श्रमेव जयते मराठी निबंध | Sharmev Jayte Marathi Nibandh

 श्रमेव जयते मराठी निबंध | Sharmev Jayte Marathi Nibandh 


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  श्रमेव जयते  मराठी निबंध बघणार आहोत. एक कष्टाळू नि धनसंपन्न शेतकरी होता. त्याची मुले मात्र अत्यंत आळशी, ऐतखाऊ नि मूर्ख होती. अंतकाळी शेतकऱ्याने मुलांसाठी संदेश लिहून ठेवला.


'छायायां खलु गन्तव्यमागन्तव्यं तथैव च। 

मिष्टान्नभोजनं कार्यं ततो लक्ष्मीमिलिष्यति।।


संदेश वाचल्यावर मुलांनी 'उन्हात जाणे वर्ण्य' समजून शेतात जाणे बंद केले. मिष्टान्नभोजन मात्र सुरू ठेवले. परिणामतः लक्ष्मी प्राप्त होणे तर दूरच तिने पाठ मात्र फिरवली. पुरोहिताने जेव्हा तो संदेश वाचला तेव्हा त्याने सांगितले, “सावली असताना म्हणजे सूर्योदयापूर्वी शेतात जावे आणि सूर्यास्तानंतर (ऊन उतरल्यावर) घरी परत यावे. 


इतके कष्ट केल्यावर साधे जेवणही मिष्टान्नाप्रमाणे लागेल आणि लक्ष्मीचा वरदहस्त लाभेल, असा या श्लोकाचा आशय आहे." उशिरा का होईना, मुलांना शहाणपण सुचलं. भरपूर कष्ट केल्यानंतर त्यांना त्यांचं गतवैभव परत मिळालं हे काय सांगायला हवं?


कवी ग. दि. माडगूळकर म्हणतात, "जिथे काम तेथे उभा श्याम आहे नव्हे धर्म रे धर्म हे रूप पाहे वसे तो सदा स्वेदगंगे किनारी जिथे राबती हात तेथे हरी।।" परमेश्वर राउळात, मंदिरात वास करतो यावर 'गदिमां'चा काडीमात्र ही विश्वास नाही. भूमिपुत्राने घाम गाळल्यावर प्रसन्नपणे डोलणाऱ्या शेतात त्यांना सावळ्या श्रीकृष्णाचे दर्शन होते.


कामगार राबराब राबतात तिथे तो 'श्रमांचा पुजारी' उभा ठाकतो. त्या विश्वकाला मुनी, ब्राह्मणांच्या मंत्रांपेक्षा 'श्वासाघणांचे गीत' प्रिय आहे, अशी त्यांची दृढ श्रद्धा आहे. अन्न ही शरीराची गरज तशी कष्ट ही सुद्धा शरीराची गरजच आहे. ऐषारामात राहणारी व्यक्ती मिष्टान्नांचा आस्वाद घेऊ शकत नाही. 


मऊ गाद्यागिरद्यांवरही तिला सुखाची झोप लागत नाही. याउलट कष्ट करणाऱ्यांना समोरची मीठ भाकरी सुद्धा अमृतासारखी मधुर लागते. धरतीच्या गादीवर, पाषाणाच्या उशीवर ते निद्रासुख अनुभवू शकतात. समाजाच्या हितासाठी अहर्निश झटणाऱ्या श्रमिकांबद्दलची कृतज्ञता व्यक्त करताना कवी विंदा करंदीकर म्हणतात,


“पवित्र मजला जळजळीत ती भूक श्रमातून पोसविणारी। 

पवित्र मजला दगडी निद्रा दगडांची दुलई करणारी।।"


जन्मभर नामाची महती गाणारे श्री. गोंदावलेकर महाराज कष्टाची महती ही सांगायचे. ते म्हणत, “माझ्या माणसाला मी खड्डे खणून बुजवायला लावीन पण कोणाला आळसाने स्वस्थ बसू देणार नाही." दुष्काळी परिस्थितीत ते दुष्काळी कामे सुरु करून सर्वांच्या हातांना काम देत मगच पोटाला भाकरी नि आमटी देत. 


'केल्याने होत आहे रे आधी केलेचि पाहिजे', 'रिकामा जाऊ नेदी एक क्षण इत्यादी वचनांद्वारे समर्थांना श्रमाचे महत्त्वच पटवून द्यायचे आहे. कर्मयोगी संत गाडगेबाबा स्वतः अविरत कष्ट करीत. आपल्या पत्नीला (कुंताबाईला) सुद्धा फुकट काम न करता, खाऊ देऊ नये अशी त्यांची सक्त ताकीद असे. 


आजारपणात कोणी विश्रांतीचा सल्ला दिला की ते म्हणत, "बाबू रे, हे शरीर भाड्यानं घेतलेलं घोडं आहे, जितके त्याचे लाड कराल तितलं ते लाडावते. जितलं त्याले रंगणात धावडवाल तितलं ते काम करते." एडिसनच्या मते “कष्टाशिवाय प्राप्त होईल. अशी कोणतीही मौल्यवान वस्तू या जगात नाही.” तर साने गुरुजींचे सांगणे आहे की “श्रमणाऱ्या हातांनीच जीवनाला वैभव चढते.” “स्वतःच्या घामातून स्वतःची भाकरी मिळवली पाहिजे." 


हीच शिकवण बायबल, कुराणादी ग्रंथही देतात, अर्जुनाला कर्मयोग सांगणाऱ्या भगवान श्रीकृष्णाने बालवयात गुरे राखण्याचे काम केले. गुरुगृही पडतील ती कामे आनंदाने केली. युधिष्ठिराने केलेल्या राजसूय यज्ञात उष्टी काढण्याचं काम करण्यात द्वारकेच्या राण्याने धन्यता मानली.


साक्षात भगवंताला भक्तांसाठी किती राबावे लागते. दळण कांडण, धुणी धुणे, पाणी भरणे, शेले विणणे, मांस विकणे अशी हलकीसलकी कामे करण्याचा त्याला कंटाळा येत नाही. ही कामे तो का बरं करत असेल? कोणतंच काम हलकं, नीच प्रतीचं नाही हे तर त्याला सुचवायचं नसेल?


सुभाषितकार सांगतात, 'हस्तस्य भूषणं दानम्।' (दान करणं हे हाताचं भूषण आहे.) पण 'हस्तस्य भूषणं श्रमदानम्।' असंही म्हणायला काय हरकत आहे? मुळीच नाही. कारण कामात गुंतलेले, कष्ट करणारे हात ही खूप खूप शोभून दिसतात.


उद्योगाच्या घरी ऋद्धी सिद्धी तर पाणी भरतातच पण उद्यमशील व्यक्तीला दीर्घायू, आरोग्य, शांती, समाधान, आनंद यांचीही प्राप्ती होते. (म्हणजे एकावर फक्त एकच नाही कितीतरी गोष्टी 'फ्री' मिळतात की हो!) मातंग ऋषींची एक कथा मोठी उद्बोधक आहे. 


एकदा ते आश्रमातील मुलांना घेऊन पहाटेच फिरावयास निघाले. पाहतात तो काय! रस्त्याच्या दुतर्फा स्वर्गीय फुले फुललेली. मुलांनी विचारलं, "गुरुजी, एका रात्रीत ही मधुर सुवासिक फुलं कोठुन आली? काल तर इथे काही नव्हतं." गुरुजी उत्तरले, "बाळांनो, काल तुम्ही जंगलातून लाकडं आणली तेव्हा सर्वांच्या अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. ही त्याच परमपवित्र ‘घामाची फुले' आहेत." मुलांना आनंद झाला कारण त्यांना श्रमप्रतिष्ठेचा सुंदर धडा शिकायला मिळाला होता.


आज विज्ञानाने आमचे श्रम कमी झाले असले तरी श्रमांची प्रतिष्ठा कमी झालेली नाही. महाशक्ती म्हणून उदयास आलेली राष्ट्रे जादूची कांडी फिरवून नव्हे तर अफाट बुद्धीला अचाट परिश्रमांची जोड दिल्यामुळे आज अख्ख्या जगावर राज्य करताहेत. 


खरोखरच विधात्याने मानवाला बुद्धीच्या देणगी बरोबर अत्यंत कुशल नि समर्थ हात दिले ते हातावर हात ठेवून बसण्यासाठी नक्कीच नाही. शून्यातून विश्व निर्माण करण्याची किमया लाभलेले ते हात आमच्याजवळ सतत एकच मागणी करीत असतात. 'आम्हाला काम द्या, काम द्या, काम द्या हो' आणि गंमत अशी की हातांची मागणी पूर्ण करण्याचं काम आमच्याच हातात आहे. मग वाट कसली पाहताय? चला, उठा नि कामाला लागा. आज, आत्ता, ताबडतोब. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद