मी वृक्ष बोलतोय मराठी निबंध mi vruksha boltoy essay in marathi

 मी वृक्ष बोलतोय मराठी निबंध mi vruksha boltoy essay in marathi


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  मी वृक्ष बोलतोय  मराठी निबंध बघणार आहोत.  ओळखलंत मला? नाही म्हणता? मी तुमचा सोयरा! जिवाभावाचा दोस्त म्हणा हवं तर! तुम्ही ओळख विसरला तरी न रागावता एकतर्फी प्रेम करणारा! तुमच्याशी जोडलेलं नातं मी कधीच तोडणार नाही. माझं जीवनव्रत कदापिही सोडणार नाही.


तुम्ही माणसं मानवदेह सर्वात श्रेष्ठ समजता. मानवजन्मातच जन्माचं सार्थक मानता. कारण काय तर मोक्षप्राप्तीची सर्व साधनं मानवाला लाभलेली असतात म्हणे! पण मी म्हणतो, इथे मुक्ती हवी आहे कोणाला! 'न लगे मुक्ती धनसंपदा संतसंग देई सदा' असं कोण्या एका संताने म्हणून ठेवलंय ना! 


आत्मप्रौढी मिरवायची म्हणून सांगत नाही. अगदी शंभर टक्के खरं तेच सांगतोय. माणसापेक्षाही आमचं जीवन जास्त मोलाचं आहे. कारण एकच. आम्ही एक क्षणही स्वतःच्या सुखासाठी जगत नाही. जन्मल्याबरोबर देवांनी आम्हाला पहिल्यांदा काही सांगितलं असेल तर ते म्हणजे, 'परोपकारार्थमिदं शरीरम्' (हे शरीर परोपकारासाठी आहे.) 


हा मंत्र ऐकून इतका विलक्षण आनंद झाला म्हणन सांग! वाटलं 'या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे.' जन्मोजन्मी हाच जन्म लाभावा. आमच्या देहाचा कणनकण, आयुष्याचा क्षणन्क्षण दुसऱ्यांसाठी खर्च होतो. ऐकायचीय आमच्या व्रतस्थ, विरागी जीवनाची नवलकहाणी?


जन्मल्यावर तुम्ही जसं कुकुल्लं बाळ असता, आईच्या कुशीत पहुडता, तसाच मी पण होतो, चिमुरडा. या पृथ्वीच्या पोटात दडून बसलो होतो. एक दिवस मनातलं कुतूहल जागं झालं. धाडस करून मी हळूच बाहेर डोकावलो. किलकिल्या डोळ्यांनी सभोवताली दृष्टी टाकली. आणि माझे डोळेच दिपले. सष्टीचं मोहक रूप पाहून मी हरखून गेलो. त्या दिवशी पहिल्यांदा मोकळ्या हवेत श्वास घेतला.


एकदम ताजंतवानं वाटलं. सूर्यकिरणांच्या ऊबदार स्पर्शाने सुखावलो. कोणीतरी माझ्या इवल्याशा मुखात थेंबभर पाणी घातलं. माझ्या तहानभुकेची काळजी घेणारा माळीदादा मला देवासमान भासला. डोळ्यात तेल घालून तो माझी निगा राखू लागला. दिसामासाने मी वाढत होतो. आता मी एक छोटंसं रोप होतो. 


मला इवली इवली कोवळी पालवी फुटली होती. सृष्टिमातेने घातलेलं मुलायम अंगडं टोपडंच जणू. माझं ते रूप पाहून जाम खूष झालो बघा. हळूहळू मी वाऱ्याबरोबर डोलायला शिकलो, नाचायला शिकलो. फुलपाखरांना पाहून टाळ्या पिटू लागलो. माझ्या बाललीला माझी मोठी भावंडं कौतुकानं पाहत असत. ताई, दादांच्या सारखं मोठं होण्याची खूप घाई झाली होती. पण प्रतीक्षा करण्यावाचून पर्याय नव्हता.


निसर्गचक्रानुसार माझी वाढ झाली. उंची, जाडी, वयही वाढलं. दसरा, दिवाळी, पाडवा, मंगळागौर, सत्यनारायण, लग्न, व्रतबंध इत्यादी शुभकार्यात माझ्या पानांचं मंगल तोरण शोभू लागलं. एकदा वसंतऋतूचं आगमन झालं. माझ्या जीवनातही वसंत फुलला. मला सुंदरसा, सुगंधी मोहर आला. कोकिळपक्ष्यांचं कूजन अधिकच मधुर वाटू लागलं.


कालांतराने फुलाच्या पाकळ्या गळून पडल्या, असंख्य हिरव्या बाळकैयांनी माझा देह लगडून गेला, माझ्या बाळांकडे पाहून अंतःकरणात पित्याचं वात्सल्य दाटून आलं. समस्त हिरव्या सृष्टीला मी त्यांची अभिमानाने ओळख करून देऊ लागलो. 'ही माझी गोंडस बाळं' मनाला वेड लावणाऱ्या बालगोपालांची मला खूप काळजी वाटत होती.


मी मनोमन देवाची प्रार्थना केली. “वादळ, वारा, गारपीट, अतिवृष्टी या नैसर्गिक आपत्तींपासून माझ्या पिलांचं रक्षण कर" माझी प्रार्थना सफल झाली. बाळकैया चांगल्याच बाळसल्या. दळदार झाल्या. घरोघरी लोणचं, मेथांबा यांचा घमघमाट दरवळला. पन्हं, गुळांबा, साखरांबा जिभेला सुखावू लागले.


काही दिवसांनी फळं पिकली. मी फळांचा राजा. माझ्या फळांची अवीट गोडी तुमच्याहून दुसरं कोण सांगणार! आज वर्षानुवर्षे मी तुम्हाला रसाळ, मधुर फळं चाखायला देत आहे. मग सांगा याहून धन्यतेचं जीवन तुम्ही पाहिलंय? तुमच्या वाट्याला ते आलंय?


आमचं महत्त्व आम्ही सांगावं असं नाही. ऋषिमुनींनी ते जाणलं आणि अभिप्राय दिला, 'वृक्षाः सत्पुरुषाः खलु ।' तुकोबांनी आमच्याशी जिव्हाळ्याचं नातं जोडलं आणि सांगितलं 'वृक्षवल्ली आम्हा सोयरी ।' सुभाषितकारांनी वृक्षांना चक्क सूर्य, चंद्र, घन, नद्या, गायी व सज्जनांच्या पंक्तीत नेऊन बसविले. बिश्नोई स्त्रियांनी आमच्या संरक्षणासाठी 'चिपको आंदोलन छेडलं ते उगाच नाही. त्याच्यामागे सबळ कारण होतं.


वृक्षांच्या मुळापासून फळापर्यंत प्रत्येक अवयवाचा (पानं, फुलं, खोड, साली इत्यादीचा) काही ना काही उपयोग होतो. निसर्गाचं संतुलन टिकवून ठेवण्याचं काम आम्ही युगानुयुगे करीत आहोत. जमिनीची धूप होऊ नये म्हणून आम्ही तिची काळजी घेतो. थकल्याभागल्या पांथस्थावर मायेचं छत्र धरतो. भुजंग, वानर, पक्षी, भंग यांचं आश्रयस्थान आम्हीच. 'नास्ति मूलम् अनौषधम् ।' (एकही वनस्पती अशी नाही की जिच्यात औषधी गुण नाही.) शास्त्रज्ञांच्या


प्रयत्नांनी काही वर्षातच अँटेना म्हणून काम करण्यातही आम्ही यशस्वी होऊ असं वाटतंय. मनातलं एक शल्य बोलून दाखविल्याशिवाय माझी कहाणी पूर्ण होणार नाही. माझं मनही हलकं होणार नाही. एकीकडे तुम्ही भावभक्तीने आमची पूजा करता आणि दुसरीकडे आमच्यावर कु-हाडीचे घावही घालता. तेव्हा शरीरापेक्षा मनाला अधिक वेदना होतात. तुमचा कृतघ्नपणा, अज्ञान, स्वार्थीपणा पाहून मन व्याकुळ होतं. वाटतं, हा माणूस आहे की हैवान! स्वतःला बुद्धिमान समजणाऱ्या हे मानवा, जाताजाता एकच मागणं मागतो.


वृक्षांची तोड करू नका. 'गोतास काळ होणारी कुन्हाड' आमच्या अंगावर चालवू नका. आमच्या अस्तित्वावर, सुखावर तुमचं अस्तित्व, सुख अवलंबून आहे, याचं भान ठेवा आणि एकदिलाने, एकमुखाने म्हणा, “वृक्षांचे संगोपन करूनि, वृक्षमित्र होणार आम्ही वृक्षमित्र होणार ।" मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद