संत गाडगे बाबा” वर मराठी निबंध Essay on sant gadge baba in Marathi

 संत गाडगे बाबा” वर मराठी निबंध Essay on sant gadge baba in Marathi


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण संत गाडगे बाबा” वर मराठी निबंध बघणार आहोत. गाडगेबाबा म्हटलं की अंगावर चिंध्या, डोईवर खापर, एका कानात लोंबणारी कवडी, दुसऱ्या कानात डुलणारी बांगडीची काच, हातात गाडगं, काठी नि खराटा अशी मूर्ती डोळ्यासामोर उभी राहते. 


पण त्यांचं अफाट कार्य पाहिलं की चिंध्यांसह पांघरलेल्या त्या वेडाआड एक अलौकिक विभूतिमत्त्व दडलेलं होतं याची मनोमन साक्ष पटते. । २३ फेब्रुवारी १८७६ (महाशिवरात्र) हा गाडगेबाबा ऊर्फ 'डेबू'चा जन्मदिवस. सखूबाई, झिंगराजी हे त्याचे मायतात. खाऊनपिऊन सुखी कुटुंब पण दारूच्या व्यसनापायी झिंगराजीने मृत्यूला कवटाळले. पितृछात्र हरवलेला लहानगा डेबू मातेसह मामाच्या आश्रयाला 'दापुरा' या गावी आला.


सखूबाई मोठी कष्टाळू. कामही स्वच्छ, नीटनेटकं. पडेल ते काम करायला एका पायावर तयार. त्या चालत्या बोलत्या कर्मयोगाचा डेबूच्या मनावर, जीवनावर कायमचा ठसा उमटला. मातेच्या पावलावर पाऊल ठेवून त्यानेही
कामाला कंबर कसली.



लौकरच डेबूनं गुरं राखायचं काम स्वेच्छेने स्वीकारलं. हळूहळू सर्व खेळात, पोहण्यातही तो तरबेज झाला. त्याच्या मधुर आवाजातील भक्तिरसाने ओथंबलेली भजने ऐकून श्रोतृवृंद डोलू लागे. नांगर चालविणे, कुळवणी, पाभार या शेतिविषयक कामात त्याने कौशल्य संपादन केले. 


शेतीची संपूर्ण जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेऊन मामाच्या शिरावरचा भार हलका केला. तेजस्वी चेहरा, सुदृढ शरीर, असामान्य कर्तृत्व लाभलेला डेबू साऱ्यांच्या कौतुकाचा विषय होऊन बसला. वयाच्या १५व्या, १६व्या वर्षीच डेबूचा विवाह झाला. पण त्याचं मन फार काळ संसारात रमलं नाही. 


विश्वाचं कोडे सोडविणारा गुरू कोण, कधी, केव्हा, कुठे भेटेल याची तळमळ लागून राहिली. शिष्याची आर्त हाक गुरूच्या कानी पोचली आणि एका साधुमहाराजांनी डेबूवर कृपा केली. डेबुजी मोहनिद्रेतून जागा झाला. एका रात्री, सर्व जग निद्रेच्या आधीन असताना डेबूजीने चार भिंतीतल्या प्रपंचाला कायमचा रामराम ठोकला. भ्रमंती सुरु झाली. पाय नेतील त्या दिशेनं. पण ती दिशाहीन नव्हती. अज्ञात गुरू त्यांना चालवीत होता. 


कसून शोध घेतल्यावर ऋणमोचन येथील यात्रेत डेबूजी दृष्टीस पडला. घरी परतण्यासाठी सर्वांनी मनधरणी केली पण व्यर्थ. “कुनाचं ही काम कराव, अंगन झाडाव्, भांडे घासाव, ओझं वाहाव्, कापूस वेचू लागाव आन हे करता करता देवाचं नाव घ्याव. आसा आनंद येतो! जशी आनंदाची बरसात होत राहते!" अशा स्वंगसुखाचा चटक लागलेला  डेबूजी चार भिंतीच्या कोंडवाड्यात जायला कसा तयार होणार? 



शेवटी त्याचे कुटुंबिय ऋणमोचनाला आले. मोलमजुरी करून जीवन कटू लागले. डेबूजी आता 'गाडगेबाबा' या नावाने ओळखल्या जाऊ लागले. गाडगेबाबा दिवसभर यात्रेकरूंची सेवा करीत. साफसफाई करता करता मनावरची धूळ, जळमटं काढून टाकण्याचं आवाहन करीत. 



समाजातील दुष्ट रूढी, निरर्थक परंपरांचा नायनाट करण्याचे व्रत या स्वच्छतादूताने स्वीकारले. धर्मभेदाची, जातिभेदाची वाळवी दूर करण्याचा चंग बांधला. विषमतेच्या त्रिपुरासुराला मारले. रोगराईच्या भस्मासुराचे भस्म केले. वासनेचा वृत्रासुर मारण्यासाठी शस्त्र उपसले. गाडगेबाबा रात्री भजन निरूपण करीत. कीर्तन हा तर त्यांचा प्राण! गाडगेबाबांचं कीर्तन म्हणजे रसांची मेजवानी असे. 


त्यात विनोदाचा रिमझिम पाऊस बरसे, ज्ञानाचा प्रकाश विलसे, 'मुद्याची गोठ' गवसे. कीर्तनातून ते सांगत “नाम घ्या फुका, न लगे दमडी अथवा रुका." अंगारे धुपारे करणे, देवरुपाकडे जाणे, ढोंगबाजी, कर्मठपणा, अंधश्रद्धा यावर ते कठोर प्रहार करीत.



“आईबापाला विसरू नका, शिकल्याशिवाय राहू नका, दारुपायी जीव गमावू नका, मुक्या जनावरांचे शाप घेऊ नका, शिवशिव पाळू नका" अशा मोलाच्या सूचना त्यांच्या कीर्तनातून मिळत. “गरिबांना मदत करावी, देवानं दिलेल्या शरिराचा चांगला उपयोग करावा, वेळ बहुमोल धन आहे त्याचा सदुपयोग करावा" असं कळकळीचं आवाहनही करीत.


अर्थात त्यांनी 'आधी केले, मग सांगितले.' गाडगेबाबा आयुष्यभर खूप फिरले. गोरगरीब, आंधळे, लुळेपांगळे, महारोगी, म्हातारेकोतारे, उपेक्षित यांना मदत करणं हीच त्यांची देवपूजा होती. यात्रेकरूंचे हाल पाहून त्यांच मन कळवळायचं. 


त्यांच्या सोयीसाठी त्यांनी पंढरपूर, नाशिक, आळंदी, देहू, त्र्यंबकेश्वर इत्यादी ठिकाणी धर्मशाळा उभारल्या. त्यांच्या प्रयत्नांनी पुण्याला विद्यार्थ्यांसाठी तर मुंबईला गोरगरिबांसाठी विश्रांतीस्थान उपलब्ध झालं. आळंदीला कुष्ठरोग्यांना विसावा मिळाला. मूर्तिजापूरला गोरक्षणसंस्था उभी ठाकली.


बाबांनी केलेल्या पुण्यकर्मांची गणना कोणी करावी? धर्मशाळा, शाळा, वसतिगृहे, पाणपोया एक ना दोन! बाबांचं समाजकार्य धडाक्यात चालू होतं. हातातला खराटा विसंबत नव्हता. भजनकीर्तनात खंड नव्हता. तन श्रांत झालेलं पण मन विश्रांती नाकारत होतं. शेवटचा 'राम' म्हटल्यावरच ते आराम करणार होतं.


१९ डिसेंबर १९५६ ची काळरात्र. बाबांची प्रकृती गंभीर होती. काळाच्या पावलांची चाहूल ऐकू येत होती. रात्री १२ वाजून २० मिनिटे  झाली आणि बाबांनी अंतिम श्वास घेतला.
सूर्य केव्हाच मावळला होता.


 'गाडगेबाबा' नावाचा ज्ञानसूर्यही अस्तंगत झाला. त्याच्या दर्शनासाठी नभांगणात नक्षत्रांनी दाटी केली. उल्काफुलांनी वृष्टी करून मानवंदना दिली. वेलीवरील अर्धोन्मीलित कळ्या भावफुलांची ओंजळ वाहत होत्या.

"मावळत्या दिनकरा
अर्घ्य तुज, जोडूनि दोन्ही करा"




मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद