प्रदूषण एक समस्या मराठी निबंध | pradushan ek samasya Nibandh marathi

 प्रदूषण एक समस्या मराठी निबंध | pradushan ek samasya Nibandh marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण प्रदूषण एक समस्या मराठी निबंध बघणार आहोत. भोपाळच्या 'युनियन कार्बाइड' संबंधीचा निकाल कोर्टाने दिला त्यावेळी नुकसानभरपाईची जी रक्कम जाहीर केली ती ऐकून साऱ्या देशात संतापाचे प्रचंड वादळ निर्माण झाले. 


भोपाळच्या विषारी वायू-दुर्घटनेमुळे दोन हजारांहून अधिक लोक प्राणांस मुकले. हजारो लोक अपंग, असहाय झाले आणि त्यावर कोर्टाने जाहीर केलेली नुकसानभरपाईची रक्कम निव्वळ नगण्य होती. वायुपीडितांची ती क्रूर चेष्टाच ठरत होती. तथापि जनतेतील असंतोषाच्या वादळामुळे या निर्णयाचा फेरविचार करण्यात येत आहे.


मागे काही वर्षांपूर्वी रशियामधून प्रचंड प्रमाणावर आयात झालेले लोणी अणु-उत्सर्ग दूषित असल्याची तक्रार वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाली. हे लोणी बाजारात विकल्यास ग्राहकांना लोण्याच्या भक्षणाने अनेकविध अणुउत्सर्गजन्य ज्ञात-अज्ञात रोगांस बळी पडावे लागले अशी भीती व्यक्त करण्यात येत होती. 


प्रसिद्ध व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांनी त्यावर व्यंगचित्र काढून कोण म्हणतो आता भारताकडे युरेनियम नाही ? हे पहा ! असे म्हणून लोण्याच्या साठ्यांकडे अंगुलीनिर्देश केला होता. अशाच कारणांसाठी एक मोर्चा खोपोली-रसायनीजवळील पाताळगंगा परिसरातील विविध उद्योगसमूहांवर काढण्यात आला होता. 


तेथील परिसरात असणाऱ्या असंख्य रासायनिक कारखान्यांतून दूषित पाणी व इतर घटक पाताळगंगेच्या जलप्रवाहात सोडण्यात येतात, त्यामळे - तेथील पाणी फार प्रदूषित होते. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळातर्फे (MIDC) तर्फे तेच पाणी रसायनी व पनवेलजवळच्या परिसरातीण शेकडो गावांना पिण्यासाठी पुरविण्यात येते. 


तेव्हा त्या दूषित पाण्यापासून लक्षावधी लोकांच्या आरोग्यास व स्वास्थ्यास धोका पोहोचतो. अशा स्वरूपाची तक्रार आपल्या निवेदनात निदर्शकांनी मांडली होती. अशीच तक्रार दाभोळच्या एन्रॉन प्रकल्पाबाबत आहे. (तो तूर्त रद्दली झाला आहे !)

भोपाळचे वायुप्रदूषण, रशियन लोण्याचे अन्न प्रदूषण व रसायनीजवळील जलप्रदूषण अशी तिन्ही प्रकारची प्रदूषणे वर आपण पाहिली. ही सारी प्रदूषणे समाजाचे आरोग्य व स्वास्थ्य याला अत्यंत हानिकारक आहेत. मग ती कमी का होत नाहीत ? त्यांची वाढ का होते ? त्यावर उपाय कोणता?


भारतात काय वा अन्यत्र काय असे प्रदूषण वाढण्याचे मुख्य कारण औद्योगिक कारखान्यांची बेसुमार वाढ आणि आरोग्यविषयक जबाबदारी व नैतिक मूल्ये धाब्यावर बसविण्याची त्यांची प्रवृत्ती. भारताचा औद्योगिक विकास व्हावा, उद्योग व्यवसाय क्षेत्रात भारत स्वावलंबी व्हावा म्हणून लघुउद्योग वा अवजड उद्योगसमूह यांच्या कारखानदारीला आपल्या सरकारने प्रोत्साहन दिले, 


पण त्याचा या उद्योग व्यवसायांतील चालकांनी व व्यवस्थापकांनी गैरफायदाच घेतला म्हणायचा ! कोणताही छोटा-मोठा कारखाना उभारला की तिथे थोडे फार प्रदूषण निर्माण होणारच पण असे प्रदूषण टाळावे कसे, त्यावर नियंत्रण कसे करावे, दूषित पाणी वा दूषित वायू कारखान्याबाहेर टाकण्यापूर्वी ते अपायकारक ठरणार नाहीत याची उपाययोजना कशी करावी याबद्दलचा पूर्ण विचार संबंधितांनी करायला हवा. 


कारखाना उभारणीस परवानगी मागताना सर्व चालक प्रदूषण टाळण्याची हमी देतात, क्वचित लेखी आश्वासन देतात, पण काही वर्षांनी तिकडे पार दुर्लक्ष करतात. त्यामुळे राष्ट्राची वित्तहानी व जीवित हानी होते, याची त्यांनी सतत दक्षता ठेवायला हवी.


केवळ कारखान्यांमुळेच प्रदूषण होते असे नाही. तळ्यातले मासे मारणे, नदीवर किंवा तळयात घाणेरडे कपडे धुणे किंवा तिथे रोगी लोकांनी अंघोळ करणे, वेगाने वाहणाऱ्या वाहनांनी दूषित धूर सोडणे यांनीही प्रदूषण होते. तसेच मोटारीचे कणे, आगगाडीच्या शिटया, विमानांची घरघर, गिरण्यांचे भोंगे, वगैरेंनी ध्वनिप्रदूषण होते व तेही अंतिमदृष्टया हानिकारक ठरते.


शेतीवाडी, माणसांची वस्ती, बागा वगैरेंच्या आसपास कारखानदारी नसावी किंवा जिथे आधीच बरेच कारखाने दाटीवाटीने उभे आहेत, तिथे नव्या कारखान्यांना परवानगी देऊ नये असे शासनाचे धोरण आहे पण तिथेही भ्रष्टाचार होतो. 


लाच घेतली जाते व 'गैरकृत्या'चा सरकारी गौरव होतो. अनधिकृत काम ‘अधिकृत' व योग्य म्हणून जाहीर होते-हेही एक प्रकारचे प्रदूषण नाही का? या देशाच्या समाज शरीराला आतून बाहेरून ग्रासणाऱ्या या प्रदूषणावर लवकर उपाय निघाला नाही तर ?. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद