुत्राला 'सदैव चालत रहा' असा उपदेश करतो. त्यावेळी तो म्हणतो, 'बसून राहणाऱ्याचे नशीबही बसून राहते. आडवे पडणाऱ्याचे नशीबही आडवे पडते. जो चालत राहतो त्याचे नशीबही चालत राहते. सूर्याचे वैभव पहा. तो सतत चालतच असतो.


माणसाने सतत चालत राहिले पाहिजे प्रगती व सामाजिक प्रगती असा अर्थ येथे अभिप्रेत आहे. प्राचीन काळापासून आजपर्यंत माणसाने सर्वच क्षेत्रांत जी प्रगती केली आहे ती काळाचे भान राखूनच केली आहे. काळाबरोबर चालले पाहिजे असे सतत मोठी माणसे सांगताना आपण ऐकतो. 


काळाबरोबर चालणे म्हणजे कालमानानुसार विकासाच्या नव्या वाटा शोधून काढणे, निर्माण होणाऱ्या नव्या समस्यांना तोंड देणे. अनेक असाध्य रोगांवर शास्त्रज्ञांनी औषधे शोधून काढली आहेत. स्त्रियांनी शिकून काय करायचे, हे मत आता इतिहासजमा झाले आहे. 


म. फुले, कर्वे यांच्या अविश्रांत प्रयत्नांमुळेच स्त्रिया शिकू लागल्या. 'अबला' सबला होऊ लागल्या. 'चूल व मूल' करणाऱ्या स्त्रिया आज सर्वच क्षेत्रांत आघाडीवर आहेत.नदीचे पाणी वाहायचे थांबले तर त्याचे डबके होईल. व्यवहारातसुद्धा नित्य वापराच्या वस्तू आपण ठेवून दिल्या तर त्या काही काळानंतर निरुपयोगी होतात. 


सायकल, स्कूटर ही वाहने सतत चालती ठेवली पाहिजे. समाजातही हाच नियम लागू आहे. माणसाच्या वैयक्तिक जीवनातही हाच नियम लागू आहे. भारतातील निरक्षरता, अंधश्रद्धा दूर करण्याचे प्रयत्न शासकीय पातळीवरून, तसेच समाजसुधारकांकडून होत आहेत. 


इतर देश सर्वच बाबतीत आपल्या खूप पुढे गेले आहेत; याचे कारण त्या देशात शिक्षितांचे प्रमाण फार मोठे आहे. आपल्या देशात आधी लोकशिक्षणाचीच मोठी गरज आहे. लोकशिक्षणाखेरीज 'कायदा पाळा गतीचा' हे सूत्र जनतेला कळणार नाही.


अशा प्रकारे आजच्या काळाचे काही कायदे, नियम आहेत. ते नियम मी पाळणार नाही असे म्हणणारा कालौघात सर्वांच्या मागे राहील. म्हणून कूपमंडूकवृत्ती सोडून चौफेर निरीक्षण, नवे नवे ज्ञान समजून घेण्याची वृत्ती प्रत्येकाजवळ हवी. 


'सदैव सैनिका पुढेच जायचे' या काव्यपंक्तीत सैनिकाला उद्देशून म्हटले असले तरी ते आपणा सर्वांना लागू पडते. सतत पुढे जात राहिले पाहिजे. थांबता कामा नये. कारण 'थांबला तो संपला.'  मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद