कंटाळा आला या परीक्षांचा मराठी निबंध | KANTALA AALYA YA PARIKSHANCHA MARATHI NIBANDH

 कंटाळा आला या परीक्षांचा मराठी निबंध | KANTALA AALYA YA PARIKSHANCHA MARATHI NIBANDH


 नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  कंटाळा आला या परीक्षांचा मराठी निबंध बघणार आहोत.  'घण घणऽऽऽ' कसला आवाज बरं हा ! घड्याळाचा गजर झाला की काय ? असा विचार करीत मी ताडकन उठून अंथरूणावर बसलो ! घड्याळात पाहतो तो काय ? ते रात्री दोन वाजताच बंद पडलं होतं. 


माझ्या मनात सारखी परीक्षेची धास्ती...'लवकर उठायला हवं असं म्हणत रात्री ११ वाजता झोपलो होतो. कुठला गजर नि काय ? झोपेत झालेला भासच तो!...' परीक्षेच्या दिवसात असे भास सर्वच विद्यार्थ्यांना दिवस-रात्र होत असतात. जिवाला एक प्रकारची बेचैनी येते. गोडी लागत नाही. 


चांगलं काही वाचावंसं वाटत नाही. नाटक-सिनेमा तर दूरच...पण फिरायला जाणंसुद्धा बंद ! कारण काय ? तर परीक्षा ! बरं, या परीक्षा तरी काय क्वचित येतात म्हणता ! छे ! शाळेच्या अगदी पहिल्या महिन्यापासून यांचा जाच सुरू ! आता काय घटक चाचणी परीक्षा, मग काय सहामाही परीक्षा नंतर काय म्हणे पूर्वपरीक्षा...आणि शेवटी बोर्डाची परीक्षा ! 


बरं या झाल्या शाळेतल्या परीक्षा. या शिवाय क्लासमध्ये दर आठवड्याला कोणत्या तरी विषयाचा पेपर आहेच ! क्लासच्या परीक्षा, स्पेशल परीक्षा, प्रयोग-परीक्षा एक ना दोन ! कंटाळा आला या परीक्षांचा ! या परीक्षा तरी नेहमी वेळेवर होतात का ? नाव नको. कधी आठ दिवस पुढे ढकलल्या आहेत, तर कधी माहिना महिना पुढे.


मग त्या बोर्डाच्या परीक्षा असोत की हायस्कूलच्या असोत. विद्यापीठांच्या परीक्षा तर वेळापत्रकाप्रमाणे होतील अशी चुकूनसुद्धा आशा नको. काही वेळा तर त्या बेमुदत ढकलल्या जातात. परीक्षा अशा पुढे ढकलल्या की फार हाल ! डोक्यावरचा ताण सतत वाढता राहतो. 


सारखं सारखं तेच तेच, तेच तेच वाचणार तरी किती वेळा आणि किती दिवस ! तीच पुस्तकं, तीच गाईडस. त्याच वह्या, त्याच नोटस किती वेळा वाचायच्या ? रोज कढी आणि भात जेवायला दिला तर ? सकाळ-संध्याकाळ तेच ! आठ दिवस तरी जेवून दाखवाल का ? मग तीच गत या अभ्यासाच्या वाचनाची.


परीक्षा संपेपर्यत घरी दारी, बाजारी, शाळेत, कॉलेजात सर्वत्र बंधनं...जास्त झोपू नका. उशिरा उठू नका. खेळात वेळ दवडू नका, अवांतर वाचन करू नका. मग करा काय? तर अभ्यास...सकाळी अभ्यास, दुपारी अभ्यास ! संध्याकाळी अभ्यास. एवढेच नव्हे तर रात्रीसुद्धा अभ्यास ! काय ? तर म्हणे परीक्षा संपली की मग काय सगळा वेळ मोकळाच आहे. तेव्हा काय


त्या उनाडक्या करा. पण आता अभ्यास करा. कोणाला सांगता या भूलथापा ? आम्हांला ? परीक्षा कधी संपतात का ?... _...आणि अगदी खरं पाहिलं तर या परीक्षांचा तरी खरोखर उपयोग होतो का ? परीक्षेत पहिल्या पन्नासात येणारी किती मुलं पुढे कॉलेजमध्ये चमकतात ? 


त्यातले कितीजण आयुष्यात मोठे डॉक्टर, वकील, इंजिनियर किंवा प्रोफेसर होतात ? आणि चाळीस-पन्नास टक्के मार्क मिळणाऱ्यांचे हाल काय विचारावे ! त्यांना कॉलेजमध्ये प्रवेश मिळताना महामुश्कील ! आणि नोकरी ? ती मिळायची म्हणजे दिव्यच.


पण जाता जाता मनात येतं, की परीक्षा टाळून टळतात का ? आयुष्यात आपल्यापुढे कित्येक परीक्षा द्याव्या लागतात. कठीण प्रश्नांना तोंड द्यावं लागतं. आपल्या शाळा-कॉलेजच्या परीक्षांमुळेच आपल्या मनाची तशी घडण होते ना ? मग परीक्षा टाळून कसं चालेल ?...चला तर-लागा परीक्षेच्या तयारीला. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद