माझे बालपण मराठी निंबध | Majhe Balpan Marathi Nibandh

 माझे बालपण मराठी निंबध | Majhe Balpan Marathi Nibandh

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझे बालपण मराठी निबंध बघणार आहोत.  'शुभमंगल सावधान' भटजीबुवांनी खणखणीत आवाजात आरोळी ठोकली. अंतरपाट दूर झाला. टाळ्यांच्या कडकडाटात नवरानवरीच्या गळ्यात पुष्पमाला घातल्या गेल्या. 


सुलग्न लावण्यासाठी उपस्थितांनी एकच झुंबड केली. वहाडी जनांनी लाडू, चिवडा, करंज्या, चकल्या इत्यादीचा समाचार घेत तृप्तीची ढेकर दिली. हे थाटामाटाचे लग्न कुणाचे होते बरं? अर्थात माझ्या लाडक्या छकुलीचे. तिच्यासाठी त्रिभुवनात सापडणार नाही असा वर मी धुंडला होता. 


तो म्हणजे तेजश्रीचा एकुलता एक (टिकोजीराव) बाहुला 'राजा'! बाबागाडीच्या ‘बग्गी'तून नवरावनरीची वरात निघाली. सोहळा संपल्यावर छकुली आणि राजा ने परस्परांना 'बाय' केले. बाहुलाबाहुलीच्या लग्नाचा मुहूर्त दिवाळीच्या सुटीतच असायचा त्यामुळे आता आपली भेट पुढच्या वर्षी दिवाळीत असेच काहीसे त्यांनी एकमेकांना म्हटले असणार!


आमचं एकत्र कुटुंब! दारव्ह्याला मोठा वाडा आणि शेती! घरात आम्ही सर्व मिळून सात भावंडं. त्यामुळे करमत नाही असं कधी झालंच नाही. समोरच्या प्रशस्त अंगणात लपाछपी, शिवाशिवी, क्रिकेट, खोखो असा जुन्या नव्या खेळांचा संगम दिसायचा. माझे आजोबा पट्टीचे पोहणारे तसेच खोखो उत्तम खेळत. त्यांच्या देखरेखीखाली आम्ही सर्व खोखो खेळण्यात तरबेज झालो.


आजच्या कॉन्व्हेंट संस्कृतीत हद्दपार झालेला खेळ म्हणजे खेळभांडी. त्या खेळाला नाकं मुरडणाऱ्यांनी एकदा तो खेळून तर पाहा मग बोला म्हणावं. ते काही असो, मला आणि माझ्या चुलत बहिणींना खेळभांडी खेळायला खूप आवडायचे. आई आणि काकू दुपारी बाहेर जाणार असल्या की आमचा हा खेळ रंगायचा. 


पोहे, मुरमुरे, फुटाणे, दाणे, खोबरं, गूळ, बिस्किटे, गोळ्या इत्यादीनी खेळभांडी गच्च भरून जायची. टेबलाचं पार्टिशन करून आम्ही आमचं घरकुल, चिमुकला संसार थाटत असू. एकमेकींना चहाला, फराळाला, जेवायला बोलविणे हा त्या खेळातील अनिवार्य कार्यक्रम असायचा. मुरमुऱ्याचा भात, डाळ्यांचं वरण, खाऱ्या बिस्किटांचे धपाटे असा झकास बेत असायचा. फुटाण्याचे, दाण्याचे दोन भाग गुळाने चिकटवले की 'इन्स्टंट' लाडू तयार!


पाक सिद्धी होता होता भूकही शिजायची. त्या स्वहस्ते बनविलेल्या लुटुपुटीच्या जेवणाची लज्जत काही औरच असायची. शेवटी तेल, तीखट, मीठ, कांदा घालून कच्चा चिवडा व्हायचा. चट्टामट्टा झाल्यावर खेळाची समाप्ती व्हायची.


आई, काकू यांनी ही मुलगी, ही पुतणी' असा दुजाभाव कधी केला नाही. आम्हा बहीणभावंडातही सख्खे, चुलत असा भेदभाव नव्हता. सर्वांचं एकमेकांवर अतूट प्रेम! एकाला शिक्षा झाली, बत्ती मिळाली की सर्व भावंडं मुसमुसायला लागायची. मग शिक्षा करणाऱ्याला अकारणच अपराध्यासारखं वाटायचं. 


अशा वेळी आई तर जाम वैतागायची, म्हणायची “सगळे डोक्यावर बसले आहेत. एकालाही रागवायची सोय उरली नाही. तुमच्यासारखी बहीणभावंडं पाहिली नाही कुठं!" आईचं म्हणणं खरंच आहे, विश्वास ठेवा, अगर ठेवू नका. आमच्यासारखी एकमेकांवर निस्सीम प्रेम करणारी भावंडं आज दुर्मिळच झाली आहेत. 


आमचे आजोबा आमचं दैवतच! ते जितके कडक तितकेच प्रेमळ. नातवंडांशी कंचे, पत्ते, कॅरम खेळताना ते लहानात लहान होऊन जात. त्यांना सांगू नका, फक्त तुम्हाला म्हणून सांगते. ते कधी कधी चिडीचा डाव खेळत. कॅरममध्ये झालेली हार मात्र ते आनंदाने पत्करीत. 


माझ्या पाठीवर थाप मारून मला 'चैंपियनशिप' प्रदान करीत. याचं नेमकं कारण मलाही अद्याप कळलं नाही. पण मी सर्वात लहान, सर्वात जास्त लाडकी म्हणून असेल कदाचित. रविवार एका दृष्टीने हवाहवासा वाटायचा. त्या दिवशी दुपारी स्पेशल फर्माईश केलेली 'डिश' असायची. 


त्यावर मनसोक्त ताव मारणे एवढेच आमचे काम. रोज शाळेत भाजी पोळीचा डबा न्यावा लागे त्यामुळे हा 'चेंज मस्त वाटायचा.'  एका गोष्टीसाठी मात्र रविवार नकोसा वाटे. एका दिव्याला आम्हाला सामोरं जावं लागायचं. बाबा, काका आमच्या गृहपाठाच्या वह्या पाहायचे. 


वह्या पूर्ण नसल्या तर 'शाळेत भेटायला येतो' अशी तंबी मिळायची. ती वेळ येऊ नये याची शक्यतो आम्ही काळजी घेत असू. आज दुर्मिळ झालेलं (कालबाह्य ठरलेलं) दृश्य आमच्या घरी रोज पाहायला मिळायचं. संध्याकाळी देवाजवळ दिवा लागला की आजी आमच्याकडून


शभंकरोति, रामरक्षा म्हणवून घेई. घरी येणाऱ्या सर्वांना याचे फार अप्रूप वाटायचे. आमच्या घरी एक कुत्रा होता. सर्वांचा 'जिगरी दोस्त' त्याचं नाव हिरा. त्याची एक वाईट खोड होती. तूप माखल्याशिवाय पोळी खायचा नाही. आम्ही त्याची गंमत करायची ठरविलं. त्याच्या नाकाला तूप लावले नि समोर पोळी ठेवली. एक दिवस तो फसला पण दुसऱ्या दिवशी त्याने तूप चाटून टाकले. बिनातुपाच्या पोळीला मात्र तोंडही लावले नाही.


माझा चुलत भाऊ 'बंड्या' नावाप्रमाणेच बंड. एकदा त्याने एक मुंगळा मारला. जवळच बसलेला दादा घाबयघाबऱ्या म्हणाला, “अरे बंड्या, काय केलंस तू हे? एखाद्या मुंगळ्याने जर हे पाहिलं असेल तर तो सगळ्या मुंगळ्यांना सांगून टाकेल आणि मग रात्री तुझ्या अंथरुणात मुंगळेच मुंगळे! बिचारा बंड्या घाबरुन म्हणाला. 


“मग आता रे काय करायचं?" दादाला एक धम्माल कल्पना सुचली “दिवसभर जेवढे मुंगळे दिसतील तेवढ्या सगळ्यांना वाकून नमस्कार करायचा" झाले. बंड्या आख्खा दिवस 'देखल्या मुंगळ्या दंडवत' घालीत सुटला. त्यामुळे दिवसभर खूपच करमणूक झाली.


मी तेव्हा पहिल्या वर्गात शिकत होते. मला आणि सुरेखाताईला शाळेच्या फाटकाजवळ दहा रुपयाची नोट सापडली. शाळेजवळच एकजण दाण्याची चिक्की विकायला बसायचा. रोज मोह व्हायचा पण पैसे नसायचे. आज खिसा गरम होता. मनाचा हिय्या करून आम्ही चिक्की घेतली. जाताजाताच गट्ट केली. 'मुली आज रोजच्यासारखं जेवत नाही' हे आईच्या चाणाक्ष नजरेतून सुटलं नाही. 


तिने खोदून खोदून विचारल्यावर आमचं बिंग फुटलं. त्या दिवशी शिक्षेतून सूट मिळाली. पण 'पुन्हा असं करणार नाही' असा कबुलीजबाब द्यावा लागला. एक दिवस छोटूने तर गंमतच केली. शेजारच्या ‘सोनी'ला शाळेचं नाव विचारलं. तिने तिच्या शाळेचं नाव सांगितल्यावर हा म्हणतो कसा! 'अग, शाळेचं पूर्ण नाव सांगायचं असतं. 


शाळेचं आडनाव काय तुझ्या?' त्याच्या या प्रश्नावर आम्ही खोखो हसत सुटलो. 'शाळेला नाव असतं म्हणजे आडनाव असायलाच हवं' ही त्याची भाबडी समजूत! आम्ही सर्व भावंडे आता मोठी झालो. थोडक्यात सांगायचं म्हणजे बालपण सरलंय. शिक्षणाच्या निमित्ताने हा इथे तर तो तिथे अशी फारकत झाली. 


बाबांचीही दारव्ह्याहून बदली झाली. 'गेले ते दिन गेले' असं असलं तरी त्या दिवसांच्या आठवणी कायम ताज्याच राहतील. बालपणच्या गमतीजमती सांगता सरणार नाही लांबतच राहतील. महाबली हनुमंताच्या शेपटी सारख्या! मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद