केल्याने होत आहे रे मराठी निबंध | Kelyane Hot Ahe Re Nibandh

 केल्याने होत आहे रे मराठी निबंध | Kelyane Hot Ahe Re Nibandh 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण केल्याने होत आहे रे मराठी निबंध बघणार आहोत.  प्रयत्नवादाच्या बळावर माणसाने किती लांबचा पल्ला गाठला! संत रामदास प्रयत्नवादाचा तेजस्वी संदेश देताना म्हणतात


'वन्ही तो चेतवावा रे। 

चेतवितांचि चेततो।

केल्याने होत आहे रे। 

आर्थी केलेंचि पाहिजे॥' 


जीवनयज्ञाला प्रयत्नांच्या समिधा अर्पण केल्याशिवाय तो फुलत नाही. समाजातील दैववाद आणि निष्क्रियता हे दोष दूर करायला प्रयत्नांचे मंत्रपठण आजवर अनेक थोर संत, नेते, समाजसुधारक, शास्त्रज्ञ करत आले तेव्हा आज मानवजात इतर प्राणिमात्रांच्या तुलनेत प्रगत दिसते.


ईप्सिते माणसाला पुढे खेचतात तर ती साध्य करताना येणाऱ्या अडचणी माणसाला मागे रेटतात. माणूस निराश होतो. पुन्हा प्रयत्न करतो. कधी सोडून देतो. असे करता कामा नये. सावरकर म्हणायचे, 'प्रतिकूल तेच घडेल म्हणून ध्येयापासून हटता कामा नये...' 


बऱ्याच वेळा ध्येयाच्या व्यापक, गुंतागुंतीच्या विशाल स्वरूपाने माणसे कामाची सुरुवातच करत नाहीत. संपूर्ण जग निम्मा वेळ अंधारात असण्याचा पहिला काळ होता. 'रात्री उजेड हवा' ही कल्पना रम्य खरी पण करायचे कसे?- एडिसनने दासबोध वाचला नसेल पण केल्याने होत आहे रे' चे सूत्र त्याने वापरले अन् विजेच्या दिव्यांनी जग उजळून निघाले.  


प्रयत्नांचं केवढं फळ! आळशीपणा, दैववाद आणि आत्मविश्वासाचा अभाव हेही माणसाला निष्क्रिय बनवतात. अपुरा विद्याभ्यास, "गणित हा विषयच अवघड, मला जमणार नाही." ही भीती 'डी' ग्रपचे प्रश्न! कुठे शोधायची उत्तरं? आमच्या नशिबातच मोठं यश नाही. 


सगळीकडे भ्रष्टाचार असतो... असं म्हणून विद्यार्थ्यांनी स्वत:ला छोटं करू नये. केल्याने अभ्यास होतो, कुणाच्या मदतीने गणितं सुटतात, गरज आहे आपण प्रयत्न करण्याची... आयुष्याच्या गणितात भाग्य नेहमीच कष्टाच्या किंवा प्रयत्नांच्या सम प्रमाणात चालते हे निखळ सत्य आहे. म्हणूनच रामदास पुन्हा म्हणतात


यत्नाचा लोक भाग्याचा। 

यत्नेविण दरिद्रता ॥


आत्मविश्वासाने निम्मे काम होते. 'मी करू शकेन' ही सुरुवात आत्मविश्वास दाखवते. 'मी करत आहे' हा प्रयत्नवाद सातत्य दाखवतो. 'मी केलं' हा त्या कामाचा शेवट सर्वांची पूर्ती दाखवतो- असं व्हायला पाहिजे एक सत्यकथा आठवते. 


व्हॅटिकन सिटीमधील प्रचंड मोठ्या चर्चच्या छतावर बायबल चित्ररूपात रेखाटायचं प्रचंड काम मी मी म्हणणाऱ्या चित्रकारांनी नाकारलं. मायकेल एंजलोने ते आव्हान स्वीकारलं. छताकडे तोंड करून उताणं पडून उंचीवर काम करू लागला... 


तो जो वर चढला तो १५०८ ते १५१२ चार वर्षांनी खाली उतरला. सारं बायबल छतावर चितारूनच! ती भव्य चित्रकृती पाहन सारं जग तोंडात बोटं घालतं. केलं म्हणून झालं'- अभ्यासाचं असंच आहे मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद