मी दूरदर्शनचा सल्लागार झालो तर मराठी निबंध | Me Durdhrshanacha Sallagar Zalo Tar Marathi Nibandh

मी दूरदर्शनचा सल्लागार झालो तर मराठी निबंध | Me Durdhrshanacha Sallagar Zalo Tar Marathi Nibandh 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण मी दूरदर्शनचा सल्लागार झालो तर निबंध बघणार आहोत.  सल्ला देण्याचे काम पोक्त माणसे करतात. मी आहे कुमार, तरी सल्लागार म्हणून या निबंधापुरते चकट फू सल्ला देण्याचे काम करणार आहे. कारण दूरदर्शन आम्ही जवळून बघतो ना!


त्याचं काय आहे, मंगळवारी दोन वाजता दूरदर्शनवर 'डिस्को डान्सर' चित्रपट होता. आमच्या वर्गातील २५-३० मुले तो पाहण्यासाठी घरी राहिली. काही तर शाळेत आल्यावर घरी गेली आणि मधल्या सुट्टीत तर अनेकजण आजारी पडू लागले घरी जाण्यासाठी. सर्व शिक्षक आज 'अनुपस्थिती फार कमी आहे' असे आपापसात बोलू लागले. 


चौकशी करता, 'डिस्को डान्सर'मुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी रजा, हे कळले. 'या टी. व्ही. ने अगदी वेडे करून सोडलेय या मुलांना. टी. व्ही. वाले तरी शाळेच्या वेळात चित्रपट कशाला ठेवतात? ते काही नाही. उद्या सर्वांना दहा रुपये दंड करा. 


शिवाय पालकांना पत्रे लिहा.' मुख्याध्यापकांनी फर्मान काढले. मी सुटलो. पण विचार आला, आपणच दूरदर्शनचे सल्लागार झालो तर.... खरंच विद्यार्थी जर शाळा बुडवून टी. व्ही. बघत बसला तर टी. व्ही. द्वारे किती तरी गोष्टी विद्यार्थ्यांवर ठसविता येतील. 


अमूर्त गोष्टी मूर्त स्वरूपात दाखवता येतील. शब्दांनी जे समजणार नाही ते प्रत्यक्ष दृश्यांनी समजेल. प्रत्यक्ष अनुभव मिळेल आणि अनुभवामुळेच शिक्षण अधिक प्रभावी होते. अर्थपूर्ण होते. 'श्रावणमास' ही बालकवींची कविता, मंगेश पाडगावकरांची 'किमया'


या कविता शिक्षकांनी वर्णन करण्यापेक्षा टी. व्ही. वर जर दृश्य स्वरूपात, गाऊन दाखवल्या तर कितीतरी सुंदर समजतील व ठसतील. कविता चालीवर गायला शिकवा. तसेच वेगवेगळ्या विषयांवर निबंध कसे लिहावेत याचे तंत्र मुलांना सोदाहरण दाखवले तर मुले चांगले निबंध लिहितील. 


सुंदर नाट्यउतारे कसे म्हणावेत, आवाजात चढउतार कसे करावेत, यातील भावना व्यक्त करणे इ. सांगावे. थोरांची चरित्रे कथारूपाने सांगावीत. भूगोलातील प्रदेश वर्गात. कथनपद्धतीने व नकाशात पाहण्यापेक्षा प्रत्यक्ष टी. व्ही.वर पाहिले तर लगेच समजेल. टी. व्हीवर क्रमाक्रमाने भारतदर्शन घडवावे. लोकजीवन, पिके, हवामान इ. सर्व दाखवावे.


चित्रकलेचे, नृत्यकलेचे पाठ द्यावेत. माहिती द्यावी. मुलांना करायला सांगावे. म्हणजे ज्यांना मुळात आवड आहे पण परिस्थिती आड येते अशा मुलांना कलेची थोडीतरी माहिती होईल. संस्कारक्षम कथा दाखवा. स्वच्छता, आरोग्य, व्यायाम, नियमित अभ्यास, आज्ञापालन, शिस्त, कामसू वृत्ती इ. गुण वाढीस लागतील अशा कथा निवडा. 


मुलांसाठी कथाकथन स्पर्धा ठेवा. शाळा-कॉलेजमधील नाटके दाखवा. पुरुषोत्तम करंडकाच्या एकांकिका दाखवा. चुटकुले दाखवा. जाहिरातींऐवजी मार्गदर्शक सूचना दाखवा. उदा. 'पाणी हे जीवन आहे. जपून वापरा.' 'बचत करा - पाणी इंधन वाचवा.' वृक्ष लावा वृक्ष जगवा.' इत्यादी. कार्टून फिल्मस् दाखवा. प्रबोधन करा. 


शहरात शुद्ध पाणी, गावात अशुद्ध का, त्याचे परिणाम कोणते, हे समजावून द्या. चित्रपट कमी करा. दाखवले तर संत, शिवाजी, श्यामची आई असे चित्रपट दाखवा. कार्यक्रम शनिवारी दुपारी व रविवारी जास्त दाखवावेत. इतर वारी रात्री नऊनंतर कोणतेही कार्यक्रम दाखवू नयेत. म्हणजे अभ्यास व झोप दोन्ही होईल.


थोडक्यात, उद्याचा भारत शाळेत व घरोघरी घडत आहे हे लक्षात घेऊन टी. व्ही.ने अभ्यासपूर्ण ज्ञानार्जनात भर पडेल व जे जे आदर्श ते ते सर्व विद्यार्थ्यांपुढे ठेवावे. साधी राहणी उच्च विचारसरणी' हेच ध्येय डोळ्यांपुढे ठेवून अध्यापन करावे. मग अशा या दूरदर्शनचे जवळून दर्शन घेण्यास कोण नको म्हणेल?



चिन्तनीया हि विपदामादावेव प्रतिक्रिया।

न कूपखननं युक्तं प्रदीप्ते वन्हिना गृहे। 


संकट येण्यापूर्वीच त्याच्या निवारणाचा विचार करणे योग्य. संकट कोसळल्यावर नव्हे. ज्याप्रमाणे घराला चोहोबाजूंनी आगीच्या ज्वाळांनी वेढले असता विहीर खणणे योग्य नाही त्याचप्रमाणे दूरदर्शनचे अनिष्ट परिणाम डण्याआधीच ते होऊ नयेत म्हणून सावधान राहावे.


यासाठीच दूरदर्शनचा सल्लागार होणे मला आवश्यक वाटते. मी. जर सल्लागार झालो तर... मी प्रथम विमानातून या विज्ञानाच्या बाळाची पाहणी करीन. तसे माझ्या ऐकिवात आहेच. २०-२५वर्षांपूर्वी नुकतेच टी. व्ही. चे आगमन झाले होते. तेव्हा काय अपूर्वाई वाटत होती! दूरदर्शन घरात असणे श्रीमंतीचे लक्षण मानले जाई. 


पण आज खेडोपाडी बहुतेक घरांवर तसेच बंगल्यापासून झोपड्या झोपड्यांवर डिश अँटिना विराजमान झालेले आहेत. म्हणजेच आज दूरदर्शन किती लोकप्रिय झालेले आहे हे लक्षात येते. म्हणतात ना, 'अति झाले नि वाया गेले' या पाहुण्याने आमच्या कुटुंबियांवर इतके आक्रमण केले आहे, की दूरदर्शन म्हणजेच सर्व काही असे वाटू लागले आहे. 


जसे व्यसनाधीन माणसे आपल्याच नशेत असतात तशीच समाजातील बहुसंख्य लोकांना दूरदर्शनमुळे ग्लानी आली आहे. लोकांना त्याच्यामुळे कामधंदा सुचेनासा झाला आहे, स्त्रिया आपला स्वयंपाकपाणी वेळच्यावेळी करीनाशा झाल्या आहेत. विद्यार्थी अभ्यास करीनात की खेळेनात! 


दूरदर्शनची कमतरता होती म्हणून की काय, केबल' टी. व्ही., 'स्टार' टी. व्ही., 'झी' टी. व्ही., 'एम' टी. व्ही., असे अनेक चॅनल्स आपल्या संचात येऊन दाखल झाले आहेत. आज अशी परिस्थिती झाली आहे की दूरदर्शनपुढे २४ तास तुम्ही बसलात तरी तो तुमच्यापुढे निरनिराळ्या चीजा ठेवतो, शेवटी तुम्ही हार खाल! 



यासाठी हा अतिरेक टाळायलाच हवा. दूरदर्शनचे वेड जरा कमी होणे आवश्यक आहे. नाहीतर 'शतरंज के खिलाडी' सारखे आम्ही दूरदर्शनपुढे रात्रंदिवस बसणार आणि शत्रू आमच्या घरात शिरणार. हे टाळायचे असेल तर कार्यक्रमावर मर्यादा आणली पाहिजे.


माणसाला ज्ञान आणि मनोरंजन दोन्हीही हवे असतात. 'ज्ञानदीप', प्राथमिक शिक्षणावर आधारित कार्यक्रम, कंट्रीवाईड क्लासरूम, छोट्या नाटिका, काही मनोरंजक जाहिराती, प्रबोधनपर चित्रपट हे मुलांसाठी ठीकच आहेत.


तसेच सामान्यज्ञानात भर टाकणाऱ्या आणि विविध खेड्यांच्या, नगरांच्या, राज्यांच्या आणि देशांच्या प्रसिद्धीची, संस्कृतीची, खेळांची, नैसर्गिक साधनसंपत्तीची, हवामानाची, व्यवसायांची, राहणीमानाची ओळख करून देणाऱ्या 'सुरभि', 'ताना-बाना', 'गिनिज बुक' वर्ल्ड धिस विक' सारख्या मालिकांना प्राधान्य देण्याची मी शिफारस करीन. 



तसेच आजकाल हिंसाचाराने बरबटलेले चित्रपटच अधिक दाखवले जातात. त्यामुळे कोवळ्या वयाच्या मुलांवर अनिष्ट परिणाम तर होतातच, तसेच गुन्हेगारांना यातून गुन्हे करण्याचे प्रशिक्षणच मिळते. त्यासाठी दूरदर्शनवर मोजकेच पण दर्जेदार चित्रपट दाखवण्याची मी शिफारस करीन..


भारतातील ६५% जनता निरक्षर असणे हे लोकशाहीला मारकच आहे. त्यासाठी अक्षरधारासारखे साक्षरतेवर आधारित कार्यक्रम दाखवायला हवेत. जनवाणी... कार्यक्रम म्हणजे ज्ञानाचे जिवंत झरेच आहेत, तेही आवश्यकच आहेत.


महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनावर दूरदर्शनचा फार मोठा प्रभाव पडत असल्याची मला तीव्रतेने जाणीव होत आहे. आज दूरदर्शनच्या तासन् तास चाललेल्या कार्यक्रमांमुळे मराठी माणूस साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमांपासून दुरावत चालला आहे. 



नीरस मराठी मालिका का प्रसारित होतात याचा मला उलगडा होत नाही. म्हणून मी आमच्या सांस्कृतिक जीवनावरील अतिक्रमण थोपवण्याचा प्रयत्न करीन; तरच आम्हाला आमचे म-हाटपण टिकविता येईल. त्यासाठी मी साहित्यिक व सांस्कृतिक संस्थांना आपल्या कार्यक्रमात विविधता आणण्याचे आवाहन करीन.



दूरदर्शनवरील मराठी शीर्षकांचा व बातम्यांचाही विचार करायला हवा. लेखनाच्या चुका खटकतात. त्यासाठी मी मराठी विषयाच्या तज्ज्ञाची नेमणूक करीन. प्रादेशिक वार्तापत्रात महाराष्ट्राच्या विविध भागांतील सांस्कृतिक घडामोडींचे प्रतिबिंब अधिक उत्कटतेने उमटविण्याचा प्रयत्न करीन.


आजकाल दूरदर्शन म्हणजे सत्ताधारी पक्षाचे बाहुले बनले आहे. दूरदर्शनवर सत्ताधारी पक्ष प्रकाशाच्या झोतात वावरतो. मी विरोधी पक्षालाही आपली मते मांडण्याची संधी देईन.. शेवटी दूरदर्शनने आपले मायाजाल आपल्या घराघरात पसरविले आहे. 


पालकांनी आपल्या मुलांवर योग्य संस्कार करून कोणते कार्यक्रम बघायचे आणि कोणते टाळायचे हे त्यांनीच ठरवले पाहिजे. तीन माकडांची गोष्ट सर्वांना माहीत आहे. नीरक्षीरन्यायाने उत्तमाच्या पायी असिजे! जगाचे आक्रमण आपण टाळू शकत नाही. आपण काय स्वीकारायचे हा विचार महत्त्वाचा. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद