पतंग निबंध मराठी | Patang Nibandh in Marathi

 पतंग निबंध मराठी | Patang Nibandh in Marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  पतंग मराठी निबंध बघणार आहोत.  १४ जानेवारी मकरसंक्रांतीच्या दिवशी सकाळची गोष्ट. राजू सकाळी लवकर उठून आंघोळ करून गच्चीवर जायला तैयार' झाला. मांजाचे भलेमोठे रीळ घेऊन तो कोपऱ्यात वळला आणि तिथले सात आठ पतंग त्याने उचलले. शेवटी एक पतंग खाली राहिला होता, फाटका ! राजूने तिकडे पाहिले. त्या पतंगाच्या डोळ्यांच्या जागेवर त्याला दोन थेंब दिसले, नंतर हुंदक्यांचा आवाज आला.


पतंग रडत होता. कण्हत होता. 'राजू'...पतंगाची आर्त हाक राजूच्या हृदयाला भिडली. पतंग बोलू लागला. 'राजू ! माझी एक विनंती ऐक, काही कर पण मला बरे कर. माझ्या फाटक्या शरीराला दुसऱ्या शरीराची जोड दे. कसंही करून मला आकाशात पाठव ना रे !' थांब ! 


माझे पुरते ऐकून घे. मला आज बोलू दे. हृदय तुझ्याजवळ उघडे करू दे. क्षत्रियाचा देह ज्याप्रमाणे रणांगणात पडण्यासाठीच असतो, तसा आम्हा पतंगांचा जन्मसुद्धा नभांगणात झुंज देऊन समर्पण करण्याकरिताच असतो. आमचं शरीरच पहा ना ! 


त्याला विमानासारखी पंखाकृती आहे. आमचा आकार एखाद्या चौरसासारखा पण आमची हाडे मात्र धनुष्यबाणासारखी. आमची त्वचा कागदाची खरी, पण वेगळ्या जातीची. लिहायचा कागद निराळा आणि आमचा निराळा.


"आकाशात झेप घेणे, उंच उंच भराऱ्या मारणे हे पक्ष्यांप्रमाणे आम्हांला फार आवडते, नव्हे आमचा जन्मच त्यासाठी असतो. दिव्याभोवती फिरणाऱ्या छोट्या पाखरांचे जीवन...मरण पाहिले आहेस ना तू ! ती कशी दिव्यावर झेपावून जळून मरतात, आत्माहुती देतात. 


यांनासुद्धा 'पतंग'च म्हणतात. होनाजी बाळाची लावणी आठव जगी सांगतात प्रीत पतंगाची खरी झडप घालून देतो प्राण दीपकाचे वरी आम्हीही पतंगच. आम्ही तशीच कुरबानी करतो. आजचा मकरसंक्रांतीचा दिवस हाच खरा आमच्या लढतीचा दिवस. 


आजच्या दिवशी मुंबई-पुण्यासारख्या शहरात आमचा मोठा उत्सव असतो. आमच्या जिवावर दुकानदार शेकडो रुपये कमावतात. सारे आकाश आम्हा पतंगाच्या गरूडझेपेने फुलून येते. पोरांपासून थोरांपर्यंत आम्ही सर्वांचे लाडके आहोत. बायांनी आमच्यावर बहिष्कार का टाकलाय, कळत नाही.


"आमचे मूळ घराणे चीनचे असे ऐकतो. चिनी लोकांप्रमाणे गुजराती बांधवांनीही आम्हांला मोठा मान दिलाय, अहमदाबाद, बडोदे वगैरे ठिकाणी संक्रांतीच्या दिवशी जो जुलूस भरतो त्याला साऱ्या भारतात दुसरी तोड नाही.


"जास्त बोलत नाही. अशा अपंग, असहाय्य अवस्थेत जगणे हे मरणापेक्षा अधिक यातनामय वाटते. म्हणून म्हणतो राजू, माझी यातून मुक्तता कर, मला वीरमरण दे." मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद