माझा आवडता नेता मराठी निबंध | Maza Avadta Neta Marathi nibandh

  माझा आवडता नेता मराठी निबंध | Maza Avadta Neta Marathi nibandh

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझा आवडता नेता मराठी निबंध बघणार आहोत.  जमाना सचमुच बदल गया है। द्वितीया, चतुर्थी विभक्तीची आता षष्ठी विभक्ती हीच देशभक्तीची व्याख्या झाली आहे. नाही कळलं? बघा ना, स्वातंत्र्यपूर्व कालातील “जो लोकांना आपल्याबरोबर नेतो


तो नेता" ही व्याख्या. “जो लोकांचं आपल्याबरोबर नेतो तो-नेता" अशी बदललेली व्याख्या वर्तमानपत्रांतून आज करता येते. कुंपणानेच शेत खाल्ले तर जनताजनार्दनाने काय करायचे? ने-नेक; ता तारणहार - असा खरंतर नेता या शब्दाचा अर्थ असावा. देशाचे वा पक्षाचे सुकाणू सांभाळणारा हवा नेता.


दिशा देणारा. “हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा" इतक्या निर्लेपपणाने राज्य करणारा हवा नेता-शिवाजीसारखा. जनमानसावर घट्ट पकड असणारा म. गांधी, नेहरूंसारखा असावा नेता. संशयातीत जाज्वल्य देशभक्ती आदर्श नेत्याची खूण. त्याचे विचार, कृती देशाचं भलं करण्याच्या असाव्यात.


खुर्ची, सत्ता यावर डोळा ठेवून केलेल्या नसाव्यात. ... त्याच्याजवळ हवी ठोस भूमिका, आणि भूमिकेशी प्रामाणिकपणा. 'दल बदलू' नेता, परस्पर विरोधी विधाने करणारा, रंग बदलणारा नेता, लोकप्रिय, यशस्वी होईलही पण आदर्श कसा होईल?


यासाठी लागते विचारांची परिपक्वता. पायापुरते पाहणारा कालांतराने मोडीत निघतो. कर्तृत्वहीन निघतो. आदर्श नेता हा Man of principles असावा. म्हणजे अनुयायांमध्ये संभ्रम राहात नाही. कार्य सुसंघटितपणे पार पाडते.


जटिल राजकारणातही वैचारिक पारदर्शीपणा लो. टिळक, गांधी, सावरकर, पटेल यांनी दाखवला. कठोरपणाबद्दल माणुसकीचा गहिवर दाखवणारे लिंकनसारखे नेते आदर्शच! वैचारिक प्रगल्भता, ठोस योग्य भूमिका याबरोबरच तडफदारपणा, बाणेदारपणा दाखवण्याचे धैर्य असले म्हणजे सत्ता नसताही 


"सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?" म्हणता येते. शैक्षणिक पात्रता असली तर उत्तम. पण नसली तरी राष्ट्रभक्तीच्या मुशीतून तयार झालेले, जनतेची नस अचूक ओळखणारे वसंतदादा पाटलांसारखे आदर्श नेते पुन्हा मुख्यमंत्री झालेच... आदर्श नेत्याला भविष्यात पाहण्याची दृष्टी हवी. 


राष्ट्रहिताचे धोरण आखता आणि राबविता आलं पाहिजे. इंदिरा गांधींसारखी तिसरी शक्ती निर्माण करणारा! राजीव गांधींसारखा पुरोगामी, कॉम्प्युटर युगाची चक्रं हालवणारा... प्रसंगी लढवय्या लालबहादूर शास्त्रींसारखा असावा नेता!यासोबत गरज आहे ती तो नीतिमान, चारित्र्यवान असण्याची. 


भ्रष्टाचार, स्वार्थ यापासून दूर राहण्याची. सवंग लोकप्रियता टाळण्याची. देशासाठी श्रीमंती सोडणारा, कारागृहाच्या फरशीवर झोपणारा आणि मृत्यूनंतरही "माझ्या देशाच्या प्रत्येक राज्याच्या मातीत माझ्या देहाची राख विखरून टाका" 


असं मृत्युपत्र लिहिणारा, देशाच्या मातीशी मिसळून जाणारा नेहरूंसारखा. देवा, असा आदर्श नेता आम्हाला कधी देशील? भारत आज प्रतीक्षेत आहे अशा आदर्श नेत्याच्या!! मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद