मी पाहिलेले प्राचीन मंदिर मराठी निबंध | mi pahilele prachin mandir Marathi essay.

 मी पाहिलेले प्राचीन मंदिर मराठी निबंध | mi pahilele prachin mandir Marathi essay.


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण मी पाहिलेले प्राचीन मंदिर  मराठी निबंध बघणार आहोत.  “मानवाच्या मनाच्या उदात्ततेचं प्रतीक म्हणजे मंदिर! पावित्र्य, मांगल्य, शुचिता यांचा त्रिवेणी संगम... कोण्या एका हळव्या क्षणी मानवाला मर्यादाची जाणीव झाली असेल. अगतिकतेनं त्याला घायाळ केलं असेल. 


अमूर्त, अनादी,  अनंत दिव्यत्वाची साक्ष पटली असेल आणि 'देव' ही अतिरम्य, भव्य, उच्च कल्पना त्याला स्फुरली असेल. भौतिकाला आध्यात्मिक अधिष्ठान, उंची, खोली देणारं मूर्त झालं आणि हिऱ्याला कोंदण तसं देवाला मंदिर अस्तित्वात आलं असेल...


" एका प्राचीन मंदिराच्या गाभाऱ्यात उभ्या असलेल्या माझ्या मनात विचारांची आवर्तनं सुरू झाली... "मालवल्या नभ मंदिरातल्या तारांच्या दीपिका” किंवा “देह देवाचे मंदिर, आत असे आत्माराम” यातून मंदिराची भव्य कल्पनाच साकार होते.


गाडी बंद पडल्याने इथे आलो. अवघं मंदिर काळ्याशार दगडांचे! Black is beautiful ची आठवण झाली. चबुतऱ्यावर उचललेलं हे मंदिर पूर्वाभिमुख होतं. सभामंडप भव्य व स्वच्छही होता. बारा खांबांनी सजलेल्या सभामंडपात छताला नक्षीकाम होतं दगडीच! 


अवखळ शीतल वारा दिव्यत्वाच्या मूर्तीसमोर आपली नृत्यकला पेश करून तिला प्रसन्न करू इच्छित होता. वळचणीला पारव्यांचे पुरोहित स्तवन करीत होते. प्रत्येक खांबावर चार यक्ष गंधर्वांच्या मती कोरल्या होत्या. त्यांचे अवयव कुणी दुखावले होते. 


पण त्या शिल्पातून अफलातून कलाविष्कार प्रतीत होत होता. गाभाऱ्याच्या भिंती व दरवाजावर सारे प्राणिमात्र कोरले होते. कलेचे सुंदर नमुने होते....गाभारा अंधाराचा होता. देव अंधारातच असतो की!... एक भाविक तेलवात करीत होता....अष्टभुजा देवीची मूर्ती उजळून निघाली. 


सिंहारूढ, नव्हे पराक्रमारूढ होती. उजव्या खांद्याजवळ चंद्र तर डाव्या सूर्य!... आठपैकी सहा हातांत आयुधे होती. मानवातीत शक्ती देवतांमध्ये असते हेच, दोनांपेक्षा जास्त भुजांच्या रचनेतून व्यक्त होते. पूर्वजांच्या तत्त्वज्ञानाला मी दाद दिली. उरलेल्या दोन हातांनी एक राक्षस मारल्याचे दिसत होते. ...


दुष्टांचे निर्दालन हा दिलासा त्यात होता. मी मनोभावे देवत्वाला नमस्कार केला. "जय जगदंबेड" गाभाऱ्याभर आवाज घुमला. “छान आहे मंदिर" - त्या भक्ताबरोबर गाभाऱ्यातून बाहेर येत मी म्हटले. "समजावून सांगतो म्हणजे अजून छान वाटेल. 


पूर्वाभिमुख देवीचं स्थान असं आहे की सूर्याचा पहिला किरण देवीच्या मस्तकावर पडतो, मग खांद्यावर, नंतर ओघळून पायाशी पडतो. देवीचं सूर्यस्नान जणू! हे बारा खांब म्हणजे वर्षाचे बारा महिने आहेत. प्रत्येक खांबावर चार चार मूर्ती म्हणजे चार चार आठवडे आहेत. 


तसेच ते चार दिशांचे पालक आहेत.... कोरलेले प्राणी तीनशे पन्नासच्या वर आहेत. प्रत्येक दिवसाचा एक. सर्व प्राण्यांच्या केंद्रस्थानी माणूस दाखवलाय... या साऱ्याच्या पाठीशी गाभाऱ्यात देवी आहे. जशी काही हा सारा राम ती चालवते आहे. 


इथे वाजवलेली घंटा कोस दोन कोस ऐकू जाते. शकी चाहल पूर्वी अशीच घंटानादाने कळवली जायची... गाभाऱ्यात गुप्त वाट आहे ती गावात निघते. गावावर संकट आलं तर ती वाट वापरली जायची मोगलांच्यापासून वाचवून मूर्ती गुप्त वाटेने गावात नेली होती.... 


श्रीरामाच्या पावलांनी पावन झालेले हे मंदिर आहे. दंडकारण्यातून लंकेला जाताना सीतामाईसह ते इथे थांबले अशी आख्यायिका आहे... नवसाला हमखास पावणारी देवी म्हणून नवरात्रात भारतभरातून लोक इथे येतात. खूप मोठा उत्सव होतो.... आई उदे ग अंबे उदेऽऽ” म्हणत तो निघून गेला.


मंदिराच्या रचनेमागचं सौंदर्य कळलं आणि काळंशार मंदिर पांढऱ्याशुभ्र संगमरवरापेक्षा देखणं वाटलं. "उदे ग अंबे उदेऽऽ” चा घंटानाद मनाच्या मंदिरात निनादत राहिला. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद