"महात्मा गांधी" निबंध मराठी | Essay On Mahatma Gandhi

 "महात्मा गांधी" निबंध मराठी | Essay On Mahatma Gandhi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  "महात्मा गांधी"  मराठी निबंध बघणार आहोत.   “या जगात अतिशय चांगले असणे हे देखील तितके चांगले नाही." ३० जानेवारी १९४८ रोजी गांधीजींची हत्या झाल्यानंतर प्रसिद्ध ब्रिटिश नाटककार जॉर्ज बर्नार्ड शॉ यांनी हे उद्गार काढले. पाकिस्तानला ५५ कोटी रुपये द्यायचे कबूल केल्याबद्दल चिडून जाऊन गांधीजींची हत्या करण्यात आली होती. अहिंसेच्या पुजाऱ्याचीच हिंसा झाली होती.


गांधीजींचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ रोजी काठेवाडमध्ये पोरबंदर येथे झाला. त्यांचे संपूर्ण नाव 'मोहनदास करमचंद गांधी'. 'सत्याचे प्रयोग' या आपल्या आत्मकथेत गांधीजींनी आपल्या बालपणीच्या अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. लहानपणी इतर मुलांच्या नादाने हॉटेलात खाणे, पैसे पुरले नाहीत म्हणून सोन्याचे कडे विकणे, इतरांच्या नादाने विड्या ओढणे वगैरे अनेक दोष गांधीजींनी मोकळेपणाने आपल्या आत्मचरित्रात सांगितले आहेत.


२८ व्या वर्षी बॅरिस्टर झाल्यावर ते आफ्रिकेत गेले असता तेथील हिंदी लोकांचा होणारा छळ पाहून त्यांचे हृदय द्रवले. तेथील हिंदी लोकांच्या न्याय्य हक्कासाठी व त्यांच्या उद्धारासाठी त्यांनी अखंड प्रयत्न केले. वेळोवेळी स्वतःची मानखंडना सहन केली, पण आफ्रिकेतील भारतीय जनतेला त्यांनी अनेक हक्क मिळवून दिले.


टिळकांच्या मृत्यूनंतर १९२० पासून भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व गांधींकडे आले. जहाल युगाचा अस्त झाला. सत्याग्रह, निःशस्त्र प्रतिकार, सविनय कायदेभंग व स्वदेशीचा पुरस्कार या चार तत्त्वांवर महात्मा गांधींनी आपले आंदोलन उभारले. 


बार्डोलीचा सत्याग्रह, दांडीयात्रा, चंपारण्य चळवळ, १९३० सालचा मिठाचा सत्याग्रह, १९४२ चा विलक्षण क्रांतिकारी 'छोडो हिंद' (Quit India) संग्राम, ही महात्मा गांधींच्या देदीप्यमान राजकीय जीवनचरित्रातील सोनेरी पाने होत. या सत्याग्रहासाठी त्यांनी 'उपोषणा'चे नवे शस्त्र काढले. 


स्वातंत्र्य लढ्यात त्यांना अनेक वेळा उपोषण करावे लागले. कित्येकदा कारावास भोगावा लागला. गांधीजींच्या राजकीय व सामाजिक चळवळीत त्यांच्या पत्नी कस्तुरबा यांनी त्यांना उत्तम सहकार्य दिले. गांधीजींच्या व्यक्तिमत्त्वाशी त्या अगदी एकरूप झाल्या होत्या. संसारातसुद्धा, डाळी सोड, तेलकट पदार्थ सोड, सांसारिक बंधने सोड, यासारखे कित्येक प्रयोग गांधीजींनी केले आणि कस्तुरबांनी त्यांना प्रेमाने साथ दिली.


राजकारण एवढेच काही गांधीजींचे कार्यक्षेत्र नव्हते. हरिजनोद्धारासाठी त्यांनी 'हरिजन' साप्ताहिक चालवले. 'यंग इन्डिया' मधून ते इंग्रजी लेखन करीत. दारूबंदीच्या प्रसारासाठी त्यांनी जिवाचे रान केले. साबरमतीच्या काठी सेवाश्रम स्थापन केला. 


दीन, दलित, दुबळे, हरिजन, गिरिजन, रोगी, महारोगी अशा लोकांच्या प्रत्यक्ष सेवेसाठी गांधीजी सदैव तत्पर असत. त्यांचा व व्याकरण आत्मा खरोखर सर्वाभूती परमात्मा पाहत होता. म्हणूनच लोक त्यांना 'महात्मा' म्हणू लागले. शिक्षणातसुद्धा 'वर्धा शिक्षण योजना' मार्फत त्यांनी नवी 'मूलोद्योग पद्धती' सुरू केली.


इतके असूनही 'भारतीय स्वातंत्र्य' हे त्यांचे स्वप्न होते. हिंदू-मुस्लिम-शीख-इसाई या सर्वांनी या राष्ट्रात एकात्म भावनेने राहावे, आपापल्या धर्माची वैशिष्ट्ये सांभाळूनही एकमेकांशी मिळून मिसळून एकराष्ट्रीय वृत्तीने आनंदात जगावे ही त्यांची महत्त्वाकांक्षा होती. म्हणूनच १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळताच त्यांना लोकांनी 'राष्ट्रपिता' म्हणून बहुमान दिला.


पण पाकिस्तानच्या निर्मितीबरोबरच गांधीजींच्या ध्येय धोरणांविषयी जनतेत निर्माण झालेल्या असंतोषातून ३० जानेवारी १९४८ रोजी त्यांचा खून झाला. बुद्ध, खिस्त, अब्राहम लिंकन या शांतिदूतांच्या वाटेनेच गांधीजी अखेर हे जग सोडून गेले. दुर्दम्य इच्छाशक्तीच्या व देशभक्तीच्या जोरावर सामान्य माणूसही किती असामान्य होऊ शकतो याचे गांधीजी हे एक मोठे उदाहरण आहे. 


त्यांची आठवण होताच कवी मनमोहन यांच्या काव्यपंक्ती मनात बोलू लागतात "चंदनाचे खोड लाजे हा झिजे त्याहून ही आज कोटी लोचनींच्या अश्रुमाला वाहताती...मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद