पुरे ती फॅशन ! मराठी निबंध | Pure Ti Fashion Essay Marathi

 पुरे ती फॅशन!मराठी निबंध | Pure Ti Fashion Essay Marathi


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण पुरे ती फॅशन मराठी निबंध बघणार आहोत.   फॅशन म्हणजे अद्ययावत, लोकप्रिय, पद्धत, रीती, चाल. इतके फॅशन या शब्दाचे अर्थ आहेत. फॅशन हा शब्द व फॅशन करणे माहीत नाही असा माणूस या पृथ्वीतलावर सापडणे विरळा! कपड्यांची फॅशन, केसांची फॅशन, बोलण्याची फॅशन. किती विविध तन्हा!


इतरांपेक्षा वेगळे दिसावे, उठून दिसावे, आकर्षक दिसावे हाच हेतू फॅशन करण्यामागचा आहे. नुसती कपड्यांची फॅशन असा विचार केला तरी कितीतरी गोष्टी दृष्टीस पडतात. कापड खरेदीपासून चोखंदळपणा दिसून येतो. कोणत्या दुकानात खरेदी करायची इथून खलाला सुरुवात होते. दुकानांच्या पायऱ्यांचे चढउतार होतात. कधी रंग पसंत, तर कधी नक्षी नापसंत. आणि सर्व काही पसंत पण किंमत नापसंत.


या पसंतीसाठी दुकानातले कितीतरी कापड, साड्यांचे ढीग गारद केले जातात. दिवसभर गिहाइकांचे पसंत, नापसंत ऐकता ऐकता दुकानदाराला क्षणाचीही उसंत मिळत नाही. त्यातून दसरा, दिवाळी, पाडवा, गणपती असे सण, उत्सव आले की विचारूच नका.


माणसे दुकानात भिरभिरताना दिसतात. सेल असला तर गर्दीत जराही खंड पडत नाही. सेल ही सुध्दा दुकानदारांची फॅशनच असते. कारण दुकान नव्याने उघडले असले तरी लगेच सेलच्या पाट्या, जाहिराती दिसतात. मला तर वाटते दुकानाच्या नावाची पाटी रंगवतानाच सेलच्या पाट्याही त्याचवेळी रंगवून घेत असावेत बहुतेक दुकानदार!


स्त्री आणि फॅशन यांचा घनिष्ठ संबंध आहे. तसेच शिंपी आणि फॅशन यांचे संबंधही जिवाभावाचे आहेत.  फॅशनबरोबर शिंप्याचाही उत्कर्ष होत आहे. ब्लाऊज, पंजाबी पोशाख यात रंगसंगती, विविध आकार फॅशन करावी, पण त्यामागे 'नटणे' एवढाच हेतू नसावा. 


काही विचार असावा. आपण कोण? कसे? कुठे जातोय? कशासाठी जातोय? जातोय तेथे लोक कसे? या सर्वांचा विचार करून फॅशन करावी. आपण फॅशनमुळे उठून दिसावे. फॅशन उठून दिसू नये! डोळ्यात खुपेल अशी कोणतीही फॅशन करू नये. 


फॅशनला सभ्यतेचा लगाम लावावा. उच्च विचारांची फॅशन करावी. 'साधी राहणी उच्च विचारसरणी' हे तत्त्व प्रत्येक फॅशन करणाऱ्या माणसाने लक्षात ठेवून फॅशन करावी. म्हणजे पुरे ती फॅशन!' असे म्हणावे लागणार नाही. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता.   पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद



 निबंध 2 

पुरे ती फॅशन!मराठी निबंध | Pure Ti Fashion Essay Marathi



केशवसुतांनी म्हटले आहे, तुम्हांला मोठे होण्याची इच्छा आहे काय? असेल तर ती चांगले होण्याच्या इच्छेच्या लगामी पाहिजे आणि चांगले आहोत की नाही ते आईबापाच्या व घरातील लहानमोठ्या सर्व माणसांच्या मुद्रेत प्रथम पाहिले पाहिजे.'


याचा अर्थ असा की, 'माणसाच्या दिसण्यापेक्षा असणं महत्त्वाचं असतं'. म्हणतात ना, काय भुललासी वरालिया रंगा?' पण आजकाल अंतरीच्या सौंदर्यापेक्षा बाह्य गोष्टींनाच महत्त्व आले आहे. फॅशनचा उगम तरी कसा झाला असेल बरे? प्रत्येकाला वाटते, आपण दुसऱ्यापेक्षा सुंदर, आकर्षक व वेगळे दिसावे. 


विशेषत: तरुणवयात नटण्याचे वेड अधिक असते. तरुण मुलं-मुली पुन:पुन्हा आरशापुढं उभं राहून आपली छबी न्याहाळीत असतात; पण अतिवयस्कर माणसंही जेव्हा न शोभणारी पोरकट फॅशन करतात तेव्हा मात्र ती हास्यास्पद ठरतात. 


दुसरं कारण म्हणजे इतिहासाची पुनरावृत्ती होते. मधून मधून जुन्या फॅशन्स डोके वर काढतात. फॅशनचे हे अद्भुतचक्र अव्याहत फिरत असतं. रिकामटेकडे लोक फॅशन्सचा प्रसार करीत असतात. पाश्चात्त्यांचे अनुकरण हेही फॅशन वाढण्याचे एक कारण आहे. 


सिनेमातील नट-नट्या हा तर तरुणाचा वीक पॉईंट' असतो. ते जसे कपडे वापरतात, हेअरस्टाईल करतात तशीच आजकालची मुलं-मुली फॅशन करतात. आज जाहिरातींचे युग आहे. त्या जाहिरातींची


भुरळ सर्वांवर पडते. अमुक नटीचे सौंदर्य एखाद्या साबणाने उजळत असेल तर आपले का नाही उजळणार? म्हणून मग त्या साबणाचा वापर घरात सुरू होतो. फॅशनचे वेड प्रामुख्याने लहान मुले व स्त्रियांत अधिक असते. कारण ते फार सूचनक्षम असतात. सेल! सेल! सेल!! या जाहिराती लागायचा अवकाश, की सर्वांची धाव सेलकडेच! अशारीतीने फॅशनने आपल्या पायघोळ अंगरख्याखाली सर्वांनाच झाकून टाकले आहे.


आधुनिक युगात असे कोणतेही क्षेत्र शिल्लक नाही की तेथे फॅशनने आपला प्रभाव टाकला नाही. कपड्यांची फॅशन, गाड्यांची फॅशन, पादत्राणांची फॅशन, बांगड्यांची फॅशन, केसांची फॅशन, चष्यांची फॅशन, चालण्याची फॅशन, बोलण्याची फॅशन... ही यादी वाढत जाईल. 


नेहरु शर्ट, पायजमा, जाड भिंगाचा चष्मा, विस्कटलेले केस, वाढलेली दाढी, खांद्यावर शबनम अशी व्यक्ती पाहिली की ती नक्कीच अभ्यासजड, विद्वान असणार असे आपणाला उगीचच वाटते. खादीचे कपडे व गांधी टोपी पाहिली की हा नक्कीच पुढारी असणार, असा आपला अकारण समज होतो. 


बॉयकट केलेली, शर्ट-पँट घातलेली एखादी तरुणी पाहिली की, 'काय पण मॉड' आहे असे म्हणून आपण नाक मुरडतो. छान छान मेकअप करून (तोंडाला रंग लावून) शोभणारी वेशभूषा करून एखादी तरुणी लचकत, मुरडत रस्त्याने चालली की तिच्याकडे अनेकांच्या नजरा पुन्हा पुन्हा वळल्याच म्हणून समजा. 


आधुनिक पोशाख केलेला एखादा लुकडा पहिलवान पाहिला की, 'काय ध्यान आहे' म्हणून बघणारे त्याची खिल्ली उडवतात. 'हाय, बाय, हॅलो' ची फॅशन संपर्कामुळे आमच्या मानगुटीवर बसलेली आहेच म्हणा. शेवटी प्रश्न असा उत्पन्न होतो की या फॅशनचे काही फायदे-तोटे आहेत का? 'पर्सनालिटी' हा आजचा परवलीचा शब्द! 'एक नूर आदमी दस नूर कपडा?' 


फॅशनमुळे व्यक्तिमत्त्व खुलून दिसते. कुरूप व्यक्तींना फॅशन म्हणजे एक वरदानच लाभलेले आहे. फॅशनमुळे नसलेले सौंदर्य खुलून दिसते. जे आपल्याजवळ नाही त्याची जाणीव फॅशनमुळे भरून निघते.फॅशनचे तोटेही दुर्लक्षिता येत नाहीत, फॅशनच्या आहारी जाणाऱ्याचे स्वत:च्या आरोग्याकडे, स्वच्छतेकडे सुध्दा दुर्लक्ष होते. 


आजच्या धावपळीच्या जीवनात फॅशनमुळे अपव्यय होतो, तासन्तास त्यासाठी वाया जातात. फॅशनच्या आहारी जाणाऱ्यांच्या पैशाला कात्री लागते. अकारण खर्च वाढतो. म्हणून 'सिम्पल लीव्हिंग अॅन्ड हाय थिंकिंग' हे तत्त्व अनुसरावे. रामदासस्वामींनी म्हटलेलेच आहे


'भला रे भला ते बोलती करावे'

इतरांनी चांगले म्हणावे ही इच्छा बाळगणाऱ्यांनी त्याप्रमाणेच वागले पाहिजे, म्हणून नको ती फॅशन'. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद