माझी शाळा मराठी निबंध Essay on My School in Marathi

 माझी शाळा मराठी निबंध Essay on My School in Marathi

नमस्कार  मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझी शाळा मराठी निबंध बघणार आहोत.  


विद्यालय हे मंदिर सुंदर प्रयाग जणू हे प्रज्ञेचे । 

ज्ञानदिवाळी शोभा उजळी प्रसन्न गृह हे विद्येचे ॥


शाळेच्या आवारात शिरता शिरता प्रार्थनेचे सुरेल, मधुर स्वर कानावर आले. किती सुंदर प्रार्थना! जशी सामवेदातील ऋचाच! त्या अबोध वयात प्रत्येक शब्दाचा अर्थ उमगला नव्हता. पण 'शाळा हे मंदिर आहे' हा भाव हृदयाला भावून गेला. त्याच परममंगल क्षणी दगडामातीच्या त्या वास्तूशी माझे सूर जुळले. मी हलकेच कुजबुजले, "बाबा, मला याच शाळेत प्रवेश घ्यायचाय."


"हं, बोला, काय काम होतं?" साध्यासुध्या पण पांढऱ्या स्वच्छ पोशाखातील व्यक्तीने प्रश्न केला. 'हे मुख्याध्यापक असावेत' मी तर्क बांधला. प्रथमदर्शनीच त्यांच्याबद्दल आदर वाटला. पण भीती वगैरे मुळीच वाटली नाही. “सर, मला शाळा पाहायला मिळेल?" मी बिनधास्त विचारणा केली. 


“वा, वा, का नाही?" तत्काळ सहमती दर्शवीत सरांनी त्या कामी (शाळा दाखविण्याच्या) श्रेयाताईची नेमणूक केली आणि अस्मादिकांची स्वारी शाळा निरीक्षणासाठी निघाली. शाळा तशी छोटीशीच पण टुमदार! नुकतीच रंगरंगोटी केल्यामुळे ऐटबाज वाटत होती. आवार एकदम लख्ख आरशासारखं! 


कागदाचा चिटोरा नाही की बोरा-आवळ्याची बी नाही. “सर, स्वतः येता जाता कचरा वेचत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपोआपच शिस्त लागते.” श्रेयाताईने सांगितले. म्हणजे 'उक्ती नव्हे कृती' हे बोधवाक्य नुसते सांगण्यापुरते नाही. ते आचरणातून व्यक्त होते तर! 'उक्ती आणि कृतीचा' हा संगम किती सुखकारक, नि उपकारकसुद्धा!


सुभाषित, सुवचनांच्या पाट्यांनी शाळेचे बहिरंग सजले आहे. शाळेत प्रवेश केल्याकेल्याच एका सुवचनापाशी माझी पावलं थबकली होती. 'Come to learn and go to serve' मी मनोमन निश्चय केलाय. आपली बुद्धी, ज्ञान, शक्ती सत्कारणी लावायची. 'हा व्यर्थ भार विद्येचा' अशी गत व्हायला नको.


जिना उतरताना संगमरवरात कोरलेली श्रेयनामावली दिसली. शाळेची वास्तू उभी करण्यात ज्यांनी ज्यांनी फूल ना फुलाची पाकळी अर्पण केली. आधाराचा हात दिला त्या साऱ्यांची नावे त्यावर कोरली आहेत. त्याग आणि एकीच्या बळावर खूप काही करता येतं, याची साक्ष देण्यासाठी तिचं प्रयोजन!


प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला एक छोटेखानी बगिचा आहे. तोही आखीवरेखीव, स्वच्छ, नीटनेटका! मोकळ्या तासात, निसर्गाच्या सहवासात, कवितेच्या भेंड्या खेळण्यात, गोष्टी, गाणी ऐकण्यात किती मज्जा येत असेल नाही? मी उत्तेजित होऊन म्हटलं.


माझं शाळेत जाणं सुरु झालं आणि शाळेच्या बहिरंगापेक्षाही अंतरंग निर्मळ, सुंदर आहे याचा प्रत्यय आला. तेथील ऐकून वातावरणच कौटुंबिक, जिव्हाळ्याने ओतप्रोत भरलेले! अर्थात माझ्यासारख्या बोलघेवडीला नव्याची जुनी व्हायला फारसा वेळ लागला नाही. 


या पाच वर्षात खूप मैत्रिणी मिळाल्या, अगदी जिवाभावाच्या! येथील शिक्षकांबद्दल काय सांग? ते जितके शिस्तकठोर तितकेच प्रेमळ. विद्यार्थ्यांवर अपत्यवत प्रेम करणारे! त्यांची आत्मीयता पाहून कोणीही भारावून जावं. पाचवीतलाच एक प्रसंग! माझी एक मैत्रिण डोळ्याने अधू होती. जाड भिंगाचा चष्मा लावायची. एका मुलीने तिला 'आंधळी' म्हणून हिणविले. ते ऐकून बाईंच्या डोळ्यात टचकन पाणी आले. शब्दांनी होणार नाही ते काम अधूंनी केले. 


मुलीला आपली चूक उमगली. पश्चात्तापाचे अश्रू घरंगळले. नंतर दोघी 'जिगरी दोस्त' बनल्या. इथल्या मातीत काय जादू आहे कोणास ठाऊक तीवर पाय ठेवताच 'बॅटरी चार्ज' होऊन जाते. आळस, थकवा, कंटाळा कुठल्या कुठे पळून जातो. प्रत्येक क्षण उत्साहाने भरून जातो. कार्यक्रम कोणताही असो तो उत्साहातच साजरा होणार, हा इथला अलिखित नियमच! स्नेहसंमेलनं म्हणजे तर आनंदाची पर्वणीच म्हणा की!  


'तोचि शिक्षक संस्कृतिरक्षक ज्ञानदान ही ज्यास स्पृहा' असे सच्चे शिक्षक या शाळेला लाभले हे शाळेचं नि विद्यार्थ्यांचं अहोभाग्यच. या आदर्श शाळेतील माझं हे शेवटचं वर्ष. गेल्या पाच वर्षांचा मागोवा घेते तेव्हा शाळेविषयीच्या कृतज्ञतेने माझं मन काठोकाठ भरून जातं. इथे आम्ही खेळलो,


बागडलो, घडलो सुद्धा. पुस्तकी ज्ञानाची व्यवहाराशी सांगड घालायला येथील गुरुजनांनी आम्हाला शिकविले. मूल्यांचे धडे घेताना आत्मविश्वासाबरोबर नम्रतेचं मोलही कळलं. इथेच लाभले कल्पनांचे पंख नि वास्तवतेचं भान. सुसंस्कार आणि सद्गुणांची भक्कम शिदोरी या ज्ञानमाऊलीने आमच्या पाठीशी बांधली. खरं तर या ज्ञानमंदिरात आम्हाला 'जगायचे कसे?' याचे प्रात्यक्षिक पाठ पाहायला मिळाले. 


ते आदर्श होते हे सांगायलाच नको.  लकानगरी सुवर्णमंडित होती. पण ती श्रीरामांना रुचली नाही. 'प्रासाद इथे भव्य परी मज भारी, आईची झोपडी प्यारी' या ओळीत स्वा. सावरकरांनीही ह्याच भावना व्यक्त केल्या आहेत. मलाही तसंच वाटतं. या जगात माझ्या शाळेपेक्षा भव्य, उत्तमोत्तम, आदर्श शाळा असतीलही पण माझ्या हृदयपटलावर पहिल्या स्थानावर कोरलं गेलेलं नाव मात्र माझ्या शाळेचंच असेल.


मला खात्री आहे की इथल्या मातीत रुजलेलं प्रत्येक रोप जगाच्या पाठीवर कुठंही गेलं तरी जोमाने फोफावेल. वायवादळाला, ऊन पावसाला भीक घालणार नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे ते सर्वांचा 'आधारवड' बनेल. त्याच्याजवळ येणाऱ्या प्रत्येकाला तो मोठ्या अभिमानाने सांगेल. 


"मी इथे उभा असलो तरी माझी पाळंमुळं दूरवर असलेल्या त्या पावन वास्तूत आहेत. त्या परमप्रिय वास्तूचं नाव, गाव ऐकायचंय? ते आहे "महाराष्ट्र कन्या शाळा, अकोला."  मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद