“संत गाडगे बाबा” वर निबंध | Essay on sant gadge baba in Marathi

 “संत गाडगे बाबा” वर निबंध | Essay on sant gadge baba in Marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण “संत गाडगे बाबा” मराठी निबंध बघणार आहोत.  २० डिसेंबरला संत गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्त आमच्या शाळेत 'देवकीनंदन गोपाला' हा सिनेमा दाखवला. तो पाहून आम्ही सारी मुले इतकी भारावलो की, उठायचे भानही राहिले नाही. ऊर भरून आला होता. 


डोळ्यांवाटे वाहणाऱ्या अश्रुधारा गालांवरून ओघळत होत्या. देहभान हरपणे म्हणजे काय ह्याचा अनुभव सारेच घेत होतो. आत्ता ह्या क्षणी गाडगेबाबांना भेटावं नी त्यांच्या चरणांवर लोटांगण घालावं, असं प्रकर्षानं वाटलं. पण हाय! संतत्वाला पोचलेला हा थोर समाजसेवक आज आपल्यात नाही!


अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात शेडगाव नावाचे लहानसे खेडे. तेथे वडिलोपार्जित कमाईवर चैनीसुखात जगणाऱ्या झिंगराजी परीटाचा 'डेबूजी' हा मुलगा. मृत्यूसमयी कटू सत्याला सामोरं जाताना झिंगराजी डेबूजीला म्हणाला, “जलमभर मरीमाय, मातामायला कोंबडं बकरू कापलं पण वखताला कुणी नाय उभं राह्यलं, पैसा होता तवर सगेसोयरं!" 


संसारातला, जगण्यातला व्यवहारी वास्तववाद डेबूला असा लहानपणीच कळला. त्याला शिक्षण कुणी दिलंच नाही. वडिलांच्या निधनानंतर आई त्याला घेऊन माघारी आली. आई देवभक्त होती पण देवासाठी आई इतकं करते तरी देव आईला सुख देत नाही याचा दाखलाही डेबून पाहिला. सभोवताली अंधश्रद्धेच्या गर्तेत चाचपडणाऱ्या समाजाचा त्याला वीट आला. 


त्याने गृहत्याग केला. १९०५ साली एका तेजस्वी महात्म्याने त्याला अनुग्रह दिला. गौतमबुद्धांची तळमळ त्याच्या अंगात संचारली अन डेबूचा ‘गाडगेबाबा' झाला. एका थोर डोळस समाजवादी संताचा जन्म झाला. गाडगेबाबा देशभर हिंडले. 


भ्रमंतीने त्यांना बऱ्यावाईटाची ओळख करून दिली. समाजातील प्रत्येक थरातील माणसांना भेटल्याने त्यांना जीवन पारखण्याची संधी मिळाली. अनुभवांच्या शिक्षणातून शिक्षित होऊन समाजाला प्रबोधन करणारे गाडगेबाबा हे थोर प्रबोधनकारच! जीवनाभूती व श्रवणभक्तीतून बहुश्रुत झालेला एक निरक्षर विद्वान! 


शिवाशिव, स्पृश्यास्पृश्य मानणाऱ्या समाजाला त्यानी मानवतेचा, सहिष्णुतेचा, समरसतेचा मंत्र शिकवला. अंधश्रद्धा, रुढी, परंपरा यांवर हल्ला चढवताना ते जहाल होत, त्यांची वाणी तिखट होई. 'देव कुणाला दिसत नाही आणि दिसणारही नाही, मग त्याच्यासाठी आटापिटा कशाला? कर्मकांड कशाला?' असा खडा सवाल ते लोकांना करीत.


देव देव करता शिणले माझे मन ।

 पाणी नि पाषाण जेथे तेथे। 

दगडाचा देव बोलेल तो कैसा । 

कवन काळी वाचा फुटेल त्यासी।।


असे त्यांचे स्पष्ट मत होते. याउलट माणसाच्या जन्मात जो रंजल्या गांजल्या दीन दुबळ्यांची सेवा करील, तो देव आहे हे जनतेला पटवून देत. त्यांचे कीर्तन कौशल्य तर थक्क करून टाकणारे होते. प्रत्येकाने आपल्या अंत:करणातल्या देवाला जागृत करून सेवाधर्म करावा, अडीच रुपये खर्च करून सत्यनारायण करून देव आपल्याला पैसा, बंगला देत नाही, 


स्वकष्टातून तो मिळतो हे त्यांनी जनमानसावर ठसवले. ब्रिटिशांचे राज्य आले तेव्हा सत्याग्रह करायला देव आले नाही. हे पटवून स्वमनगटावर विश्वास ठेवायला शिकवले. मळ घालवला की कपडे स्वच्छ होतात. स्वच्छ कपड्यांनी शरीर शोभून दिसते. बाबांनी कपड्यांबरोबर उपदेशाने मने धुवून काढली. 


स्वच्छ व निर्मळ मनांची माणसे उभी केली. शुद्ध विचारांना, शुद्ध आचारांची जोड देऊन विवेक मांडणारा महान आदर्श म्हणजेच गाडगेबाबा. त्यांचे व्यक्तिमत्व म्हणजे जणू धगधगते अग्नीकुंडच. त्यांच्या रुपात होता, दारिद्र्य, व्यसनाधिनता, विषमता याच्या अंध:कारात खितपत पडलेल्या समाजाला सन्मार्गाचा उजेड दाखवणारा एक तळपता सूर्यच!


त्याकाळी परीट समाजाला शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आले होते. कुणाचा नवा जन्म झाल्यावर बकरू कापणे, जातगोतास दारू पाजणे हा प्रघात जिकीरीने व प्रतिष्ठेने पाळला जात होता. त्यापायी समाज कर्जात बुडाला होता, दंभाचाराने बरबटला होता. बाबांनी हे प्रघातच बंद करण्यास लोकांना प्रवृत्त केले. 


कीर्तनांतून पशुहत्येवर जोरदार आघात केले. लोक व्यसनमुक्त केले. विद्येविना अडाणी समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. 'विद्येनेच मनुष्या आले श्रेष्ठत्व ह्या जगामाजी' 'न दिसे एकही वस्तू विद्येने असाध्य आहे जी' हे बिंबवले. सामाजिक कळवळ्यापोटी अनंत सामाजिक संकटांशी आपल्या अमोघवाणीने जन्मभर झंज दिली. प्रचंड धर्मशाळा बांधल्या. 


आंधळ्यापांगळ्यांसाठी सदावर्ते चालवली. शाळा काढल्या, वसतीगृहे बांधली, वृद्धांना सांभाळले, गाईंसाठी गोशाळा काढल्या. गरीबांची लग्नेही लावली. विझलेले संसार फुलवले. मूर्तिजापूरला नानासाहेब जमादार हे धनवंत गृहस्थ होते. ते दानशूर होते बाबांच्या कार्याला मदत म्हणून त्यांनी कित्येक एकर जमीन गोरक्षणसंस्थेसाठी दिली.


गाडगेबाबा अंगात फाटक्या चिंध्यांचा सदरा, फाटकेच ठिगळ लावलेले धोतर घालीत. एका हातात गाडगे घेत. एका हातात खराटा। पहाटेच गाव जागा व्हायच्या आत खराट्याने गाव स्वच्छ करीत. मग सारे लोक पाईने उठून स्वच्छतेची मोहीम हाती घेत. 'गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान' आजही गावात राबवले जाते. 


ते कधी फुकट जेवत नसत. ग्रामस्वच्छतेनंतरच गाडग्यात मावेल तेवही पातळ भाजी, आमटी घेत व हातावर भाकरी घेऊन खात. जास्त मिळालेले अन्न ते वाट्न टाकत. खऱ्या समाजसेवकाला कुठलीच आसक्ती नको, हेच त्यांना त्यांच्या चिंध्यांचा पोशाख, जेवणाचे गाडगे ह्यातून हल्लीच्या समाजसेवकांना सांगायचे असेल. हल्लीसारखा हारतुरे घालून स्वत:चा उदोउदो त्यांनी कधीच करून घेतला नाही. उलट नमस्कार करणाऱ्याला ते काठीने मारीत.


जाणे तरी सेवा।

 दीन दुबळ्यांची देवा।


असे म्हणत ते दीनांना छातीशी कवटाळीत. हृदयाला भिडणाऱ्या बोलीभाषेत श्रोत्यांशी संवाद करीत. प्रबोधनाचे फार मोठे कार्य अहोरात्र करीत.  भ्रमंती करीत संतत्वाला पोचणाऱ्या ह्या श्रेष्ठ मानवाला आचार्य अत्र्यांनी 'भगवंताची मूर्ती' म्हणून संबोधले आहे. “पोरगं आजारी पडलं, त्याले डॉक्टरकडे न्यावावं का बकरू कापावं?" “कर्ज काढून देवाची यात्रा कशाले?' “गाईबैलांची काळजी वाहा”


“मुलांना शिकवा! शिकवून आभाळावर, पहाडावर, सागराच्या थैमानावर आपण मात केली. धन्य त्या शास्त्राची, विज्ञानाची! शिकण्यासाठी वेळंला जेवणाचं ताट खर्च करा." "हुंडा देऊ नका, शिवाशिव पाळू नका, दारू पिऊ नका, देवाला कोंबडं मारू नका, भजन केल्याशिवाय राहू नका." ...हे आणि असे अनेक उपदेश आजही समाजाला किती उपयुक्त आहेत.


भूतदया अंगी बाणवणारा श्रमप्रतिष्ठा वाढवणारा हा कर्मयोगी, महामानव होता. संत समाजसेवक होता! वैदर्भ देशात ऋणामोचनाशी तुकाराम अवतार रजकाच्या वंशी करी गाडगे काठी चिंध्या तनुला नमस्कार माझा तया डेबूजीला! मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद