माझी आई निबंध मराठी निबंध | Mazi Aai Marathi Nibandh

 माझी आई निबंध मराठी निबंध | Mazi Aai Marathi Nibandh

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझी आई मराठी निबंध बघणार आहोत. माझी आई ....एक आदर्श आई! हो, आहेच मुळी ती आदर्श! निरोगी देहयष्टी, तेज:पुंज चेहरा, विविध कलांची पुंजी आणि मदतीसाठी पुढे असणारा हात या साऱ्यांचा 'त्रिवेणी संगम' म्हणजे माझी आई! 


आम्हां भावंडांच्या शैक्षणिक आयुष्याला चांगली कलाटणी देण्यासाठी तिने रात्रंदिवस जिवाचं रान केलं. मला मिळणारं आदर्श विद्यार्थ्याचं बक्षिस, माध्यमिक शिष्यवृत्ती, प्रज्ञा शोध परीक्षेत माझा राज्यस्तरीय प्रज्ञावंत म्हणून होणारा सन्मान ह्याचं मोठं श्रेय माझ्या आईकडं जातं. 


माझ्या इवल्याशा जीवनाच्या त्रिकोणाच्या तीन शिरोबिंदूंवर आईचे, गुरुंचे, परमेश्वराचे अधिष्ठान आहे: म्हणनच म्हणावे वाटते. 'मातदेवो भव'. भाविकतेने मंदिरात नित्यनेमाने जाणारे लोक मी पाहतो पण माझा देव मात्र आईत आहे. मी तिलाच नेहमी मनोमन नमस्कार करतो. बुद्धीदेवता गणरायाने नाही का पार्वतीमातेलाच तीन प्रदक्षिणा घालून पृथ्वी प्रदक्षिणेचे पुण्य मिळवले!


आईच्या कुशीत जगलो निवांत कधी ना भासली कशाचीच भ्रांत। असे म्हटलेच आहे, ते अगदी तंतोतंत खरे आहे. कुटुंबातील प्रत्येकाची काळजी घेतानाही ती स्वत:च्या सुखाला तिलांजली देते. स्वत:च्या आवडीनिवडी, छंद बाजूला ठेवते. तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपत रात्र-रात्र बसून तिने कित्येकदा माझी आजारपणात शुश्रुषा केली.


कशाचीही तक्रार, कुरकुर न करता निमूटपणे कष्ट सोसणे, क्षमा करणे, सर्वांना आनंदी ठेवणे; हा तिचा स्थायीभाव आहे. खरंच, आई म्हणजे काय असते? अहो, आई म्हणजे काय नसते? ज्यांना ती नसते, त्यांच्या आयुष्यात मोठी पोकळी निर्माण होते.


आई नसता आयुष्य म्हणजे... हरवलेली वाट अन् निसटलेले बाल्य असते. उरात पेटला वणवा अन आठवणींची राख असते. आई! मग ती कधी शिवबाची जिजाऊ, बाळासाठी गड उतरणारी हिरकणी, कृष्णाची यशोदा, श्रीरामाची कौसल्या तर कधी किशोरीताईंना घडवणाऱ्या मोगूबाई कुर्डीकर असतात. 


आईची अनेक रूपे, परंतु भाव एकच! माया, वात्सल्य, चिरंतन क्षमा बाळाला केंद्रस्थानी ठेवून त्याच्या सर्वांगीण विकासासाठी धडपडणारी, सुसंस्कृत करणारी मूल्यशिक्षणाच्या सिंचनानं आयुष्य समृद्ध करणारी! माझी आई व्यवसायाने डॉक्टर! सामाजिक जबाबदाऱ्या घेणारी, तत्परतेने, प्रामाणिकपणे त्या तोलणारी! सारे सण समारंभ पारंपारिक पद्धतीनं, श्रद्धेनं करणारी! पण अंधश्रदेला थारा न देणारी, 


अन्यायाविरुद्ध, खोटेपणाविरुद्ध बंड पुकारणारी, प्रयत्नांवर नितांत श्रद्धा ठेवणारी 'First deserve and then desire' अशी तंबी देऊन कामाला लावणारी. आई कुठेही असो, तिचं लक्ष, आणि सारा जीव मात्र आपल्या मुलांमध्येच अडकतो. त्याचं खाणं पिणं, अभ्यास, झोप यावर ती बारीक लक्ष ठेवते. जणू,


घार हिंडते आकाशी।

 झाप घाली पिलापाशी माता गुंतली कामासी।

 चित्त तिचे बाळापाशी।।


ह्याचाही अनेकदा अनुभव घेतलाय. जीवनातले अनेक रंग आई मुलाला शिकवते. सुंदर मोहक रंगांची एक एक भेंडोळी जणू खुली करत जाते. ज्ञानाची कवाडं उघडते जणू विश्वाच्या पसाऱ्यातून नेमकी शोधल्यासारखी... केवळ आपल्या लहानग्याचे जग सजवण्यासाठी, समृद्ध करण्यासाठी. आयुष्याचे भले बुरे धडे शिकवते. अगदी बोट धरून उत्तुंग यशाचे क्षण झेलायला, वैफल्याचे क्षण पेलायला आईच तर शिकवते. तिचं मन मात्र क्षणोक्षणी आशीर्वाद देत असतं.


बाळा, आयुष्य तुझं नक्षीदार वेलबुट्टींनी सजू दे। 

रंगीबेरंगी मखमाली क्षणांनी ते फुलू दे।



आई, सतत बाळाला एका संरक्षित कवचात ठेवू इच्छिते. त्याच्या साऱ्या विवंचना स्वत:च्या अंगावर झेलायची तिची संपूर्ण तयारी असते. प्रेमास्वरूप आई, वात्सल्यसिंधू आई' असं उगीच नाही म्हणत! एक वैज्ञानिक... रासायनिक घटक... ज्याला ऑक्सीटोसिन म्हणतात. 


तो स्त्रीच्या रक्तात जास्त असतो, त्यामुळे तिच्यात निसर्गत:च करुणा, प्रेम पुरुषापेक्षा जास्त असते. त्यातून ती 'आई' झाल्यावर कदाचित हे ऑक्सीटोसीनचे प्रमाण वाढत असेल. आई झाल्यावर तीच आपल्या बाळाला म्हणते, 'बाळा होऊ कशी उतराई, तुझ्यामुळे मी झाले आई!


हे सारं ठीक. पण मला तर वाटतं सोप्या भाषेत, आई म्हणजे ओट्यापाशी वावरणारी वर्दळ असते. वरणभात भाजीपोळी शिऱ्यामधली केशर असते. आई म्हणजे टेबलावरच्या पुस्तकांचे भान असते. गणित, इंग्लिश, विज्ञान, हिंदी, मराठीतली तर ती 'कविता' असते.


ती घरात असताना घर म्हणजे घमघमणारी बाग असते, अन् ती नसताना त्याच घराला रितेपणाचा शाप! देव देवळात असतो म्हणतात, पण मला तो तिच्यातच दिसतो. तीच माझी रामेश्वर अन् काशी आहे, म्हणून माझे सौख्य तिच्या पावलांपाशीच आहे. आई नेहमी म्हणते, मन विशाल कर! आई म्हणताच 'भारतमाता आठव.' देश, माती व मातृभाषा कधीही विसरू नको. 


मला विसरलास तरी ही ....! हे ऐकून आईबद्दलचा अभिमान शतगुणित होतो. मीही मोठ्याने ए. आर. रहमान सारखं म्हणतो, 'मां तुझे सलाम! अम्मा तुझे सलाम! वंदेमातरम्!' मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद