पंडित जवाहरलाल नेहरू मराठी निबंध | Pandit Jawaharlal Nehru Marathi

पंडित जवाहरलाल नेहरू मराठी निबंध | Pandit Jawaharlal Nehru Marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  पंडित जवाहरलाल नेहरू मराठी निबंध बघणार आहोत.    'या माणसाने मानवी स्वभावातील दोन वैगुण्यांवर मात केली आहे. त्याला ना भय ना द्वेष' ! भारत स्वतंत्र झाल्यानंतर राष्ट्रकुलातून बाहेर न पडण्याचा निर्णय जेव्हा पंडित नेहरूंनी जाहीर केला, तेव्हा वरील उद्गार ब्रिटनचे युद्धकालीन पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी काढले. पंडितजींच्या असामान्य राजकीय कर्तृत्वाचे व अलौकिक नेतृत्वाचे रहस्यच चर्चिलच्या या अभिप्रायात प्रगट झाले आहे, असे मला वाटते.


अलाहाबाद येथे १४ नाव्हेंबर १८८९ मध्ये जन्मलेल्या जवाहरलालना बालपणापासूनच भय व द्वेष हे शब्द माहीत नव्हते. त्यांचे वडील मोतीलाल नेहरू हे त्या काळातले गाजलेले यशस्वी वकील होते. लक्ष्मी त्यांच्या पायावर लोळण घेत होती. 


त्यामुळे जवाहरलालचे बालपण व शिक्षण एखाद्या सम्राटाच्या राजपुत्राप्रमाणे गेले. वयाची १६ वर्षे पूर्ण होईपर्यंत नेहरूंचे शिक्षण 'नेहरू' विद्यापीठात म्हणजे घरच्या घरीच झाले. वयाच्या १६ व्या वर्षी ते हँरो येथील विद्यालयात दाखल झाले. 


पुढे केंब्रिजच्या ट्रिनिटी कॉलेजमधून ते पदवी परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांचे विषय होते रसायनशास्त्र, भूशास्त्र, वनस्पतिशास्त्र. पण त्याच बरोबर त्यांनी इतिहास, अर्थशास्त्र, साहित्य, नाटक, राजकारण यांचाही व्यासंग केला. पुढे १९१२ मध्ये बॅरिस्टर होऊन वकिली करण्यासाठी ते भारतात परतले पण १९१६ मध्ये गांधीजींच्या सहवासात आल्यावर त्यांच्या जीवनात वेगळेच पर्व सुरू झाले. 


त्याच वर्षी त्यांचा कमला कौलबरोबर विवाह झाला. १९१७ साली 'इंदिरा' चा जन्म झाला...आणि चार वर्षात त्यांच्या राजबदिवासाच्या वाऱ्या सुरू झाल्या. १९३५ च्या आपल्या आत्मवत्तात पं. नेहरू म्हणतात, "वैवाहिक जीवनाची ती अठरा वर्षे ...त्यातली किती वर्षे मी तुरुंगात काढली, आणि कितीतरी वर्ष कमलेने रुग्णालयात काढली."


"पण कारावास हेच त्या वेळच्या स्वातंत्र्ययोद्धयांचे विश्रामधाम होते व पंडित नेहरू हे स्वातंत्र्ययुद्धाचे सेनापती होते. १९२९ साली ते लाहोर काँग्रेसचे पहिले अध्यक्ष झाले, व 'त्यानंतर १९५४ पर्यंत सात वेळा अध्यक्ष झाले. १९२१ ते १९४२ या काळात त्यांनी नऊ वेळा कारावास भोगला. इ.स. १९३१ मध्ये त्यांची प्रिय पत्नी त्यांना सोडून गेली. 'इंदिरा' खेरीज त्यांना कोणी राहिलेच नाही. पण व्यक्तिगत सुख-दुःखांचा हिशेब करायला त्यांना वेळ कुठे होता?


१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून २७ मे १९६४ पर्यंत ते भारताचे पंतप्रधान होते. लोककल्याण व राष्ट्रीय विकास या दोन भिंगांतून ते जनतेकडे पाहत होते. शेती, प्रचंड अवजड उद्योगधंदे, संरक्षण साहित्य उत्पादन, अणुऊर्जा, विद्युत निर्मिती, या सर्व बाबतीत भारत स्वयंपूर्ण व्हावा अशा दृष्टीने त्यांनी सर्व योजना आखल्या. 


आंतरराष्ट्रीय राजकारणात अलिप्तता, अंतर्गत राज्यकारभारात सर्वधर्मसमभाव व दोन्हीही क्षेत्रांत शांतता ही त्यांची राजनीती होती. विज्ञाननिष्ठ पायावर भारतीय विकासाची उभारणी करून समाजवादी समाजरचना प्रस्थापित करावी असे स्वप्न ते पाहत होते. 


आशियाई राष्ट्रांबरोबर रशियाशी त्यांनी मित्रत्वाचे संबंध प्रस्थापित केले. चीनसकट सर्व आशियाई राष्ट्रांची शांतता परिषद भरवून तेथे त्यांनी पंचशीलचा संदेश त्या राष्ट्रांना दिला. 'इंदिरेस पत्रे,' 'भारताचा शोध', 'जाग तक इतिहासाचे ओझरते दर्शन,' आणि 'आत्मवृत्त' या त्यांच्या ग्रंथात अभिजात साहित्य दृष्टीप्रमाणे त्यांची शांतताप्रिय उदार मानवतावादी दृष्टीदेखील दिसून येते.


१९६२ मध्ये चीनने भारतावर आक्रमण केले व नेहरूंचे स्वप्न भंगले. चीनने नेहरूंच्या पाठीत खंजीर खुपसला. त्यानंतर मात्र नेहरूंनी अंग टाकले, रोज सोळा ते अठरा तास काम करणाऱ्या चिरतरुण जवाहरलालांची जीवनज्योत २७ मे १९६४ रोजी अनंतात विलीन झाली व सर्व जग शोकसागरात बुडाले. या भारत भाग्यविधात्याला माझे शतशः प्रणाम.  मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद