पावसाळ्यातील एक दिवस मराठी निबंध | Essay On Rainy Season In Marathi

 पावसाळ्यातील एक दिवस मराठी निबंध | Essay On Rainy Season In Marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण पावसाळ्यातील एक दिवस मराठी निबंध बघणार आहोत.  जूनचा महिनाअखेर म्हणून शाळा लवकर सुटली. दुपारीच मी घरी आलो. माझा कंटाळलेला अवतार पाहून आईनं बाहेर फिरायला जायची टूम काढली. 


आम्ही सारे जवळच माळशेज घाटात गेलो. वळणावळणांचे नागमोडी रस्ते, सह्याद्रीचे उंच कडे स्वागतासाठी जणू उभेच होते. घाटातल्या शंकराच्या छोट्या मंदिरापाशी आम्ही गाडी थांबवली व पुढे पायी चालत निसर्गाची मजा लुटत फिरत होतो.


सूर्याची तबकडी अस्ताला जायच्या तयारीत होती. पश्चिम लालीलाल होती. रेंगाळलेली सूर्याची किरणं झाडांच्या शेंड्यांवर तोरणं बांधल्यासारखी सजली होती. हळूहळू संध्याछाया सरकू लागल्या. एवढ्यात... आभाळ गच्च झाले, थंडगार वारा सुटला, झाडांची सळसळ वाढली.


'गडद निळे गडद निळे जलद भरुनि आले

शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले'


काळ्या ढगांच्या अश्वांवर आरुढ होऊन पाऊसच येतो की काय असा विचार मनात येतो, तोच टपोरे थेंब, एक... दोन... तीन... दहा करीत टपटप पडू लागले. आकाशाचा लालीमा पुसून टाकत पावसाने अधिराज्य गाजवायला सुरुवात केली. एकदा घाटमाथा, तर एकदा दरी विजेच्या चमचमाटाने लखलखून जात होती. 


उजळून, न्हाऊन निघत होती. मध्येच ढग गडगडाट करीत सात मजली हास्य करीत होते. कधी दात विचकून भीती दाखवत, तर कधी आनंदाने खिदळत. ढगांचे चित्रविचित्र अजस्र आकार पाहून आकाशात जणू डायनासोर, हत्ती, उंच पाणघोड्यांनीच गर्दी केलीय, असं वाटू लागलं.


विजांचा कडाट, ढगांचा गडाट मनात थर्राट, पक्षांची भर्राट... क्षणोक्षणी! अशी अवस्था होऊन गेली. मध्येच हृदयात धस्स व्हायचं, तर मध्येच मन मोरासारखं थुई थुई नाचू लागायचं. ढग जरासे बाजूला सरले की अंधुकसं इंद्रधनुष्य ओझरतं दर्शन द्यायचं, क्षणापुरतंच. सरींच्या थेंबांचे चुंगरू पायी लेवून सारी सृष्टी नवचैतन्यानं नर्तन करतेय असं भासू लागलं.


झाडांच्या मनात .... पानात ..... देठात ..... तालात ..... सुरात ..... गाणेच ..... देहात भिनले. वृक्षांबरोबर ...... अंगाअंगातून सतारीच्या तारा छेडल्या जात होत्या. रस्त्याच्या दुतर्फा लाल गढूळ पाण्याचे ओहोळ दंगामस्ती करीत पळू लागले. रांगा मोडून लता, वेली मागे पुढे डोलू लागल्या. 


लाल काळ्या मुंग्या, मुंगळे गडबडीने बिळात घुसू लागले. माकडे, झाडीत कुठेतरी गडप होऊन गेली. पक्षी, पक्षिणी चोची पंखात खुपसून, अंग फुगवून फांद्यांवर गुपचूप बसली. वारं प्यालेली गुरे-वासरे अंगअंग शहारून शेपट्या उंचावून गोठ्यांकडे धूम पळू लागली.


सांज ये गोकुळी सावळी सावळी सावळ्याची जणू सावली! ह्या पंक्ती मनात घोळू लागल्या. हे विश्व सारे जणू कान्हाच आहे व रानजाई, टणटणी, मोहाची फुले ..... म्हणजे सावळ्या कृष्णाला पाठवलेल्या, कलाबुतीत सजवलेल्या नाजूक सुंदर राख्याच भासू लागल्या. हिरवीगार भातशेती डोलायला लागली. 


मातीचा धुंद गंध वातावरणात भिनला. वनगौरींच्या चरणी पत्री वाहून पुजण्यासाठी पानं सचैत न्हाली.. ना. धो. महानोरांच्या भाषेत 'ह्या नभाने ह्या भुईला दान' देऊन टाकले. श्रीमंत करून टाकले. गवताची इवली पोपटी पाती वाऱ्यावर ओली-सुकी होत होती. 


बा. भ. बोरकरांनी ह्या ओलेत्या सृष्टीचं वर्णन करताना म्हटलंय, 'समुद्र बिलोरी ऐना, सृष्टीला पाचवा महिना' खरोखरच पावसाळ्यातलं हे सौंदर्य एखाद्या गर्भवती मातेच्या तेज:पुंज कांतीसारखं नितळ, सृजनाची आस उरी जपलेलं नसतं का? आणि पाचवा महिना म्हणजे... श्रावण! आभाळ भरून हे घन ओथंबून असे प्रसवाचा उत्सव समजून ..... माती हसे पाऊस तिच्या मांडीवर तान्हा होतो


खोवून पीस मोराचे ..... कान्हा होतो कवीचे हे शब्द तरी वेगळे काय सांगतात? अशा झिम्मड पावसात कवयित्री इंदिरा संत मात्र धास्तावून काळजीनं लिहितात,  नको नको रे पावसा, असा धिंगाणा अवेळी घर माझे चंद्रमोळी आणि दारात सायली.


एव्हाना सहसधारांच्या वर्षावांनी आम्हीही चिंब चिंब झालो होतो. संध्याकाळ संपून रात्रीच्या पावलांचे आवाज ऐकू येऊ लागले. तनमन तृप्त, ताजेतवाने झाले होते. शिणवटा नाहीसा झाला होता. केवढा किमयागार हा पाऊस! एका सरीच्या फटकाऱ्यानिशी विश्वाचं रंगरूप बदलून टाकणारा. निसर्ग एक कलावंत, असं म्हणतात ते उगीच नाही.


पावसाचा जोर वाढू लागला, तशी आई मात्र काळजीत पडल्यासारखी दिसू लागली, जरासं दटावून पावसाला म्हणू लागली .... अरे थांबा की थेंबांनो, किती आदळाल पाय निपजते कुशीमध्ये, मऊ कोंबांचे हे रान नाही बरा धांगडधिंगा पुरे झाले हे थैमान चिंब झाली गंगा माई, आले सागरा उधाण.


अन् काय आश्चर्य, सृष्टीचा कायापालट करणारा हा जादुगार हळूहळू निघून जाऊ लागला होता... कदाचित पुढच्या गावाला! आकाश स्वच्छ होऊ लागले. गरमागरम वडापाव, ओली झणझणीत भेळ खाल्ली आणि घरी परतलो. घरी आल्या आल्या घरामागच्या गॅलरीतून पिंपळाच्या झाडाकडे पाहिलं. पापण्या न हलवता झाड चिडीचूप गप्प बसलं होतं. पक्ष्यांच्या रोजच्या गलक्याऐवजी आज पक्षिणींचीच कुजबुज माझ्या कानी आली. 


चिऊताई चक्क मैनेला म्हणत होती, 'म्हणता म्हणता वर्षाऋतु आला बाई, माझी बरीच कामं राहन गेली गं! चिऊच्या कानी लागत मैना आश्वासन देत होती. 'भिऊ नकोस गं ताई, मी आहे ना जोडीला. मदत करीन. तुझी पिलं अजून लहान आहेत. काळजी करू नकोस हं!'


असे संवाद कानी पडताच मी मंत्रमुग्ध झालो. मैना, चिऊकडून बरंच काही शिकूनही गेलो. आता डोळे मिटू लागले होते. अंधाराची दुलई अंगावर ओढून सारेच झोपी गेलो! मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद