मी घड्याळ बोलतोय मराठी निबंध | Me Ghdyala Boltoy Essay Marathi

  मी घड्याळ बोलतोय मराठी निबंध | Me Ghdyala Boltoy Essay Marathi


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  मी घड्याळ बोलतोय मराठी निबंध बघणार आहोत. ठण ---- ठण ---- ठण ---- ठण. मी घड्याळजी. एरवी 'टिकटिक' आणि ठणठण' या पलीकडे काहीही न बोलणारा! आज मात्र खूप खूप बोलणार आहे. तेही शुद्ध मराठीत. 


अरे, पाहताय काय असे माझ्याकडे? जन्माला आल्यापासून साऱ्याचं बोलणं सतत ऐकतोय. (भिंतीला कान असतात मग घड्याळाला का असणार नाही?) आज विचार केला आपणही बोलावं. नेहमीच वक्त्याची खुर्ची भूषविणाऱ्याला केव्हातरी श्रोत्याची भूमिका करावीशी वाटते ना! त्यातलाच हा प्रकार!


सर्वप्रथम माझ्या जन्मदात्यांना खूप खूप धन्यवाद द्यायचे आहेत. त्यांच्या अथक परिश्रमांमुळे मला हे जग पहायला मिळालं. शास्त्रज्ञांच्या कृपेने आज मला आकर्षण रूप प्राप्त झालंय. त्यावर विविधतेचा साजही चढलाय. लंबकाचा शोध लागला आणि मला चैतन्याचा स्पर्श लाभला. तासकाटा, मिनिटकाटा यांनी तर माझ्या जीवनात बहार आणली. मला अचूक वेळ सांगता येऊ लागली तेव्हा कोण आनंद झाला म्हणून सांगू!


माझ्या वाट्याला जे भाग्य आलं ते पूर्वजांना लाभलं नव्हतं. तरी मला त्यांचा खूप खूप अभिमान आहे बरं का! घटिकापात्र, वालुकायंत्र, मेणबत्तीचे यंत्र, शंकुयंत्र, पाणघड्याळ, वजनाचं घड्याळ हे माझे पूर्वज परावलंबी होते. त्यांचा आकारही ओबडधोबड असायचा. तसेच ते ढोबळमानाने वेळ दर्शवू शकत. त्यांची किंमत मात्र खूप जास्त असे. एकोणिसाव्या शतकाच्या आरंभापर्यंत घड्याळं खूप महाग होती. 


हिऱ्याइतकी किंमत मोजावी लागे. अर्थात प्रत्येकाला घड्याळ बाळगणं शक्यच नव्हतं. युरोप, इंग्लंडमध्ये टॉवरवरील घड्याळावरुन वेळ पाहत. आज सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल अशा किंमतीत घड्याळं मिळताहेत. याचं श्रेय अमेरिकेला द्यावं लागेल. आता तर घड्याळ नाही असं घर बहुधा शोधूनही सापडणार नाही. 


आता थोडं माझ्या रचनेविषयी. माझा सारा खेळ एकमेकात अडकून फिरणाऱ्या चाकांवर अवलंबून आहे. दाते पाडलेली चाके नसती तर मला आजचं स्वरूप मिळालं नसतं. मला तीन हात आहेत आणि ऐकून गंमत वाटेल, ते माझे हातच पायाचं कामही करतात. अंगुलिनिर्देश करण्याचं (हाताचं) काम आणि सतत चालत राहणं हे पायांचं काम ते करतात. (आहे ना 'टू इन वन'!) 


तासकाटा, मिनिटकाटा व सेकंदकाटा हेच ते त्रिकुट! तुमचे दोन्ही पाय एकाच गतीने चालतात किंवा धावतात. पण माझ्या पायांचं कामच काही और! सेकंदकाटा वाघ मागे लागल्यासारखा धावतो. मिनिटकाटा रमतगमत फिरायला निघाल्यासारखा चालतो तर तासकाटा मुंगीच्या पावलाने पुढे सरकतो. या गतीचे प्रमाण ठरविण्याचे, तीवर ताबा ठेवण्याचे काम सटकचाकाकडे सोपविलेले असते.


तुमच्या सामान्य ज्ञानात थोडी भर घालतो. लंडनला 'बिगबेन' हे मोठे घड्याळ १८५८ साली सुरू झाले म्हणे! ('सुपरमॅन' प्रमाणे 'सुपरक्लॉक' म्हणावं का त्याला?) जमिनीपासून ते १८० फुटांवर आहे. त्याच्या तबकडीचा व्यास तेवीस फूट आहे आणि मिनिटकाट्याची लांबी किती विचाराल तर चौदा फूट लांब. लंडनला जाऊन ते पाहायची उत्सुकता वाटतेय ना? अगदी माझ्या मनातलं बोललात!


आम्हा घड्याळांचं निवासस्थान ठरलेलं नाही. कोणी दिवाणखान्याच्या भिंतीची शोभा वाढवितात तर कोणी एखाद्या शोभिवंत टेबलाची. एखाद्याच्या नशिबी कोनाडा असतो तर एखाद्याला 'शोकेस'मध्ये स्थान मिळतं. काहींच्या वाट्याला खिशातलं बंदिस्त जीवन येतं तर कोणावर गळ्यात लटकण्याचा प्रसंग येतो. मनगटी घड्याळ मात्र ऐटीत मालक किंवा मालकिणीच्या मनगटावर जाऊन बसतात. 


लग्नकार्यादी समारंभात तोरा मिरविताना दिसतात. काटेकोरपणे वागणं हा माझा धर्म! (कारण मी बोलून चालून एक यंत्रच ना!) वक्तशीर माणसं मला नक्कीच आवडतात परंतु टोकाचा वक्तशीरपणा मला फारसा पसंत नाही. गंमत म्हणून सांगतो मी एक शिक्षक पाहिले आहेत.


टोला झाल्याबरोबर ते वर्गात शिरतात आणि दुसरा टोला पडता क्षणीच शिकवीत असलेला पाठच काय बोलत असलेलं वाक्यही अर्ध्यावर सोडून विद्युतवेगाने वर्गाबाहेर पडतात. सर्वजण त्यांची टर उडवितात पण हा माणूस 'क्षणमात्र' बदलायला तयार नाही. अरे, तुमच्यावरून घड्याळं लावून घ्यायला तुम्ही काय यंत्र आहात? आम्हा घड्याळांना आमचं काम करू द्या की!


वक्तशीरपणाचा आणखी एक मासला! एका महाशयांच्या आईला दवाखाण्यात भरती करायची वेळ आली. परंतु 'माझी फिरायला जायची वेळ झाली' असं म्हणून ते खुशाल फिरायला चालले गेले. शेवटी वेळ न पाळणारे शेजारी वेळेला धावून आले नि त्यांनी शेजारधर्म पाळला म्हणून त्या माउलीचे प्राण वाचले. तुम्हीच सांगा, याला वक्तशीरपणा म्हणायचं? असे महाभाग (की हतभागी?) 


गाण्याच्या किंवा गप्पांच्या रंगलेल्या मैफिलीचा किंवा कोजागिरीच्या जागरणाचा आनंद कदापिही लुटू शकत नाहीत. आता दुसरं टोक! 'दहा मिनिटात पोचतो' असं सांगून 'इंडियन टाईम'च्या नावाखाली दोन-दोन तास दुसऱ्यांना ताटकळत ठेवणारे लोक! असे 'वेळचुकार' लोकही तापदायकच!


त्यांच्या हाताला घड्याळ असतं पण ते शोभेसाठी. त्यांच्या कानीकपाळी आम्ही खूप ओरडतो पण ते कानावर (मनावरही) घेत नाहीत. काय करावं अशा लोकांना! _ मी आहे काळाचं प्रतीक! कोणासाठीच थांबत नाही (मग तो जगज्जेता का असेना!) किंवा कोणाच्या सोयीसाठी मागे पुढेही जात नाही. माझी प्रकृती बिघडली की मात्र मला मरणप्राय यातना होतात. 


एरवी मी तुमच्या सेवेला अष्टौप्रहर सज्ज असतो. गर्जना (गजर हो!) करून परीक्षार्थीना जाग करण्यात मला धन्यता वाटते. मुंबईकरांची लोकल नि प्रवासी जनांची गाडी चुकू नये म्हणून माझी धडपड असते. तमाम कर्मचाऱ्यांच्या मागे कामावर वेळेवर पोहोचण्यासाठी लकडा लावणारा मीच एकमेवाद्वितीय! विवाही समारंभात माझी महत्त्वाची भूमिका असते. 'तदेव लग्नं....' सुरू होईपर्यंत सर्वांच्या नजरा माझ्यावर खिळलेल्या असतात.


मानवांनो, तुमच्या या सच्च्या सेवकाचं फक्त एकच कळकळीचं सांगणं आहे. कृपया स्वतःला 'घड्याळ्याचे गुलाम' म्हणवून घेऊ नका. वेळेचं नियोजन करा. वक्तशीर राहा. 'एकही क्षण रिकामा जाऊ देणार नाही' असा निश्चय करा नि काळाचे स्वामी बना. समर्थांच्या शब्दात थोडा बदल करून मी म्हणेन,


“घटका गेली, पळे गेली, तास वाजे घणाणार आयुष्याचा नाश होतो, काम का रे करा ना!" अरेच्चा! साडेचार केव्हा वाजले कळलंही नाही. भेटू असंच कधीतरी! टण   मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद