स्त्री पुरुष समानता मराठी निबंध | Stri Purush Samanta Essay In Marathi.

 स्त्री पुरुष समानता मराठी निबंध | Stri Purush Samanta Essay In Marathi.

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  स्त्री पुरुष समानता  मराठी निबंध बघणार आहोत.  'मुलगी झाली, मुलगी! नक्षत्रासारखी सुरेख, गोरीपान!' माझ्या डॉक्टर आईने बाळंतपण केल्या केल्या मोठ्याने सांगितले. पुढे ती म्हणाली, "बाळ, बाळंतीण सुखरूप” एवढे ऐकले मात्र.


त्या बाईंच्या बरोबर आलेल्या महिला मटकन खालीच बसल्या, दुःखाचे उसासे टाकत! 'कुठून मेली फिंदरी आली छळायला', एवढा खर्च केला, पण मुलगीच झाली. 'वंशाला दिवा काही जन्माला आला नाही.' वगैरे उद्गार मी ऐकले व सुन्नच झालो. 


परवाच्या जनगणनेत स्त्री-पुरुषांच्या गुणोत्तरात तुलनेने स्त्रिया कमी झाल्याचं लक्षात आलं, तरी स्त्री जन्म झाल्यावर शोक, स्त्रीगर्भाची हत्या, स्त्रीलिंगी बाळास योग्य लसीकरणाचा अभाव, औषधोपचार व योग्य पालन यांची चालढकल अजून समाजात आहे, याचे मला आश्चर्य वाटते. स्त्री! माणसाच्या आयुष्यात सर्वप्रथम येणारा अनुभव!... अर्थात आईच्या रुपाने! सर्व पशु-पक्षांमध्ये आईला अनन्यसाधारण महत्त्व! 


स्त्रीचा आदिबंध हा साहित्य, संस्कृती, कला, धर्म, जात या क्षेत्रांत आढळून येतो. 'आई' हे जीवनातील चिरकाल टिकणारे शाश्वत आहे. शककर्ता सातवाहन राजा स्वत:ला 'गौतमीपुत्र' म्हणवून घेत असे. स्वत:ची सबलता, कर्तृत्व स्त्रियांनी स्वहस्ते सिद्ध केल्याची कितीतरी उदाहरणे इतिहासात अजरामर आहेत. पुढे, ही मातृसत्ताक पद्धती नामशेष झाली. 


स्त्रियांना दुय्यम स्थान मिळत गेले व नंतर गुलामगिरीच नशिबी आली! सामाजिक जोखडांमुळे स्त्री बंदिस्त जीवन कंठू लागली. चैतन्यहीन, बुद्धीहीन गणली जाऊ लागली. गेल्या शतकानं मात्र तिला विकासाची दारं उघडी करून दिली. महात्मा फुले, महर्षी कर्वे या प्रभृतींच्या आश्वासक प्रयत्नांमुळे केवळ संसाराभोवती फिरणाऱ्या तिच्या आयुष्यात तिची नवी क्षितीजं, नवे प्रश्न यांचा समावेश होऊ लागला. 


ती आपला वेगळा ठसा उमटवू लागली. मी म्हणजे 'केरवारा, स्वयंपाक-पाणी, चूलमूल' नसून स्वतंत्र व्यक्ती आहे, हे कळून ती स्वत:च्या जाणत्या मुलीबरोबर संगणक शिकू लागली. स्वकौशल्याने नेमबाजी, तिरंदाजी शिकून एशियाड, ऑलिंपिकमध्ये भाग घेऊ लागली. अगदी परवाच्याच


ऑलिंपिकच्या उद्घाटन समारंभास भारताचा झेंडा घेऊन जेव्हा अथेन्समध्ये अंजू बॉबी जॉर्ज ऐटीत चालली, तेव्हा प्रत्येक भारतीयाचा ऊर किती भरून आला! 'नासा' मध्ये प्रवेश मिळवून सात अंतराळवीरांबरोबर आपली कल्पना चावला .... एकमेव महिला वीर होती नां!


भारतवर्षावर लोकशाही राज्यपद्धतीने पंतप्रधान झालेल्या प्रियदर्शनी इंदिरा गांधी! जेलमधले वातावरण पूर्ण बदलून कैद्यांशी वेगळे वागणाऱ्या, महिला पोलिसमध्ये भरती होण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या महिला पोलिस अधिकारी किरण बेदी! भारताची सुवर्णकन्या पी.टी. उषा, वेटलिफ्टींग मध्ये पदक विजेती मल्लेश्वरी! किती महिलांची नावे सांगू? 


अनेक बुद्धीवादी क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या शास्त्रज्ञ, साहित्यिक, डॉक्टर्स, इंजिनिअर्स, शिक्षिका महिला ह्या गार्गी, मैत्रेयी, पंडिता रमाबाई, डॉ. आनंदी गोपाळ, सावित्रीबाई फुले यांच्या वंशातल्याच नव्हेत का ? नौदल, हवाईदल, भूदल यांच्या प्रमुख अॅडमिरल पदी एक महिलाच होत्या. सध्या तर भारतच्या प्रथम नागरिक राष्ट्रपतीही प्रतिभा पाटील या एक सुजाण सशक्त महिला आहेत. 


या अशा व्यक्तींपुढे मस्तक आपोआप झुकते. अभिमानाने ऊर भरून येतो. 'यत्र नार्यस्तु पूज्यन्ते, रमन्ते तत्र देवता:' असं फक्त भारतीय धर्मग्रंथातच सांगितलंय. पण खरंखरं असं असतं का हो? स्त्रीला सन्मानानं वागणुक इथे दिली जाते का? तिच्या शारीरिक – मानसिक आरोग्याकडे तिचे घरचे लोक लक्ष देतात का? अत्याचारित महिलेला न्याय मिळवून देण्याचं प्रामाणिक काम तिचे सुपुत्र करतात का? 


महिलांनी केलेल्या कामाचं, यशाचं खरंखुरं मूल्यमापन होतं का? तिला स्वत:च्या अस्तित्वाने, सबळपणे एकटं जगता येतं? की सदा न् कदा मुलगी, पत्नी व मातेच्या रूपातच ती आपल्याला भेटते? पुरुषांच्या बरोबरीने प्रमोशन मिळवणाऱ्या, कांकणभर जास्तच काम अत्यंत प्रामाणिकपणे करणाऱ्या महिलेला काही सुखसोई कामाच्या जागी उपलब्ध करून दिल्या जातात का? ....... नाही ना?


ही समानता केवळ चर्चासत्रांमधून दिसते. जागतिक महिला दिन, मातृदिन या दिवशी फक्त स्त्रीचे महत्त्व! 'बैलपोळा' सणाचीच मला त्या दिवशी आठवण येते. खरंतर 'न ऋण जन्मदेचे फिटे' ही आपली संस्कृती! ती एक 'मातृदिन' साजरा करून साजरे होऊ शकते ? 


वडिलांचे मित्र आले की पोहे, शिरा, चहापान साग्रसंगीत होते. वडीलही 'डिश' घेतात. पण महिलेला ते उरते का? हे पाहिले जाते का कधी? आई स्वत:साठी सफरचंद, चिकू, केळी फळांची डिश टेबलवर घेऊन खात  मस्तपैकी टी.व्ही.वर मॅच पाहते, असे दृश्य दिसत नाही.


आपण व्यासपीठांवरून भाषणे देतो, देवीची आराधना करतो. राज्य घटनेने स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने अधिकार दिलेले आहेत, असं अभिमानाने सांगतो. शंकराचे जे अर्धनारीनटेश्वर हे रूप आहे, त्यातून हे प्रतीत होतं की, पुराणकाळापासून समाजाने स्त्री-पुरुष समानतेचा स्वीकार केलेला आहे. ज्ञानदेवांनी सातशे वर्षांपूर्वी स्त्री-पुरुष भेद मानू नये हे,


स्त्री पुरुष नामभेदे शिवपण एकले नांदे या ओळीतून सांगितले. अजूनही आजच्या घडीला रुग्णालयात जाऊन गर्भपरीक्षा करणारे व पोटात स्त्रीभ्रूणहत्या करणारे महाभाग आहेत. पंडुरोग, क्षय, एड्स ह्या रोगांना नाहक बळी पडणाऱ्या रुग्णांत स्त्रियाच जास्त आहेत.


पण स्वातंत्र्याचा खरा अर्थ व आनंद स्त्रियांना मिळतो का? खूप खेदानं ह्या साऱ्यांच उत्तर 'नाही' हेच येतं, मला मान्य आहे. जेथे निसर्गानेच स्त्री-पुरुषांना वेगवेगळ्या नैसर्गिक रचनेनं बांधलंय तेथे समानता आणायची, हा विरोधाभास एकत्र कसा येईल?


पण 'स्त्री-पुरुष ही एकाच रथाची दोन चाके एकाच नाण्याच्या दोन बाजू, शिव आणि शक्ती! ' हे आपणच एकीकडे म्हणतो आणि स्त्रियांवर बलात्कार, तिच्यावर असुरक्षिततेचं जू, अल्पवयातच विवाह, गर्भधारणा ह्या गोष्टीला लादतो.


महिला समाजाची वीण घट्ट करते.  भारत २१ व्या शतकात आहे 'Better late than never' आता यापुढे तरी आपण सर्वांनी मूल्यशिक्षणातील मूल्य 'स्त्री-पुरुष समानता' हे ब्रीद शिरावर जबाबदारीने तोलू या. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद