दारूचे दुष्परिणाम मराठी निबंध ! Daruche Dushparinam Marathi Nibandh

 दारूचे दुष्परिणाम मराठी निबंध ! Daruche Dushparinam Marathi Nibandh

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण दारूचे दुष्परिणाम मराठी निबंध बघणार आहोत.  

सोडुनि द्या मदिरा

पेटवि जी शरिरा

ज्ञान ध्यान अभिमानधनाचे हरण करी चतुरा दारूबंदी सप्ताह चालू होता. गावातल्या रस्त्यातून मुलांची प्रभातफेरी चालली होती, ती वरील गाणे म्हणतच पुढे चालत होती. त्या ओळी माझ्या कानांत तापलेल्या तेलाप्रमाणे झिरपत गेल्या.


दारू सोडा, दारू शरीराला पेटवते, ज्ञान, ध्यान, अभिमान आणि धन साऱ्याचे हरण करते, ही उदाहरणे मी पाहिली नाहीत का? दारू माणसाला आतून भाजून काढते. पचनशक्ती जाळून टाकते, लिव्हर निकामी करते. मद्यपी माणसाच्या....मेंदूला सतत मुंग्या आलेल्या ! त्याची सदसद्विवेकबुद्धी जळून खाक होते. स्मरणशक्तीला मरणप्राय अवकळा येते. 


नशेत तर असलेल्याला ज्ञान प्राप्त होणार कसे ? आणि ज्ञानी पुरुष जर नशाबाज झाला तर त्याच्या ज्ञानाचा उपयोग काय ? संजीवनी विद्येने मृतांना जीवन देणारा दैत्यगुरू शुक्राचार्य पण दारुच्या आहारी गेल्यामुळे देवगुरुपुत्र कच त्याच्या पोटात शिरला आणि त्यातून तपस्वी शुक्राचा -हास झाला. 


गडकऱ्यांच्या 'एकच प्याला' नाटकातला प्रख्यात कायदेपंडित. सुधाकर ! अपमान विसरण्याच्या निमित्ताने त्याने दारूचा 'एकच प्याला' एकदा घेतला आणि तो त्याच्या पुरता अधीन झाला.त्या दारूच्या नशेत त्याची वकिली संपली आणि त्या , दारूपायी त्याने आपल्या बायको-मुलांना मारले. एवढेच नव्हे तर पश्चात्तापाने स्वतःही विष प्राशन केले !


अशी कथा-पुराणातली आणि नाटकातली उदाहरणे कशाला, प्रत्यक्ष व्यवहारातली उदाहरणे काय सांगतात ! वाईच्या प्राज्ञ पाठशाळेत संस्कृतचे अध्ययन केलेला अत्यंत विद्वान ब्राह्मण एस.टी. मध्ये कंट्रोलर (उपव्यवस्थापक) होता. दारूपायी त्याची नोकरी सुटली, भिक्षुकी लोपली आणि रस्त्याच्या कडेला झिंगून पडून बेवारशी कुत्र्यासारखे मरण त्याला स्वीकारावे लागले. 


ही शोकांतिका मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली आहे. सुतारकाम, गंवडीकाम, सायकल दुरुस्ती, मोटर सायकल दुरुस्ती या विविध कामात वाकबगार असा माझा मित्र. ज्या कामात हात घालील त्यात यश खेचून आणणारा. नाट्यसंगीत, सिनेसंगीत याची अत्यंत रसिक जाण असणारा, 


मोठमोठ्या तंत्रज्ञांना किंवा यंत्रविशारदांना एखाद्या यंत्रातला दोष (Fault) अनेक दिवस खटाटोप करून मिळणार नाही तो हा केवळ त्या यंत्राच्या आवाजावरून ओळखणारा; असे सोन्यासारखे गुण अंगी असणारा माझा मित्र; पण याला कोणत्या तरी बेसावध क्षणी दारूचे व्यसन जडले आणि याच्या सोन्यासारख्या गुणांची माती माती झाली !


दारूच्या बाटलीने त्याचे सारे रूप, गुण, सारे कर्तृत्व गिळून टाकले अखेर दोनवर्षां पूर्वी त्यातच त्याचा अंत झाला. प्रथितयश कलावंत, कवी, मोठे मोठे शास्त्रज्ञ, मोठे मोठे अधिकारी यांनाही या दारूने साफ धुळीला मिळविले.


सतीश दुभाषी, बबन प्रभू, गणेश सोळंकी, डॉ. काशिनाथ घाणेकर यासारखे रंगभूमीवरील नट, सी. रामचंद्र सारखे संगीत दिग्दर्शक, आरती प्रभू, अनिल बर्वे या सारखे साहित्यिक असे कित्येक श्रेष्ठ कलावंत या दारूने गिळले आहेत. (प्रख्यात अभिनेत्री लालन सारंग यांनीदेखील यावर कडाडून टीका केली होती.)


ल्लीच्या दिवसांत 'पार्टी' एक फॅशन झाली आहे आणि त्या पार्टीत बेसुमार दारू पिऊन बेहोश होणे हीदेखील एक फॅशन होऊ पाहात आहे. संसारातले सुख समाधान, स्वास्थ्य आणि समृद्धी या साऱ्यांचा सत्यानाश करणाऱ्या या दारूपासून चार पावले दूर रहा !


किती वेळ मी त्या तंद्रीत होतो कोण जाणे ! पण मी भानावर आलो तेव्हा त्या प्रभात फेरीमधल्या गाण्याच्या पुढील ओळी माझ्या कानावर आल्या सुरासागरी किती बुडाले, वारुणी विषे किती पोळले मद्याने मातीस मिळविले मानव-मन-मंदिरा। झडकरी सोडुनि द्या मदिरा ।। मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद