असा धरी छंद मराठी निबंध | Asa Dhari Chanddh Essay Marathi

 असा धरी छंद मराठी निबंध | Asa Dhari Chanddh Essay Marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण असा धरी छंद मराठी निबंध बघणार आहोत.  'तुझ्याजवळ दोन पैसे असले तर एक भाकरीवर खर्च कर, एक फुलावर खर्च कर' ही चिनी म्हण मोठी गोड आहे. अगदी 'चिनी' सारखी (साखरेसारखी) तनाबरोबर मनाच्या गरजेची दखल तिने घेतली आहे. 


भाकरी शरीराची भूक, फूल मनाची भूक. या गरजेतून विविध कला उदयास आल्या माणूस चंचल मनाला नवनव्या गोष्टीत गुंतवू लागला. छंद त्यापैकी एक. । व्यक्ती तितक्या प्रकृती. त्याप्रमाणे व्यक्ती तितके छंद. शरीर निरोगी असेल तर जठराग्नी प्रदीप्त होतो. मनालाही भूक लागत असते, ते निकोप असेल तर! ती भागविण्याचं काम छंद करतात.


छंदयति इति छंदः । मन संतुष्ट करणारा, मनाला वळविणारा तो छंद. त्याच्या योगाने मन ताजंतवानं होतं. तब्येत खष होते. ज्याला एकही छंद नाही त्याची गणना 'पुच्छविषाणहीन पशू' तच करावी लागणार. छंदात बद्ध असलेलं रसाळ काव्य मनाला रिझवितं त्याप्रमाणे छंदबद्ध (काही ना काही छंद असलेल्या) सुसंस्कृत व्यक्तीचं व्यक्तिमत्व अधिकच खुलतं.


छंदांचा स्वभावही वेगवेगळा. काही स्वतःपुरते मर्यादित, स्वानंदासाठी, स्वान्तःसुखाय असतात. उदा. वाचन, पक्षिनिरीक्षण, पोहणे, गिर्यारोहण वगैरे वगैरे. समाजाभिमुख छंद स्वतःबरोबर इतरांनाही आनंद देऊन जातात. गायन, वादन, बागकाम इत्यादींचा अंतर्भाव त्यात करता येईल. काही छंद मात्र स्वतःला व समाजाला साऱ्यांनाच घातक असतात. सुज्ञाने त्यापासून (चकाट्या पिटणे, सतत टी.व्ही. पाहणे, पत्ते कुटणे) चार हात दूर राहायला हवे.


'निर्भेळ आनंदप्राप्ती' हा छंदापासून मिळणारा सर्वश्रेष्ठ लाभ. छंदामुळे मनोरंजन तर होतेच पण सहज एकाग्रता साधते. त्या त्या क्षेत्रातील नवनवीन ज्ञान मिळून व्यक्तिमत्त्व संपन्न होते. आत्मप्रगटीकरणाची संधी लाभते. काही छंद यश. कीर्ती. अर्थप्राप्तीही करून देतात (अर्थात छंदामागे तो उद्देश कधीच नसतो) 


'असा धरी छंद, जाई तुटोनि हा भवबंध' अशी संतांची शिकवण आहे आणि 'माझ्या मना लागो छंद, गोविंद नित्य गोविंद' असं आळविणारा गोविंदभक्त सायुज्यमुक्तीचा अधिकारी ठरतो. रामनामाचा छंद लागलेल्या वाल्याचा वाल्मीकी झाला हे ज्ञात आहे ना?

'वार्धक दुःखहरणम् ।' (म्हातारपणी दुःख हरण करणारे) हे वाचनाबाबतचं वचन थोड्याफार फरकाने सर्वच छंदांना लागू पडेल. तेव्हा ज्यांना आपले 'शेवटचे दिस गोड व्हावे' असं वाटत असेल त्याने लहानवयातच (विद्यार्थिदशेतच) एखादा छंद लावून घ्यायला हवा. किंबहुना ज्ञानेश्वरीतील 


'एक तरी ओवी अनुभवावी' हे जितकं महत्त्वाचं तितकंच एक तरी छंद लावून घ्यावा' हेही महत्त्वाचं असं म्हटलं तर मुळीच अतिशयोक्ती ठरणार नाही.आजच्या विद्यार्थ्यांना काय सांगावं? तो निव्वळ भारवाही (दप्तराच्या ओझ्याखाली वाकलेला) आहे. 


ह्या चालत्याबोलत्या संगणकाला डोक्यात नुसती माहिती कोंबावी (फीड करावी) लागते. खेळणं, व्यायाम, पायी फिरणं तर इतिहास जमाच झालं आहे. आपलं भावनिक विश्व समृद्ध करायला त्याला काडीचीही उसंत नाही. जो काय थोडाफार फावला वेळ मिळतो तो टी.व्ही., इंटरनेट, मोबाईल नावाचे राक्षस ओरबाडून घेतात.


त्या राक्षसांवर मात करता येणार नाही असं मात्र मुळीच नाही. 'रिकामा जाऊ नेदी एक क्षण' या समर्थांच्या वचनाचा मान राखून रिकामा वेळ छंदोपासनेत घालवायला हवा. 'इडियट बॉक्स' समोर बसून पढतमूर्खाच्या रांगेत बसू नये. वाचनासारखा सर्वोत्तम छंद नाही. 


डॉ. आंबेडकर, लो. टिळक, डॉ. राधाकृष्णन वाचनाचे खंदे पुरस्कर्ते. इतर गुरू चोवीस तास उपलब्ध नसतात. ग्रंथ मात्र अहर्निश आमच्या सेवेस तत्पर असतात. सुभाषिते, सुवचने, उत्तमोत्तम उतारे यांचा संग्रह करणे हाही एक अत्युत्तम छंद आहे. त्यामुळे दृष्टीचा वेचकपणा येतो, अभिरुचीची संपन्नता, विचारांची परिपक्वता प्राप्त होते. अनुभवविश्व समृद्ध होते.


बागकामाचा छंद जोपासणाऱ्या लोकांना वृक्षवल्लरींचा (सोयऱ्यांचा) प्रेमळ सहवास लाभतो. शरीर, मन ताजंतवानं होतं. शरीरकष्ट करण्याची सवय लागते. पक्षिनिरीक्षण करणाऱ्यांनाही निसर्गाचं सुखद, सान्निध्य भरभरून मिळतं. पक्षिविश्वाशी निकटचं नातं जोडलं जातं. मन संवेदनशील, विशाल बनते. तात्पर्य, छंदचि आमुच्या जीवाचे जीवन.


छंदोपासना करताना एक भान कायम असावे. छंदाचं रूपांतर छांदिष्टपणात होता कामा नये. छंदाचा कोवळा अंकुर आम्हाला फुलवायचा आहे, वाढवायचा आहे. तयाचा वेलू गगनावेही न्यायचा आहे. छंद कोणताही असो, एक मात्र खरे छंद असा की या धरतीवर, आनंदाचा स्वर्ग वसावा कल्पवृक्ष हा असो शिरावर, छंदातच गोविंद दिसावा.मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद