संगणक काळाची गरज मराठी निबंध | Sangank Kalachi Garaj Marathi Nibandh

 संगणक काळाची गरज मराठी निबंध | Sangank Kalachi Garaj Marathi Nibandh

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  संगणक काळाची गरज मराठी निबंध बघणार आहोत. पूर्वीच्या काळी, परदेशातून सातासमुद्रापलीकडून आलेलं पत्रं म्हणजे जणू देवदूतानं आणलेलं जादुई पुडकंच वाटायचं लोकांना. पण आता सात आठ वर्षांची मुलं दोन मिनिटात मुंबईहून आपल्या न्यूयॉर्कमधल्या मामाला पत्र (इ-मेल) पाठवतात नी दहा मिनिटात संगणकाच्या पडद्यावर आलेलं मामाच पत्रोत्तरही वाचतात. 


हा काळ संगणकाचा आहे. बच्चमजी सारं जग जवळ आलय. मानवाच्या ते अगदी ओंजळीत येऊन बसलंय म्हणा ना! वैश्विकीकरण झालंय जगाचं! जग हे एक छोटसं खेडं आहे, ही संकल्पना रूढ होतेय. अर्थात ह्याचं श्रेय आहे संगणकाला नि जगभर सर्व संगणकांना जोडल्या गेलेल्या जाळ्याला... इंटरनेटला! संगणक म्हणजे 'जो गणना करतो तो'. इंग्रजीमध्ये Computer म्हणजे Which has abillty to compute. संगणक ठरवून दिलेल्या सूत्रांनुसार चालतो. 


हे एक लॉजिक डिव्हाइस आहे. सध्या जिकडे तिकडे आय. टी.' म्हणजे माहिती तंत्रज्ञान व बी.टी.' म्हणजे जैवतंत्रज्ञान हे शब्द सर्रास वापरले जात आहेत. शाळेतली मुलेही, 'एकविसावे शतक वेगळे कवेत आपल्या घेऊ, संगणकाच्या नव पर्वाचे गाणे नवीन गाऊ. 


ह्या ओळी गुणगुणत नव्या शतकाचे स्वागत करीत आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना संगणकामुळे काही वेळातच, प्रसंगी काही क्षणातच माहितीची देवाणघेवाण शक्य झाली. तबकडी फिरवून थेट संपर्क साधणे, चित्रे, मजकूर, निरोप तत्क्षणी पाठवणे, अभियांत्रिकी, वैद्यकीय, वैज्ञानिक, खगोलशास्त्रीय आदि क्षेत्रात दूर अंतरावरच्या तज्ज्ञांचेही मत व सहकार्य मिळवणे शक्य झाले आहे.


घरोघर मातीच्या चुली' नव्हे 'घरोघर माहितीच्या चुली' मांडल्या गेल्या आहेत. बहुतेक मध्यमवर्गीय कुटुंबात संगणक वापरात आहेत. घराघरात लहान मुलांनाही तो हाताळण्यास मज्जाव नाही. शाळांमधून 'संगणक' हा विषय शिकवलाही जातो, त्यामुळे संगणक शिक्षणाचे बाळकडू नव्या पिढीला प्राथमिक शाळेतूनच मिळते. 


त्यामुळे उद्याचा नागरिक संगणक साक्षर असेल व माहितीने परिपूर्ण असेल हे नक्कीच! 'लॅपटॉपचे बि-हाड पाठीवर,'  स्लो,' 'मनी वसे ते मॉनिटरवर दिसे,' 'हार्ड डीस्क' मध्ये नाही, तर पेनड्राईव्हत कुठून येणार?' अशी म्हणी सर्रास वापरात येतील.


संगणक म्हणजे खरंच एखादा जादूगारच वाटावा इतक्या विस्मयकारक गोष्टी त्याच्यामुळे घरबसल्या कळतात, दिसतात, उमगतात. अंतराळात सहा महिने वास्तव्य करणाऱ्या सुनिता विल्यम्सला आपण सारे उपग्रहीय - थेट प्रक्षेपणाद्वारे - घरात बसून पाहात होतो. पृथ्वीवरील वैज्ञानिकांशी ती थेट संपर्क साधून संभाषणही करू शकत होती.


तिचे अटलांटिस अंतराळयान पृथ्वीवर उतरवण्याचे कसबही वैज्ञानिकांनी संगणकाच्या साहाय्यानेच प्रत्यक्षात आणले. इंटरनेट जोडल्यावर हा किमयागार अनेकविध विषयांची माहिती देतो. गुगल या संकेत स्थळावरून आपणास माहीत नसलेल्या गोष्टी उदा. आरोग्य, पुस्तके, औषधे, आयुर्वेद, योगाभ्यास, कृषी, हवामान या क्षेत्रातली खडान्खडा माहिती छोट्याशा पडद्यावर आणून ठेवतो.


वेगवेगळी जागतिक विद्यापीठे, कॉलेजेस, त्यांचे अभ्यासक्रम, परीक्षापद्धती घरबसल्या सांगतो, तेही तंतोतंत खरेपणाने! संगणकावरून ‘ऑनलाईन' शिक्षण घेता येतं. जी.आर.इ. टोफेलसारख्या परीक्षांना डायरेक्ट बसता येतं. घरबसल्या अमेरिकन संगणक शास्त्रांची पदवी मिळवून शंभर टक्के नोकरी मिळण्याची हमी मिळते. 


ह्या वर्षी चक्क महाराष्ट्रात महाविद्यालयीन अभियांत्रिकी, वैद्यकीय शाखांच्या प्रवेश प्रक्रिया संगणकाद्वारे झाल्या. संगणकाद्वारे जगातल्या कुठल्याही शहरातल्या नातेवाईकांशी संपर्क साधून गप्पा मारता येतात. 'ऑर्कुट हे तर युवायुवतींचं, विद्यार्थ्यांचं आवडतं संकेतस्थळ. 


येथून एकमेकांना स्क्रॅप पाठवून (निरोप) खुशाली विचारता येते, खुशाली पाठवता येते. 'शादी डॉट कॉम' वरून अनेक इच्छुक वधुवरांची विचारांची, मतांची विचारपूस होऊन लग्नेही ठरू शकतात. 'व्हिडीओ कॉन्फरन्सिंग' ही सध्या लोकप्रिय आहे.


संगणकाद्वारे बहिणीची राखी नि चितळ्यांची आंबावडी पुण्याहून न्यूयॉर्कमधल्या भावाला पोहचवताही येते. तुम्ही आजारी पडलात तर डॉक्टरांच्या वेबपेजवर जाऊन, त्यांच्याकडून तपासून औषधांची यादी औषधविक्रेत्याकडे पाठवून थोड्याच वेळात औषधे तुमच्या घरी बिनबोभाट येऊ शकतात. 


चांगल्या ठिकाणी सुटी घालवायची असल्यास प्रवासी एजन्सीच्या वेबसाइटवर जाऊन तिकिटे खरेदी करून हॉलीडे रिसॉर्टही बक करू शकता. रेल्वेचे आरक्षण असो वा व्हिसा मिळवणे असो उन्हातान्हात उभे न राहता संगणकीकरणामुळे ते तासाभरात मिळणे शक्य झाले आहे.


अशा प्रकारे संगणक कामे करतो, करमणूक करतो, शूटिंग करतो, गाणी  ऐकवतो, सिनेमे दाखवतो. गणिते सोडवतो, आप्तांना भेटवतो, वाढदिवस लक्षात ठेवतो. तो लॅपटॉपच्या रूपाने बॅगेत तर कधी मोबाईल होऊन खिशातही गपचप बसतो. संगणकामुळे वेळ वाचतो. कामे पटापट होतात. 


मनुष्यबळ कमी लागते. आता तर डोळे, हृदय, मेंदू ह्या नाजूक इंद्रियांवरच्या क्लिष्ट शस्त्रक्रियाही संगणकाद्वारे होतात. नॅनोटेक्नॉलॉजीने तर वैद्यकीय क्षेत्रात किमयाच केली आहे. उद्या कदाचित शेतकरीही पाण्याचे नियोजन व सिंचन घरी बसून संगणकाच्या की बोर्डवरून करेल. 


'नॅसकॉम' या राष्ट्रीय संस्थेचे अध्यक्ष देवांग मेहता म्हणतात, 'संगणक क्रांतीत जनतेला सहभागी करून घेतलं पाहिजे. आय.टी.चा विकास जनसामान्यांपासून दूर राहून साधता येणार नाही. प्रौढ - संगणक - साक्षरता अभियान आता दूर नाही. 


संगणकाशिवाय पर्याय नाही. हे जरी सत्य असलं, तरी संगणकीय माध्यमांचा उपयोग विधायक गोष्टींसाठीच व्हावा. त्याचा गैरवापर होऊ नये. संगणकाच्या अतिवापराने डोळ्यांचे, पाठीच्या मणक्यांचे आजार उद्भवू शकतात. संगणक व्यसनाधीनता ही युक्तपिढीसमोरील समस्या ठरू नये. जसा PIRACY म्हणजे सिनेमा, गाणी यांच्या मुद्रण व वितरण हक्काचा भंग. हा तर एक मोठा शापच ठरला आहे. 


'Live web cam' वरून घडणाऱ्या घटना, सायबर क्राइम, क्रेडिट कार्ड नंबर क्रॅकिंग हे सारे प्रकार फार भयानक आहेत. लहानमुले LAN गेम्सचे बळी ठरणे, तर संकेतस्थळांवरून युवकांचे रेव्ह पार्टीचे आयोजन होणे, ह्या नक्कीच सामाजिक विघातक गोष्टी आहेत. 


शेवटी संगणक हे निर्जीव यंत्र आहे. ते शाकुंतल, हॅम्लेट नाही लिहू शकत. माणसाच्या मनाचा, भावनांचा वेध नाही घेऊ शकत. म्हणूनच सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे, संगणकापेक्षा माणसाची बुद्धीच कितीतरी श्रेष्ठ आहे. तो ज्या गोष्टी संगणकामध्ये भरतो, साठवतो त्याच गोष्टी संगणक करू शकतो. 


स्वत:च्या बुद्धीने नव्हे. म्हणूनच संगणकापाठोपाठ येऊ घातलेल्या मूलभूत ज्ञानाचा अभाव, अभ्यासाची उपेक्षा, सामाजिक विषमता ह्या गोष्टी रोखणं आपलं आद्यकर्तव्य आहे. माझी आई तर... मी संगणक सुरू केल्या केल्या म्हणते,


'अरे, आयुष्य म्हणजेच आहे संगणकावर बसणं सेफ टाईम अचूक पाहून ऑन ऑफ करणं मन असतं इवला माऊस, त्याच्या हाती क्लिक करणं सारे राइट्स हरघडी बुद्धीकडेच ठेवणं! मग मात्र संगणकाच्या साह्याने आयुष्य सुखकर, आनंदी नक्कीच होईल. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद