झाडे लावा झाडे जगवा निबंध मराठी | jhade lava jhade jagva marathi nibandh

 झाडे लावा झाडे जगवा निबंध मराठी | jhade lava jhade jagva marathi nibandh

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण झाडे लावा झाडे जगवा मराठी निबंध बघणार आहोत. रात्री अभ्यास करून जरा उशीराच झोपलो. मध्येच एका भयानक स्वप्नाने जाग आली. स्वप्नात मी पाहिले, एक हिंस्र राक्षसी मानव हातात धारदार खग घेऊन एका हिरव्यागार शालू नेसलेल्या नाजूक युवतीच्या मागे लागलाय, तो तिच्यावर सपासप वार करतोय तिचा भरजरी शालू फाटतोय! 


मी घाबरून त्या युवतीला नाव विचारले ती म्हणाली, “ मी वसुंधरा, हा राक्षसी मानव माझ्या हिरव्या गार वस्त्रांवर, वैभवावर घाला घालतोय. मला उघडी बोडकी करतोय एवढं बोलून ती पळत सुटली. मी दचकलो, घाबरलो. घामानं डंवरलो. खरंच वसुंधरेनं मला म्हणजे पृथ्वीवरच्या नागरिकाला हाक दिली होती, तिला वाचवायला हवं. 


पृथ्वीवरची वनसंपदा वाचवायलाही हवी नि वाढवायलाही, ह्या विचाराने पुरता वेढलो. खरं तर फुले-फळे-सावली देणाऱ्या, सर्वांना समानतेची वागणूक देणाऱ्या, मायेची ऊब देणाऱ्या वनस्पतींचे ऋण मानावे तेवढे थोडेच आहेत.


त्यांच्या मुळेच प्राणवायू मिळतो, पाऊस पडतो, अन्नधान्य पिकते, वस्त्र, निवारा, लाकूडफाटा मिळतो, डिझेल, रबर, कात, डिंक, कागद, इमारतीचे लाकूड, औषधे सर्व काही वृक्षच तर देतात. निलगिरी, साग, वड, पिंपळ, शिरीष ही सदाहरित वनांमधली झाडे हवा शुद्ध ठेवतात. 


ताग, धेचा, ग्लॅरिसिडीया किंवा गिरीपुष्प ह्या वृक्षांच्या पानांचं खत उपयुक्त असतं. ॲकॅशिया तर सर्वात जास्त ऑक्सिजन देणारा म्हणून प्रसिद्ध आहे. वृक्षांमुळे पावसाचे पाणी अडते. जमिनीची धूप थांबते. हे सारं माहीत आहेच.


वृक्ष माझी माता । 

वृक्ष माझा पिता।

सगासोयरा तो। 

सुखाचा निवारा त्राता।।


हेही खरं आहे, पण हल्ली आपण हे विसरत चाललोय. वृक्षांवर सर्रास कु-हाडी चालवून तेथे इमारती बांधतोय. अर्थात अनियंत्रितपणे वाढणारी बेफाट लोकसंख्या हे वृक्ष कमी होण्याचे मुख्य कारण आहे; पण गाई, म्हशी, शेळ्या, उंट आदि प्राण्यांच्या आक्रमणामुळेही वने कमी होत आहेत. 


महानगरे व कारखानेही वनसंपत्तीच्या दुरावस्थेला हातभार लावीत आहेत. उत्तर भारतात प्रतिवर्षी येणारे महापूर अवर्षणे हे हिमालयातील जंगलतोडीचे दृश्य परिणाम आहेत. वृक्षतोडीमुळे भूगर्भातील पेयजलही कमी होत चाललंय. हवामान चक्रही बदलते आहे. 


हे थांबलं पाहिजे कुठेतरी, वृक्षराजीचं पुनरुत्थापन करून. प्रत्येकाने एक एक झाड आपल्या हातानं लावून लगेच श्रीगणेशा करायला हवा. शुभस्य शीघ्रम या न्यायाने. हे झाड मोठं होताना, हिरवगार बहरताना, किलबिलाटानं गजबजताना मन आनंदानं गुणगुणेल,


झाड माझं विरंगुळ्याचं, घडीभरल्या भटकंतीचं पावसात थुई थुई नाचणारं, हृदयी लेणं सुगंधाचं झाड माझं होईल कल्पतरू उबेचं नि सावलीचं दहा दिशांनी बाह पसरून, शिकविल बळ सामर्थ्याचं! हा असा प्रवास जर एका झाडाचा असेल, तर झाडांची शाळा, विद्यालयं, विद्यापीठं... 


पर्यावरणाच्या प्रांगणात जादूच करून टाकतील नाही का? म्हणूनच वृक्षारोपण हाच खरा तातडीचा सर्वोत्तम उपाय आहे. निमित्त कुठलेही असो झाड लावले गेले पाहिजे, वाढवले व जतन केले गेले पाहिजे. लग्न, मुंजी, एकसष्टी, वाढदिवस ह्या प्रसंगी एक एक रोप भेटीखातर द्यावे. 


शाळेतल्या हर एक विद्यार्थ्याला भावंड म्हणून झाड देण्यात यावे. सांभाळ करण्यासाठी. रस्त्याच्या दुतर्फा दाट झाडे दाटीवाटीनं उभी राहावीत पांथस्थांना प्रवाशांना सोबत सावली देणारी. अवघ्या दहा वर्षात पुन: एकदा, कवी मनातलं,

उभय बाजूने चित्र तरुंची दाट लागली छाया। 

पांथस्थाला सुखकर मोठी श्रमहर मार्गी जाया।


हे दृश्य सत्यात यावं. एवढंच काय, सत्यनारायणाच्या पुजेबरोबर चौरंगावर रोप ठेवून वृक्षनारायणाचीच पूजा व त्याचीच पोथी वाचावी. प्रत्येक वृक्षाच्या ठायी साक्षात भगवंत वास करतो, असे स्वत: श्रीकृष्णाने अर्जुनास सांगितले आहे. भागवत सप्ताह साजरा करताना वृक्षांची महती सामुदायिक रित्या सांगावी व ऐकावी. प्रसाद म्हणूनही रोपवाटिकेतील रोप प्रत्येकाच्या हाती द्यावे.


'झाडे लावा, झाडे जगवा' ही मोहिम राबवणारे वृक्षमित्र मोहन धारिया घराघरात नि अण्णा हजारे गावागावात निर्माण व्हावेत. प्रदूषणाच्या भस्मासराला थोपवून धरायचे असेल, पर्यावरणाचे बिघडलेले संतुलन सावरायचे असेल, तर वृक्ष लागवडीशिवाय पर्याय नाही. तर मग...


चला सोडवू दुष्काळाचे प्रदूषणाचे कोडे, चला वाढवू वनसंपत्ती चला लावू या झाडे काळही मोठा तातडी मोठी उपाय आहे साधा एकजुटीने वनीकरणाचा मार्ग प्रभावी साधा प्रगतीच्या भरधाव रथाचे, हिरवे हिरवे झेंडे, चला वाढवू वनसंपत्ती, चला लावू या झाडे । साऱ्या जगभरात वनीकरणाचा वारू भरधाव दौडत आहे. 


चीनमध्ये प्रतिदिनी प्रतिहेक्टरी वनसंवर्धनासाठी नव्वद रुपये, जपानमध्ये तीनशे साठ रुपये तर भारतात एक रुपया व ऐंशी पैसे फक्त! हे आकडे वाचून घाबरण्याचे कारण नाही. सरकार एकटे काय करेल, ह्याचा विचार करून व हा देश माझा मी देशाचा ही खूणगाठ मनाशी बांधून, प्रत्येक भारतवासियाने जर दररोज फक्त एक रुपया वृक्ष संवर्धनासाठी बाजूला ठेवून खर्च केला, तर भ्रष्ट पुढारीही लाजतील. सत्ताधीशही कामे हातात घेतील.


शपथ घेऊया सारे मिळूनी पर्यावरणाचे पूजन करू। 

नच माज करू वनसंपत्तीचा, वृक्षांचा सन्मान करू।


बघता बघता परिसर, गावे, तालुका, जिल्हा, देश... व सारी वसुंधरा हरित, श्यामल होईल. तिचा शालू भरजरी हिरवा गार होईल आणि मग समर्थांच्या शब्दांत... कामधेनूची खिल्लारे कल्पतरूंची वने आवारे अमृताची सरोवरे, उचंबळतील ठायी ठायी। मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद