मी रेडिओ बोलतोय मराठी निबंध | Autobiography of Radio Essay in Marathi

मी रेडिओ बोलतोय मराठी निबंध | Autobiography of Radio Essay in Marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण मी रेडिओ बोलतोय मराठी निबंध बघणार आहोत.   "आकाशवाणी, मुंबई केन्द्र, खर्रर्रर्रऽऽ फ्यँव ऽऽऽ कूऽक् क् ? झावबावाडी, पावटयांची खोली...मी रेडिओ बोलतोय." "झावबावाडी, पावट्यांची खोली ! हे शब्द ऐकल्यावर मी चाट पडलो. हा काय प्रकार आहे ते मला समजेना, इतक्यात पुढे शब्द ऐकू आले


'मी तुमच्या खोलीतला रेडिओ बोलतोय ! बोलतोय कसला बोंबलतोय म्हणा ना ! दर वेळी हा आवाज ठेवून तुम्ही तिकडे पलंगावर लोळता आणि मग माझा आवाज चिरका यायला लागला की मला आणि आमच्या कंपनीला शिव्या देता. घर्रर्रर्र ! शिस्त हा शब्दच तुमच्या घरात दिसत नाही. तुमच्या ताईंना सदा 'वनिता मंडळ', 'आपले माजघर', 'गृहिणी', असले कार्यक्रम हवेत. 


बनी आणि मैना यांना नेहमी 'विविधभारती' हवी. तुमचा बंड्या एका केन्द्रावर दोन मिनिटे थांबेल तर शपथ. आता बी.बी.सी. पाहू. मग मॉस्को लागतेय का ते बघू. लखनौला आज कोणता कार्यक्रम आहे ? इंदूर भोपाळला कुणाचे गाणे आहे ? एक कार्यक्रम धड ऐकायचा नाही. 


दर वेळी बँड बदलायचे...केन्द्र बदलायचे...सारखा चाळाच तो. फ्यँ ऽऽव्व् ! कु ऽ कू ऽऽ कूऽऽऽ ! गंपूला एकसारखी क्रिकेट कॉमेंट्री हवी. अरे क्रिकेटचा खेळ चालू असतो तेव्हाच ती कॉमेंट्री असते हे याला सांगा रे कोणी तरी ! गुऽऽग ! आणि तुझ्यासमोर तर मी अगदी लोटांगण घालायला तयार आहे. कुठले माझे पूर्वजन्मीचे पाप उभे राहिले आणि तुझ्या शिक्षकांनी तुला माझ्या शरीराची माहिती करून दिली, असे झालेय मला. 


बाकी सारे माझ्या बटणांशीच खेळतात पण तू मात्र माझ्या शरीराचे विच्छेदन करीत असतोस. ज्ञान तर सारे अर्धवटच. पण तरी सुद्धा डायोड, कंडेन्सर, स्पीकर यांची खोलाखोल करतोस. अरे तुझा खेळ होतो पण माझा इकडे जीव जातो.


माइया अंगावर धूळ किती साचली आहे पाहिलीस ? माझ्या बाह्य शरीराला दोन ठिकाणी तडे गेले आहेत. एकदा गंप्याच्या मस्तीमुळे माझा ध्वनिक्षेपकच बिघडला, तुमच्या घरी आल्यापासून दोन वर्षात तीनदा माझी प्रकृती नादुरुस्त झाली. माझी नीट काळजी घ्या आणि निव्वळ विविधभारती किंवा सिलोन लावून बसू नका-माझे म्हणणे नीट ऐकलेत तर


मी तुम्हांला ताज्या बातम्या सांगेन, श्रुतिका, नाट्य, चित्रपट संगीत, वगैरे विविध मनोरंजनाचे कार्यक्रम ऐकवीन आणि अहोरात्र करमणूक करीन. अनेक शास्त्रीय विषयांवर महत्त्वपूर्ण माहिती सांगेन, तुम्हा सर्वाच्या आवडी-निवडी पुरविण्याची पराकाष्ठा करीन पण... कृपा करा व माझे हे हाल थांबवाऽऽऽ... फ्यँऽऽ व, घर्रर्रर्रर्र कूऽऽऽ कूऽऽऽ कू !!मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद