प्रदूषण एक समस्या मराठी निबंध । Pradushan Ek Samasya Essay in Marathi

 प्रदूषण एक समस्या मराठी निबंध । Pradushan Ek Samasya Essay in Marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण प्रदूषण एक समस्या मराठी निबंध बघणार आहोत. नुकताच एक लेख वाचण्यात आला. रशियातील प्रदूषणाबद्दल लोक सांगतात की, रशियाचे पर्यावरण सल्लागार अॅलेक्सी याब्लोकोव्ह यांची तपासणी केली असता त्यांच्या शरीरातही किरणोत्सर्गी पदार्थ धोक्याच्या पातळीच्यावर गेलेले आढळले!


विनोदाचा भाग सोडला, तरी रशियात अणुभट्ट्या व त्यावर चालणारी विद्युतकेंद्रे यांनी आसपासच्या भागात ठिकठिकाणी किरणोत्सर्गी प्रदूषणाचा धोका निर्माण झाला आहे हे सत्य आहे. अर्थात जगातील प्रगत राष्ट्रातही प्रदूषण राक्षसाने मानवी जीवन धोक्यात आणले आहे. 


मॉस्कोच्या हवेत दरवर्षी १० लाख टन कार्बन मोनॉक्साइड, नायट्रिक अॅसिड वगैरे प्रदूषित द्रव्ये सोडली जातात. मॉस्कोप्रमाणेच पॅरिस, वॉशिंग्टन, न्यूयॉर्क ही महानगरे भयानक प्रदूषित बनली आहेत. मग आपली दिल्ली, कलकत्ता, मुंबई ही शहरे तरी त्यांच्या तावडीतून सुटतील का? 


एकट्या मुंबईत म्हणे सुमारे १७०० टन प्रदूषिते रोज हवेत सोडली जातात. हिमालयासारख्या ठिकाणी पर्यटनासाठी जाणारे लोक तेथे प्रदूषण निर्माण करतात. अपघातामुळे मेलेल्या माणसांची शरीरे अनेक वर्षे तेथेच पडलेली असतात. त्यामुळे हवामान दूषित होते.


विज्ञानाने समृध्दी दिली, पण त्या बदल्यात चैन हिरावून घेऊन बेचैनी दिली. जीवन यांत्रिक झाले. निसर्ग व माणूस यात फारकत झाली. आयुष्याला प्रचंड गती आली. आपण (माणूस) आता प्रदूषणाच्या चक्रात गरगर फिरत आहोत. आज प्रदूषणाचा सर्वत्र अनिबंध संचार चालू आहे. 

हवा, अन्न, पाणी, जमीन, तापमान व ध्वनी या साऱ्यांनाच प्रदूषणराक्षसाने ग्रासून टाकले आहे. हवेचे प्रदूषण मुख्यत: मोटारी व ट्रक्स यांपासून होते. शहरातील कारखाने, अणुशक्तीवर व कोळशावर चालणारी विद्युतउत्पादन केंद्रेही त्यात • भर टाकतात. अणुस्फोटांमुळे तापमानात बदल होऊन ऋतुचक्रच उलटे फिरू लागते. 


वाढती लोकसंख्या, शहरातील माणसांची गर्दी यांमुळे शुध्द. हवा दुर्मिळ झाली आहे. वाहनांचे कर्णकर्कश आवाज, लाऊडस्पीकरचा आवाज व वाजवली जाणारी कर्णकटू गाणी, वाढलेल्या रहदारीचा गोंगाट यांनी ध्वनिप्रदूषण निर्माण केले आहे. रासायनिक खते व औषधी फवारे यांनी जमीन प्रदूषित केली आहे. 


सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावली जात नसल्यामुळे पाणी प्रदूषित होते. गंगेसारख्या पवित्र नद्यांचे पाणी तीर्थ म्हणून प्राशन करावे की नाही याची शंका निर्माण झाली आहे. _ निसर्गातील प्रदूषणापेक्षा आज मानवी मनाच्या प्रदूषणाने जगभर थैमान मांडले आहे. 

मुंबई, कलकत्त्यातील बाँबस्फोट, जगात कुठे ना कुठे चाललेल्या लढाया, वाढती गुन्हेगारी, भ्रष्टाचार, वशिलेबाजी, खूनसत्र, व्यसनाधीनता यांमुळे माणसांची मने प्रदूषित झाली आहेत. जगात कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात प्रदूषण हे दिसतेच. 


अगदी राजकीय गोष्टीत, अर्थव्यवस्थेत किंवा समाजव्यवस्थेत सर्वत्र अंदाधुंदी दिसतेच. धर्मांध माणसे परस्परांशी झुंजत आहेत. हे प्रदूषण जगात सर्वत्र पसरले आहे. त्याच्याकडे निष्क्रियतेने पाहून चालेल का? ख्रिस्त, पैगंबर, गांधींसारखे देवदूत कदाचित अवतरतीलही; पण आपलेही काही कर्तव्य आहेच ना? प्रत्येक माणसाने स्वत:पासूनच प्रदूषण हटविण्याची सुरुवात करावी. 


महामानवांनी दिलेले संदेश प्रत्यक्ष जीवनात केव्हा उतरणार? समता कधी प्रस्थापित होणार? एकमेकांचे पाय ओढणे, शोषण कधी थांबणार? मने कधी स्वच्छ होणार? मन शुचिर्भूत झाले की आपोआपच निसर्गाची ओढ लागणार ! 


सध्या पर्यावरणाबद्दल इतके बोलले जाते, लिहिले जाते की, सर्वसामान्य जनतेलाही पर्यावरण म्हणजे निसर्ग समतोल असे थोडक्यात सांगता येईल. नद्या, नाले, जंगले, डोंगर , वारा, माती, झाडे-झुडपे, समुद्र या सर्वांची एक विशिष्ट अवस्था असते. परस्परसंबंध असतो.


हा परस्परसंबंध मानवी जीवनाच्या दृष्टीने आरोग्यदायक व परिपूर्ण असतो. उत्तम पर्यावरणाच्या दृष्टीने भूपृष्ठाच्या एकंदर क्षेत्रफळांपैकी ४०% जमीन जंगलांनी व्यापलेली असावी लागते. पण दुर्दैवाने जगात तशी स्थिती नाही. भारतात तर ७ ते ८ टक्के एवढेच जंगल भूपृष्ठावर शिल्लक आहे व तेही विरळ होत चालले आहे.


विरप्पनसारखे तस्कर चंदनाच्या व्यापारासाठी गेली २२ वर्षे कर्नाटक शासनाला दाद देत नाहीत. याने म्हणे आतापर्यंत सुमारे २०० हत्तींची निघृण हत्या केली आहे. कर्नाटक, तामिळनाडू व केरळच्या सरहद्दीवरील सुमारे ४००० चौरस कि. मी. क्षेत्रात वीरप्पनच्या कारवाया दोन दशकांहून अधिक काळ चालू आहेत.


यावर उपाय म्हणजे युध्दपातळीवर वृक्षलागवड हाती घेतली पाहिजे. शासकीय खाती विशेषत: सामाजिक वनीकरण खाते व वनखाते वृक्षलागवड करीत आहेत. पण स्वयंसेवी संस्था व खाजगी संस्थांची तसेच जनतेची साथ या कार्याला मिळायला हवी. या दुष्टचक्रावर निर्धाराने मात करणे आवश्यक आहे.

सेवितव्यो महावृक्षः फलच्छायासन्वित:।
यदि दैवात्फलं नास्ति छाया केन निवार्यते।। 


वृक्ष म्हणजे पृथ्वीचे आशीर्वादासाठी उचललेले हात आहेत. ते आशीर्वाद नसतील तर मानवीजीवन टिकणार नाही, हे ध्यानी घेऊन आता तरी माणसाने निसर्गाचा समतोल ढळू देता कामा नये. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता.