माझा आवडता कवी मराठी निबंध | maza avadta kavi marathi nibandh

 माझा आवडता कवी मराठी निबंध | maza avadta kavi marathi nibandh

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझा आवडता कवी मराठी निबंध बघणार आहोत.  देवी सरस्वतीच्या प्रांगणात, मराठी वाङ्मयात अनेक साहित्यिक, ललित निबंध लेखक, कथालेखक, नाटककार आहेत. पण साहित्य वेलीवरचं देखणं, लोभस, मनाला भुरळ पाडणारं घमघमणारं फूल म्हणजे 'कविता'. 


थोड्या शब्दांत मोठा अर्थ सामावणाऱ्या शब्दपंक्ती म्हणजे 'कविता'. जसे फुलांचे रंग अनेक, गंध अनेक, आकार-स्पर्श अनेक; तसेच अनेक प्रकारांनी कवींनी आपापल्या काव्यपुष्पांची गुंफण, देवी सरस्वतीच्या चरण कमली वाहिली आहे. कवी म्हणजे... 


अंतराळात विहरणारा पक्षी असतो। 

चराचरात नवे विश्व साकारणारा ब्रह्मा असतो।। 


कविवर्य विंदा करंदीकर, सारस्वतांमधलाच एक थोर उपासक, कवी. जणू दूरदेशी नेणारा एक देवदूतच. स्वप्नामध्ये सत्याला अलगद नेऊन भेटवणारा किमयागार. विंदा म्हटलं म्हणजे,


उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी, भरलेल्याशा भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी, देणान्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देता देता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे। ह्या काव्यपंक्ती सर्वप्रथम ओठांवर येतात. मन विशाल होऊन उठतं. मी चौथी, पाचवीत असताना एकदा प्रमुख पाहुणे म्हणून शाळेत विंदा आले होते. 


त्यांची कोकणातली म्हातारी देशावर आली कृष्णेच्या पाण्यात वाहून गेली वाहता वाहता म्हातारी हसली, मळीतली वांगी डोळ्यांना दिसली. म्हातारी लागली हालवायला पाय म्हणते ही खाल्ल्याशिवाय मरेन की काय? किंवा स्वप्नात पाहिला राणीचा बाग हत्तीच्या पाठीवर बसला नाग हरणांसंगे खेळत पत्ते बसले होते दोन चित्ते या आणि अशा कविता अगदी कालच ऐकल्यासारख्या कानात घुमत राहिल्यात. 


विंदांच्या चेहऱ्यावरील मिश्किल हावभावांसकट कायमच्या कोरल्या गेल्यात. सुस्पष्ट, परखड तरी सोप्या सुलभ भाषेतल्या त्यांच्या बालकविता... खारेदाणे, साखरफुटाण्यासारख्या... जाता-येता वाचाव्यात! ओठांवर घोळवाव्यात अशाच! 


पुढे मोठं झाल्यावर कळलं की, वास्तववाद जगणारा हा द्रष्टा मनस्वी कवी, मनानं दिलदार, अंत:करणानं निर्मळ नि सामान्य जनमानसात रमणारा आहे. एकदा त्यांच्या घराखालच्या रस्त्यावरून एक भिकारी गाणे म्हणत चालला होता. त्याचा गळा अत्यंत सुरेल होता, पण गळ्यात अडकवलेली (हार्मोनियम) पेटी जरा बिघडलेली असल्याने बेसूर वाजत होती.


विंदांच्या मनात काय आले, त्यांनी त्या भिकाऱ्याला वर बोलावले, पलंगाखाली ठेवलेली त्यांची स्वत:ची चालू पेटी खुशीत त्या भिकाऱ्याला देऊन विंदा मोकळे झाले. स्वत:चे हार्मोनियम लीलया देऊन टाकणारा हा उदार मनाचा कवी पक्का संसारी आहे. विंदा भाजीबाजारात स्वत: जाऊन, रुपया रुपयासाठी घासाघीस करून भाजी खरेदी करतात. 


दीन दुबळ्या, आजारी माणसाला पाहून मात्र त्यांचा हात खिशात जातो.  ते फक्त मानवतावादी नसून, मानवतावाद स्वत: प्रत्यक्ष जगतात हे. रक्ता रक्तातील कोसळोत भिंती मानवाचे अंती एक गोत्र या काव्यपंक्तींतून दिसते, साम्यवादात जगणारे नि साम्यवाद शिकवणारे. विंदा लिहितात,


व्होल्गाचे ते पाणी वाहू दे गंगेत।

लाभो निग्रो रेत पांढरीला।। 


निराशेच्या गर्तेत अडकलेल्या हताश तरुणासाठी ते सहजपणे उपदेश करतात, हा रस्ता अटळ आहे अन्नाशिवाय, कपड्याशिवाय ज्ञानाशिवाय, मानाशिवाय, कुडकुडणारे हे जीव पाहू नको डोळे शीव कर विचार हस रगड बन दगड मना बन दगड माझ्या मना बन दगड!विंदांच्या कविता म्हणजे भव्यदिव्य कल्पनांचा बौछार नाही, शब्दांची नुसती उधळण वा रचनेचे अवडंबरही नाही, तर वास्तवाचा, भावनांचा तरल अविष्कार आहे. अहंकार, 'मी'पणा त्यांना कधी शिवतच नाही.


'मी च्या वेलांटीचा । 

सुटो सुटो फांस। 

वेढा क्षितिजास । 

नको त्याचा।।


असं ते स्वत:लाच बजावतात व गर्वापासून लांब राहतात. ते खूप हळवेही आहेत. भारतीय सामान्य स्त्रियांचे प्रश्न कधी सुटणार? ह्या विचाराने ते उद्विग्न होऊन रागावैतागाने ओळी लिहितात, कर कर करा, मर मर मरा कूड कूड कुढा, चीड चीड चिडा झीज झीज झिजा, शिजवा आणि शिजा!


असं लिहिणारे विंदा, अजबखाना' ‘एटूलोकांचा देश', 'राणीचा बाग' 'सशाचे कान' 'बागूलबुवा इत्यादी बालकविता-संग्रह लिहितात. तर मनाच्या गाभ्याला जाऊन भिडणारी तैलचित्रे ही लिहितात. त्यात त्यांनी झुमरा, झपताल, रूपक ..... उत्तम समजून घेऊन कागदावर उमटवण्याची वेधक किमया केली आहे.


'आकाशाचा अर्थ', 'स्पर्शाची पालवी' हीसुद्धा त्यांची सुरेख पुस्तके. एके काळी विंदा, वसंत बापट व मंगेश पाडगावकर ह्या कवीत्रयींनी महाराष्ट्रातला कानाकोपरा स्वरचित कवितांनी दुमदुमविला. कविता लोकांच्या हृदयात वसवली. कवितेला एक प्रतिष्ठा मिळवून दिली.


विंदांचे गुरू कोण, तर न्यूटन, आईनस्टाईन, डार्विन, मादाम क्यूरी असे बुद्धिवादी व इहवादी वैज्ञानिक. इहवादी दृष्टी असल्यामुळे पृथ्वीवर... या मातीवर विंदांचे नितांत प्रेम. त्यांचा स्वर्गव नरक पृथ्वीवरच आहे. येथले जीवन व येथला मानव त्यांना सर्वाहून अधिक मोलाचा वाटतो... की,...


पवित्र सुख दुःखाची गाणी, वेदांतिल साऱ्या मंत्रांहून

पवित्र साधा मानव प्राणी, श्रीरामाहुन श्रीकृष्णाहून!


विंदा करंदीकरांच्या दृष्टीने, श्रमातून पोसणारी भूक, दगडी निद्रा, शरीराचे जगणे, प्रितीचे मिलन, यंत्रांची धडधड, सत्याचा विचार करणारे मस्तक, अन्यायाचा प्रतिकार, माणुसकीचा गहिवर ह्यालाच सगळ्यात जास्त महत्त्व आहे ते म्हणतात, सगळे मिळून सगळ्यांसाठी मरण्यात ही मौज आहे सगळे मिळून सगळ्यांसाठी जगण्यामध्ये... ब्रह्मानंद!


कविवर्य शंकर वैद्यांच्या भाषेत, समतेत, बंधुत्वात, मानवतेत आनंद मानणारा, विरघळणारा, खऱ्या अर्थाने साम्यवाद जगणारा हा 'कवी'. कवी नायगावकर विंदांबद्दल म्हणतात, हा सच्छिद्र जांभ्या दगडासारखा, केशरीधम्म देवगड हापूससारखा झुकतो पुन्हा भुईकडेच!


मराठी सारस्वतांचे अग्रणी, मराठी मायबोलीची गेली पन्नास वर्षे सेवा करणाऱ्या कविवर्य विंदा करंदीकरांना नुकतेच, 'ज्ञानपीठ' पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. हा विंदांचा गौरव म्हणावा की ज्ञानपीठ पुरस्काराचा? असे क्षणभर माझ्या मनात आले. आम्हा विद्यार्थ्यांचा त्यांना त्रिवार मानाचा मुजरा! मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद