लोकसंख्या वाढ एक समस्या निबंध मराठी । Loksankhya Vadh Ek Samasya Marathi Nibandh

 लोकसंख्या वाढ एक समस्या निबंध मराठी । Loksankhya Vadh Ek Samasya Marathi Nibandh

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण लोकसंख्या वाढ एक समस्या मराठी निबंध बघणार आहोत. ‘ह्या सुट्टीत मुंबई पाहायला जायचं' असं आम्ही एकमताने ठरवलं. माझं लहानपण खेड्यातच गेलं. मनात मुंबईबद्दलचं आकर्षण होतंच. कल्याणहून लोकलमधून प्रवास करीत थेट मुंबईलाच धडकलो. 


पण आता मात्र गाडीतून खाली उतरायचे, ह्या कल्पनेने अंगावर सरसरून काटा आला. ही एवढी प्रचंड गर्दी मी प्रथमच पाहत होतो. माणसांचा जथ्था, जमाव, समुदाय... वगैरे शब्द मला माहीत होते, पण इथे तर प्रत्यक्ष मधाच्या पोळ्यावरून उठलेल्या, घोंघावणाऱ्या मधमाश्यांसारख्या माणसांचा गोंगाट मी पाहिला. 


'मायगॉड!' मुंबईतील एखाद्या ठिकाणी एवढी माणसे...! तर देशाच्या सर्व महत्त्वाच्या शहरातील नि जगातीलच एकूण ज्ञात अज्ञात स्थळांवर अस्तित्वात असणारी लोकसंख्या किती असेल? छे! माझा मेंदू... हा विचार करून शिणला.. ही माणसं... कीडामुंगीसारखी जगणारी... टिचभर पोटासाठी दश दिशा धुंडाळणारी... काही दुःखात बुडलेली, तर काही सुख विलासात मग्न असलेली! 


काही गरीबीत खितपत पडलेली, तर काही पिढ्यान्पिढ्या सोन्याच्या मोहरा दोन हातांनी उधळणारी! काही सुदृढ निरोगी तर काही अशक्त रोगट पाप्याची पितरं!' 'वाढता वाढता वाढे' या न्यायाने वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे अन्न, वस्त्र, निवारा ह्या गरजांचे प्रश्न भविष्यात आणखीच भीषण होण्याची शक्यता आहे. 


आज जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी गर्दीच गर्दी दिसते. सिनेमागृहाबाहेरील रांगा, बसचे क्यू, जीप, ट्रकच्या खिडक्यांना लटकून प्रवास व दुर्घटनेला बळी जाणारे लोक, झोपडपट्ट्यांची वाढती संख्या ही तरी काय दर्शवते? पण अशा वेळी ‘आपणही ह्या गर्दीचाच अंश आहोत' हे मात्र आपण विसरतो.


शहरांबरोबर खेड्यांचीही आता खुराडीच बनू लागली आहेत. पहावे तिथे दिसतात ती सिमेंटची जंगले! आधीपासूनच जास्त घनतेच्या लोकसंख्येचे प्रदेश स्थलांतरामुळे व जन्मदराच्या वाढत्या प्रमाणामुळे बिकट समस्यांना तोंड देत आहेत. जागेचे भाव तर सोन्यापेक्षाही जास्त होऊन आकाशाला भिडत आहेत. 


समर्थ रामदासांनी ह्या प्रश्नाचा विचार करताना म्हटलेच आहे ह्र “लेकुरे उदंड जाहली तो ते लक्ष्मी निघून गेली " महर्षी धोंडो केशव कर्वे यांनीही पूर्वीच ही समस्या ओळखून कुटुंबनियोजनाचा प्रचार केला. पण त्याकाळी गंभीरपणे कोणी विचारच केला नाही.


आता विज्ञानयुग आहे. वैद्यकीय क्षेत्रातील नवे नवे शोध, औषधे, शस्त्रक्रिया यामुळे मनुष्याचे आयुर्मान वाढले आहे. क्लोनिंगने तर त्यात आणखीनच भीतीदायक भर घातली आहे. मनुष्याने हरितक्रांती व धवलक्रांतीही केली, परंतु भूमी मात्र मर्यादितच आहे. ती तरी किती दिवस व किती प्रमाणात अन्न पुरवेल? 


त्यात नको ती रासायनिक खते व जंतुनाशके यामुळे स्वत:ची सत्त्वभूमी हरवून बसली आहे. माणसाला अन्न पुरणार नाही, मग तो पशुंना कोठून पोसणार? अशा अन्नटंचाईमुळे शाकाहारी सुद्धा मांसाहारी बनतील. व भूतदयेचा नेहमी सन्मान करणाऱ्या आपल्या देशात पशुहत्येचे प्रमाण वाढेल.


आंघोळीचे सोडा, पण प्यायचे पाणी सुद्धा ड्रॉपरने घ्यावे लागेल. कृषिक्षेत्रातील ठिबक सिंचनाचे तत्त्व माणसाच्या दैनंदिन जीवनातही वापरावे लागेल. शिक्षण क्षेत्रातही 'बळी तो कान पिळी' ह्या म्हणीनुसार लायकी नसलेल्या, 'विद्यार्थी' शब्दाला अपवाद असणाऱ्यांची संख्या जास्त होईल. 


एकेका नोकरीसाठी शेकडो उमेदवारांची गर्दी ही सुद्धा लोकसंख्यावाढीचे दर्शक आहे. राजकारणातही एका खुर्चीसाठीचा गोंधळ वाढतच जाईल. पण एवढ्या माणसांच्या गर्दीत 'माणूस' सापडणे कठीणच! सद्वृत्त मनुष्य ह्या जीवनकलहात एकटा पडला आहे. ह्या लोकसंख्यावाढीमुळेच भारताला मिळलेले “स्वराज्य” सुद्धा 'सुराज्य' म्हणून अनुभवता येत नाही. 


नऊ पंचवार्षिक योजनेनंतर सुद्धा 'विकसनशील' म्हणून भारताची गणना होते. भारताचा विकासच जणू अधू झाला आहे. मृत्यूदर कमी होऊन व जन्मदर वाढून अल्पावधीत एक अब्जापर्यंत झालेला हा Populatio00000n बाँब कधी फुटेल ह्याचा नेम नाही.


मालथूजियन थिअरी ने सांगितले आहे, “निसर्ग स्वत:च भूकंप, पूर, वादळे अशा माध्यमांनी लोकसंख्येचे नियंत्रण करतो.” परंतु असे म्हणून स्वस्थ बसणे म्हणजे “असेल माझा हरी, तर देईल खाटल्यावरी ।" या उक्तीप्रमाणे ठरेल. _ 'Prevention is better than cure'असे म्हटले जाते, परंतु Prevention करणे आपल्या हातून निघून गेले आहे. 


आता वेळ आहे ती Cure करण्याची! ___ अंधश्रद्धाळू, निरक्षर, अशिक्षित, कर्जाच्या बोजाने वाकलेल्या आपल्या देशातील लोकांना गरज आहे ती आरोग्य शिक्षणाची! कुटुंबनियोजनाच्या प्रचाराची! लोकसंख्यावाढ → गरीबी → निरक्षरता - जलचक्र, ऑक्सिजनचक्र ह्या पर्यावरणातील चक्रांप्रमाणेच कित्येक वर्षे चालू असणारे हे दुष्टचक्र आता थोपवले पाहिजे.


शासनानेसुद्धा ‘छोटे कुटुंब, सुखी कुटुंब', 'एक मूल, वेलीवरचे फूल', 'हम दो, हमारे दो' अशा घोषणा देऊन थांबायला नको. स्त्रियांच्या मनातील भीती, अवाजवी अंधश्रद्धा, समाजात बनलेली त्यांची चुकीची प्रतिमा ह्यांविरुद्ध ठोस पावले उचलायला हवीत. अभियान काढायला हवे. 


एक मूल होऊन थांबणाऱ्या दांपत्याला आकर्षकरित्या पुरस्कृत करावे. त्यांना विशेष सोयी-सवलती पुरवाव्यात. प्रत्येकाला हे कळायला हवे की - “छोट्या कुटुंबातच आहे शान सदैव उंचावेल जीवनमान " मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद